Solapur News : गाईच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपयांचा दर द्या, दुधाचे ठोस धोरण सरकारने ठरवावे. शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावे, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर (मंत्रालय) मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आज गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून नावारुपाला येत आहे. पण, लम्पी आणि कोरोना महामारी, लॉकडॉऊननंतर दूध व्यवसायासमोर अनेक अडचणी उभारल्या. तरीसुद्धा हा व्यवसाय आता उभारी घेत असतांना महाराष्ट्रातील दूध संघानी दुधाचे दर अचानक कमी केले.
एका बाजुला पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवांचे दर दुप्पट झाले असताना आणि प्रतिलिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दूध संघानी दर कमी का केला? याचे उत्तर राज्य शासनाने आणि दुध संघानी द्यावे.
दुधाची मागणी वाढलेली असताना दुधाचे दर कमी करून दुध संघ नफेखोरी करत आहेत का? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. आता गाईच्या दुधाला ४० व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ देण्याची मागणी आहे.
दधाला एफआरपी कायदा लागू करावा, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या ‘नंदिनी’ आणि गुजतरातच्या ‘अमुल’ ब्रॅन्डच्या धर्तीवर एक ब्रॅन्ड निर्माण करावा आणि ‘ना नफा ना तोटा’ अशा पद्धतीने हा व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हानिहाय दूध दरवाढीचे आंदोलन
पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दूध दरवाढीची मागणी शासनाकडून मान्य न झाल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे, असेही देखील यावेळी हाके यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, अमर पाटील यांच्यासह युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी, अतुल भवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे, पूजा खंदारे, संतोष केंगनाळकर, मोहसीन शेख, माणिक श्रीरामे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, अशोक भोसले आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.