Vinayak Mete: विलासराव देशमुख म्हणायचे,"मेटेंना वाऱ्याची दिशा अचूक कळते"

विनायक मेटेंनी विलासरावांना मराठवाडा भूषण पुरस्कार दिला होता.
vinayak mete vilasrao deshmukh
vinayak mete vilasrao deshmukhesakal
Updated on

१४ ऑगस्ट. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. मात्र मराठवाड्याच्या इतिहासात हा दिवस मात्र काही अपशकुन घेऊन आलाय सांगता येत नाही. गेल्या काही वर्षात मराठवाड्याने अनेक मोठे नेते गमावले त्यातल्या दोघांचं निधन आजच्याच दिवशी झालेलं.

विलासराव देशमुख आणि विनायक मेटे

तसं बघायला गेलं तर दोघांच्यात जमीन अस्मानचा अंतर. विलासराव हे बाभुळगावच्या गढीत जन्मलेले देशमुख कुटूंबाचे वारसदार. पुण्याच्या आयएलएस विद्यालयात शिकलेले कायद्याचे पदवीधर. विद्यार्थी दशेपासून अतिशय लोकप्रिय. राजकारण त्यांना इतकं सहज जमलं की सरपंचपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मारलेली त्यांची झेप कोणालाही अनपेक्षित वाटू नये.

दुसऱ्या बाजूला विनायक मेटे मात्र बीडच्या राजेगाव येथे गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले. शिक्षण पूर्ण करण्याइतपत देखील परिस्थिती नव्हती. लहान वयातच एक कामगार म्हणून मुंबईला गेले. संघर्ष पाचवीला पुजलेलाच होता. बांधकाम मजूर, घरांना रंग देणे अशी छोटी-छोटी कामे त्यांनी केली. या काळात अण्णासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी विनायक मेटे यांच्यातील नेतृत्व गुण ओळखले. मराठा महासंघाच्या चळवळीत त्यांना सामील करून घेतलं. पुढे ते तिथे सेक्रेटरी बनले. शेजारच्याच जिल्ह्याचे नेते असणाऱ्या विलासरावांशी त्यांचा संबंध येणे साहजिकच होते.

vinayak mete vilasrao deshmukh
Vinayak Mete Death: विनायक मेटे यांचे अपघाती निधन

या काळात विलासराव देशमुख राज्यात मराठवाड्याच नेतृत्व करत होते. मराठा महासंघाच्या वतीने विनायक मेटे अनेकदा त्यांना भेटायला मंत्रालयात यायचे. विलासराव गंमतीने म्हणायचे की विनायकराव भेटायला म्हणून यायचे आणि मार्गदर्शन करून जायचे. विनायक मेटे यांचं म्हणण असायच की

"तुम्ही राज्यामध्ये मंत्री आहात, राज्य चालवत आहात आणि आमच्या पासून मात्र दूर राहता."

विलासराव मात्र हसत हसत सांगायचे, आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत पण व्यासपीठावर मात्र बोलवू नका. मात्र २००६ साली पुण्यात विनायकरावांच्या ४२व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला विलासराव देशमुखांनी हजेरी लावली होती. त्यावेळी तत्कालीन सभापती स्व.बाबासाहेब कुपेकर, जयंतराव पाटील, बबनराव पाचपुते, रामराजे नाईक निंबाळकर असे दिगग्ज आवर्जून उपस्थित होते. विनायक मेटेंनीही विलासरावांना मराठवाडा भूषण पुरस्कार दिला होता.

राजकीय विचार वेगळे असले तरी दोघांची मैत्री मात्र घट्ट होती. यात वय, पद, राजकीय अनुभव यामुळे कधी अंतर पडले नाही. सुरवातीच्या काळात गोपीनाथ मुंडे हा या दोघांच्या मैत्रीमधील समान धागा होता. मराठा समाजासाठीची तळमळ, त्यांचे संघटन कौशल्य, आक्रमकपणा पाहून विनायक मेटे यांना भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधान परिषदेवर संधी दिली. तिथून मेटे यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

vinayak mete vilasrao deshmukh
Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला; नेमकं काय घडलं? VIDEO

विलासराव देशमुख हे कायम काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. मोठा अन्याय झाला मात्र अपवाद वगळता ते कायम पक्षाशी बांधील राहिले. या उलट विनायक मेटे यांना मात्र वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षाची मदत घ्यावी लागली. असं म्हटलं जायच की त्यांना वाऱ्याची दिशा बरोबर कळते. मराठा समाजाला न्याय मिळावी ही एकमेव भूमिका मनात ठेवून असंख्य तडजोडी करत विनायक मेटे यांनी आपला राजकीय प्रवास चालू ठेवला. आमदारकी, मंत्रिपदाचा दर्जा सर्व गोष्टी मिळाल्या मात्र त्यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम पक्षाची रस्त्यावरची लढाई थांबली नाही.

बहुजन समाजासाठी त्यांची असलेली बांधिलकी प्रामाणिक होती. म्हणूनच शरद पवार यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सर्वपक्षीय सर्व नेत्यांशी विनायक मेटे यांचे संबंध अगदी जवळकीचे राहिले.

विलासराव देशमुख त्यांना नेहमी म्हणायचे, मेटे तुम्हाला हे सगळं कसं जमतं ?

१४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासराव देशमुख यांचं दुर्दैवी निधन झाल आणि आज बरोबर दहा वर्षांनी विनायक मेटे दुर्दैवी अपघातात आपल्यातून निघून गेले. त्यांना जोडणाऱ्या गोपीनाथ मुंडे या दुव्याचा देखील २०१४ साली अपघाती मृत्यू झाला होता. मराठवाड्याच्या खाणीतून निघालेले ही हीरे गमावणे ही तिथल्या जनतेसाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी पोकळी निर्माण करणारे आहे हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.