सोलापूर : लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीवेळी अनेकजण ‘ईव्हीएम’बद्दल शंका उपस्थित करतात. पण, आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला पडले का?, याची खात्री मतदारांना करता येणार आहे. ‘ईव्हीएम’जवळील व्हीव्हीपॅट मशिनवर आपण ज्या उमेदवाराला मतदान केले, हे पाहता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघात एकूण तीन हजार ६१७ मतदान केंद्रे असून त्यातील एक हजार ८४० केंद्रांवर वेब कास्टिंगची यंत्रणा बसविली जाणार आहे. या यंत्रणेमुळे त्या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कार्यालयातून पाहता येणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीत जिल्ह्यात दहा हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
दरम्यान, काहीवेळा आपण केलेले मतदान दुसऱ्याच उमेदवाराला पडल्यासंबंधी देखील काहीजण आक्षेप घेतात. अशावेळी त्या तक्रारदार मतदाराचे म्हणणे ऐकून घेऊन तेथील केंद्राध्यक्ष सर्व पक्षांच्या पोलिंग एजंटांसमोर त्या मतदाराला पुन्हा मतदान करायला लावतात. त्यावेळी त्या मतदाराने केलेले मतदान त्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्यालाच गेल्याची खात्री करतात व त्याची शंका दूर करतात. मात्र, त्या मतदाराची तक्रार निराधार, बिनबुडाची असल्यास संबंधितावर कारवाई देखील होवू शकते, असे निवडणूक अधिकारी सांगतात. त्यामुळे विनाकारण तक्रार करण्यापेक्षा ‘व्हीव्हीपॅट’च्या काचेतून आपले मतदान अचूक झाल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी केले आहे.
संशय वाटल्यास चाचणी मतदान, पण...
‘ईव्हीएम’वर मतदान केल्यानंतर शेजारील व्हीव्हीपॅट मशिनवर आपण केलेले मतदान अचूक झाले की नाही, याची खात्री मतदारांना करता येते. कोणी मतदाराने आक्षेप घेतल्यास सर्वांना बोलावून पुन्हा एकदा चाचणी मतदान (टेस्ट व्होट) करण्यात येते. पण, त्यावेळी खोटी तक्रार केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई देखील होवू शकते.
- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
सरमिसळ पद्धतीने ‘ईव्हीएम’चे होणार वाटप
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील तीन हजार ६१७ मतदान केंद्रांसाठी प्रशासनाकडे सव्वापाच हजार ‘ईव्हीएम’ आहेत. आता या मशिन संगणकाद्वारे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर सरमिसळ पद्धतीने दोन्ही मतदारसंघाला वाटप केल्या जातील. पुढील आठवड्यात या सर्व मशिन तालुक्याच्या ठिकाणी पाठविल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा एप्रिलअखेर
शिक्षकांसह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त २३ ते २५ हजार कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होण्यापूर्वी ६ ते ९ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण एप्रिलअखेरीस होईल. शेवटचे प्रशिक्षण मतदानाच्या दोन दिवस अगोदर पार पडणार आहे. शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहूनच पहिल्या प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.