मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही "ईव्हीएम'द्वारेच होणार असल्याने त्यात सहभागी न होण्याच्या विचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अद्याप ठाम आहेत. या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणुकीत सहभागी होण्याऐवजी मतदानयंत्राला विरोध करणारे जनआंदोलन सुरू करावे, असा राज यांचा प्रस्ताव आहे. पूर्वी जाहीर मंचावर मांडलेली ही भूमिका राज यांनी कायम ठेवली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या मनसेच्या बैठकीत त्यांनी हाच विचार पुन्हा एकदा ध्वनित केला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवता केवळ महत्त्वाच्या मतदारसंघांत सभा घेतल्या होत्या.
राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेनंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 12 मतदारसंघांत झेंडा गाडत उमेदवार निवडून आणले होते. मुंबई महापालिकेत लक्षणीय मते घेत नाशिक महापालिकेत मनसे सत्तास्थापनेपर्यंत पोचली होती. मात्र, सध्या राज ठाकरे यांनी ईव्हीएम हे एकमेव लक्ष्य ठरवले आहे. कोहिनूर मिल खरेदी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी पाचारण केल्यानंतरही राज यांनी आपण कुणालाही घाबरत नाही, असे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वीकारलेले मौन चिंताजनक मानले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे याबाबत टिप्पणीही केली होती.
'राष्ट्रवादी'कडून विनंती
राज ठाकरे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वानेही केल्याचे समजते. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अस्वस्थता जाहीर केली. निवडणूक लढवायची नाही, असे राजकीय पक्षाने कसे करून चालेल? असा विचारही या वेळी पुढे आला. राज यांनी सर्वांचे ऐकून घेतल्याचेही कळले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज यांचे विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मनसेने मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला, तर राज यांचे निकटवर्तीयही बाहेर पडण्याचा विचार करीत असल्याचे बोलले जात आहे.
|