VidhanPrishad: विधान परिषदेतील सदस्यांनी भाषणांद्वारे व्यक्त केलेली व्यापक लोकहिताची भूमिका आजही सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे. सदस्यांनी लोकहितासाठी वेळोवेळी सभागृहात आपली मते अभिव्यक्त केली आणि त्यातूनच लोकहिताचे अनेक क्रांतिकारी कायदे तयार झाले. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात आजी व माजी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधान परिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपसभापती बोलत होत्या.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य- रोजगार- उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आजी- माजी सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, विधान परिषदेतील सदस्य हे चळवळीतून, वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले असतात. समाजमनाचा अचूक मागोवा घेऊन सभागृहात बोलत असतात. त्यांच्या योगदानामुळेच रोजगार हमी कायदा, स्त्रीभ्रूणहत्या कायदा, प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन कायदा, डान्सबार बंदी कायदा, माहितीचा अधिकार यांसारखे समाजाचे जीवनमान उंचावणारे कायदे करण्यात विधान परिषदेने मोठे योगदान राहिले आहे. सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून कामकाज चालवले जात आहे. अधिवेशन काळात समाजाचे लक्ष कसे कामकाजावर असते, याबाबतचा आपला अनुभवही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या वेळी सांगितला.
पाच पुस्तके
शतक महोत्सवानिमित्त विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य, गत शंभर वर्षांतील महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव, विधान परिषदेमध्ये लोकहिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच पुस्तके प्रस्तावित असून यासंदर्भातील संपादन कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
लोकशाहीमधील उणिवा भरून काढणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीतील या सार्वभौम सभागृहाचे आतापर्यंतचे कामकाज प्रेरणादायी राहिले आहे.
- राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
विधान परिषदेतील कामकाजाचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप काही शिकवून गेला.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री
खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचे जतन करणे व लोकशाही बळकट करणे ही दोन्ही उद्दिष्टे या सभागृहामुळे साध्य होतात.
- चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री
विधान परिषद ही लोकशाहीला बळकट करणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. सभागृहाची सदस्य संख्या वाढवली पाहिजे. प्रतिवर्षी आजी, माजी सदस्यांचा मेळावा घेण्यात यावा.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.