मुंबई - राज्यसभेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत चुकीच्या नियोजनामुळे पराभव झाला, आता कुठलाही दगाफटका होवू नये, यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला मुंबईत डेरेदाखल होणार आहेत. आज दिवसभर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षांच्या बंद दरवाजाआड बैठका सुरु होत्या, त्यात नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही सामावून घेण्यात आले.
महायुतीतही नियोजनाच्या जोरबैठका सुरु असून पुरवणी मागण्यातील निधीपेरणीमुळे आमदारांचे अतिरिक्त संख्याबळ मिळेल, याबद्दल तिन्ही सत्ताधारी पक्षांना कमालीचा विश्वास आहे, असे समजते. तिन्ही सत्ताधारी पक्षांनी परस्परांशी चर्चा करत सध्या वेगवेगळ्या बैठका सुरु केल्या आहेत. मात्र गुरुवारी (ता. ११) एकत्रित बैठकीत आमदारांनी कसे मतदान करायचे, प्राधान्यक्रम कसे लिहायचे, ते सांगितले जाणार आहे.
काँग्रेसकडे ३७ मते आहेत. सध्या महाराष्ट्रात असलेल्या भाजपविरोधी वातावरणाला आणखी हवा द्यायची असेल तर मविआचे तिन्ही उमेदवार निवडून येणे आवश्यक मानले जाते आहे. काँग्रेसची ५ ते ६ मते संशयास्पद मानली जात असली तरी नेत्यांना ते मान्य नाही. मतदानात दगाफटका होणार नाही.
विरोधात मत दिल्यास पक्षातून निष्कासित करणे, लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देणे, या निर्णयांची यापूर्वीच माहिती दिली आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील आणि अभिजित वंजारी हे तिघे मतांचे प्राधान्यक्रम ठरवणार आहेत, असे समजते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली असल्याने त्यांना अधिकचा कोटा दिला जाईल.
अतिरिक्त मते शिवसेना ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांना दिली जातील. मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा आहे. उर्वरित मते मिळतील याबद्दल त्यांना कमालीचा विश्वास आहे. बविआची तीन मतेही त्यांना मिळतील असे समजते. सपा,एमआयएमची प्रत्येकी दोन मते त्यांना मिळू शकतात.
अपक्षांच्या पाठिंब्याचा आधार
दरम्यान महायुती प्राधान्यक्रमाच्या जोरावर सर्व जागा जिंकू शकेल, असे गणित आहे. अपक्षांचा पाठिंबा हा आधार मानला जातो आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विजय महत्त्वाचा असून त्यांनी आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी व्यूहरचना आखली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.