सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. त्या प्रत्येक मतदारांच्या घरोघरी मतदानाची स्लीप पोच केली जात आहे. त्याची जबाबदारी जिल्ह्यातील तीन हजार ७२३ बीएलओंवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक बीएलओ असून त्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येकाला मतदान स्लीप पोचायला हवी, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
मतदानाला जाताना प्रत्येक मतदारांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, ‘मनरेगा’ रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबुक, पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र किंवा भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र आवश्यक आहे.
दरम्यान, मतदानाला जाताना मतदारांकडे यादीतील क्रमांक असलेले स्लीप देखील असायला हवे. त्याचे वाटप प्रत्येक पक्षाकडून होते, पण त्यावर उमेदवाराचे चिन्ह व फोटो असतो. त्यामुळे ते मतदान केंद्रावर घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर बीएलओंकडून त्याचे वाटप सुरू आहे. दरम्यान, voter helpline app आणि voters.eci.gov.in या संकेतस्थळावरही मतदारांना त्यांचे मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक पाहता येणार आहे.
मतदानाला जाताना ही स्लीप सोबत ठेवावी
नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदारांचा शोध, अशा कामांसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक ‘बीएलओ’ नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून आता मतदानापूर्वी प्रत्येक मतदारांना मतदान स्लीप देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे वाटप सध्या सुरू असून त्यावर मतदान केंद्राचे नाव व क्रमांक आणि मतदार यादीतील क्रमांक नमूद असतो. मतदानाला जाताना ही स्लीप सोबत ठेवावी.
- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
कर्मचाऱ्यांचे १९ नोव्हेंबरला अंतिम ट्रेनिंग
विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघातील ३७२३ मतदान केंद्रांवरील ड्यूटीसाठी जवळपास १९ हजार कर्मचारी नेमले आहेत. त्यांचे दुसरे प्रशिक्षण ८ ते १४ नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबरला अंतिम प्रशिक्षण पार पडणार आहे. त्या दिवशी सर्व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रांवर जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.