Vidhansabha Election : भाजपकडून विधानसभेचे नियोजन सुरू; महाविकास आघाडीचीही उद्या बैठक

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात महायुतीचा जोर आहे की महाविकास आघाडीचा हे दिसणार असले तरी दोन्ही बाजूंनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
BJP
BJPesakal
Updated on

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात महायुतीचा जोर आहे की महाविकास आघाडीचा हे दिसणार असले तरी दोन्ही बाजूंनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत जागावाटपाच्या अडलेल्या चर्चा आणि उमेदवारांची घोषणा होण्यास झालेला विलंब या दोन महत्त्वाच्या बाबी टाळल्या जाव्यात, असा भाजपचा विचार आहे.

यासंदर्भात दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत करत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यास प्रारंभ होणार आहे, असे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय यांनी कोणताही विलंब न लावता संभाव्य आराखडा निश्चित करण्यास प्रारंभ केला आहे.

भाजपची जनमानसातील प्रतिमा, मोदी सरकारने केलेली कामे तसेच महाराष्ट्रातील संख्याबळ लक्षात घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. मित्र पक्षांशी पुढील वाटचालीसंदर्भात लवकरच चर्चा केली जाईल. विधानसभा निवडणूकही युती म्हणूनच लढली जाईल, असे फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीने शनिवारी (ता. १) निकाल घोषित होण्यापूर्वीच बैठक आयोजित केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला या बैठकीला हजर राहणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांचा पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळ आजमावेल तसेच काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर जागा वाढणार असल्याने स्वत:च्या जागांबाबत आता आक्रमक होण्याची चर्चा आहे.

जागावाटपाचा मुद्दा कळीचा

उद्धव ठाकरे १ जून रोजी मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर ३ जून रोजी विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचे निकटचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना काँग्रेस पाठिंबा देणार का, यावरून पुढील दिशा कळेल असेही सांगण्यात येते आहे. काँग्रेसची परिस्थिती महाराष्ट्रात सुधारते आहे. त्यामुळे जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकेल, असे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.