पुणे : मतदार शांतपणे सारे काही पहात असतो योग्य वेळी दणका देतो. मतदारांना गृहीत धरू नका. असा स्पष्ट संदेश राज्यातील जनतेने भाजपच्या नेतृत्वाला आजच्या निकालाने दिला आहे. आम्ही काहीही करू, काय फरक पडतो या अविभार्वात भाजप शेवटपर्यंत राहिला. त्याला मतदारांनी चोख उत्तर दिले आहे.
शेवटच्या क्षणी अन्य पक्षातील आमदारांना पक्षात घेवून तिकीटे देवू काय फरक पडतो? राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व आहेच कोठे? अशा अविर्भावात भाजपचे नेते संपूर्ण प्रचारकाळात वावरत होते. तशीच भावना सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. त्यांच्या या गृहीतकाला आजच्या निकालाने जोरदार झटका दिला आहे.
भाजपने निवडणुकीची सारी सूत्रे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हाती सोपविली होती. पक्षाने कोअर टीममधील विनोद तावडेंना उमेदवारीही दिली नव्हती. तसेच एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे अशा दिग्गजांनाही घरी बसवले होते. पक्ष कोणत्याही परिस्थीतीत जिंकणारच आहे त्यामुळे काय फरक पडतो या अविभार्वात भाजपचे नेते होते. त्यांची देहबोली हेच सांगत होती. त्यामुळेच स्वबळावर सत्तेत येण्याची भाषा भाजपचे नेते करीत होते. अर्थात प्रचाराचा भाग म्हणून असे बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षात तसे वागणे वेगळे. नेमकी हीच चूक भाजपच्या नेत्यांनी केली.
सत्तेसाठी उदयनराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवेंद्ररोजे भोसले, दिलीप सोपल, वैभव पिचड अशा अनेक विरोधकांना पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावला होता. त्यातील जिंकले किती, हरले किती हा प्रश्न नाही. राज्यात असे आयाराम कल्चल आणण्याची निदानी भाजपची तरी ही पहिलीच वेळ होती. यातून मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती समोर दिसून आली. त्यातून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज झाले होते. पण त्याची फारशी फिकीर नेतृत्वाने केली नाही. गृहीत धरण्याच्या या वृत्तीला जनतेने फटकारले आहे. आजचा निकाल हेच सांगतो. साताऱ्यातील उदयनराजेंचा पराभव असो की इंदापुरातील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव असो यातून भाजपच्या नेत्यांनी नक्कीच बोध घेतला पाहिजे.
अर्थात राज्यात भाजपच सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला, पक्षाचा स्ट्राईक रेट 70 टक्के असला, तसेच मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली असली तरी सर्व विरोधी पक्षांना, जनतेला गृहीत धरण्याची भाजपची वृत्ती लोकांना रूचलेली नाही. त्यामुळेच स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसलेली आहे. पक्ष यातून भविष्यात नक्कीच बोध घेईल तसेच शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला अधिक सन्मानाने वागणूक देईल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.