सोलापूर शहराचा 14 वर्षांनी सुटणार पाणीप्रश्न! उजनी धरणावर ‘जॅकवेल’चे काम युद्धपातळीवर; 1300 एचपीचे 6 पंप उपसणार 24 तास पाणी; जलवाहिनीचे 103 किमी काम पूर्ण

सोलापूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांत सुटणार आहे. सोलापूर ते उजनी या ११० किलोमीटर जलवाहिनीचे काम १०३ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या उजनी धरणावरील जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचा पहिला स्लॅब बुधवारी (ता. १८) टाकण्यात आला. ४० कोटींचा खर्च करून जॅकवेल उभारणी सुरू असून, त्याठिकाणी १३०० अश्‍वशक्तीचे सहा पंप बसविले जातील.
solapur ujani dam
solapur ujani damsakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांत सुटणार आहे. सोलापूर ते उजनी या ११० किलोमीटर जलवाहिनीचे काम १०३ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या उजनी धरणावरील जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचा पहिला स्लॅब बुधवारी (ता. १८) टाकण्यात आला. ४० कोटींचा खर्च करून जॅकवेल उभारणी सुरू असून, त्याठिकाणी १३०० अश्‍वशक्तीचे सहा पंप बसविले जातील. त्याद्वारे २४ तास पाणी उपसा करणे शक्य होणार आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, सोलापूरकरांना नियमित किंवा एक-दोन दिवसाआड तरी पाणी मिळावे, यासाठी समांतर जलवाहिनीचे काम गतीने सुरू आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वात अवघ्या १५ महिन्यात १०० कि.मी. जलवाहिनी पूर्ण झाली आहे. समांतर जलवाहिनीसाठी जीएसटीसह ८९२ कोटी रुपये लागणार आहेत. त्यात २५० कोटी महापालिकेचे तर २५० कोटी रुपये ‘एनटीपीसी’चे आहेत. उर्वरित निधी हा नगरोत्थान योजनेतून मिळाला आहे.

पुढील ५० वर्षांचा विचार करून ही जलवाहिनी टाकली जात असून, १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर जलवाहिनीची चाचणी होईल. ते पुढे १५ दिवस सलग सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर साधारणत: १ जानेवारीपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात बदल करून आठवड्यातून एकदा दोन दिवसाला तर एकदा तीन दिवसाला पाणी सोडले जाणार आहे. सध्या जॅकवेलचे काम सुरू असून १५ ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण होईल, असे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.

सोलापूरकरांचा १४ वर्षांचा वनवास संपणार

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा २०१४ पासून तीन-चार दिवसांआड तर कधी पाच दिवसांआड झाला आहे. आता समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना आठवड्यात तीन व दोन दिवसांतून एकदा पाणी मिळणार आहे. ‘अमृत-२’योजनेतील कामे पूर्ण झाल्यास पुन्हा एक दिवसांआड किंवा नियमित पाणी शक्य होणार आहे. त्यासाठी ‘अमृत-२’मधून निधी मिळणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, समांतर जलवाहिनीला पाकणी ते कोंडी एमबीआरपर्यंत ६० एमएलडी जलवाहिनी जोडण्याचेही नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. जेणेकरून केगाव, बाळे, भवानी पेठ अशा परिसरातीला पुरेशा दाबाने पाणी देता येणार आहे.

३ ‘टीएमसी’त भागणार सोलापूरकरांची तहान

उजनी धरणावर पाणी उपसा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जॅकवेल उभारले जात आहे. त्याठिकाणी १३०० अश्‍वशक्तीचे सहा पंप बसविले जाणार असून, त्यातील दोन पंप अतिरिक्त असणार आहेत. दररोज २४ तास त्याद्वारे पाणी उपसा केला जाणार असून, २४ तासात १७० एमएलडी पाणी उपसा होईल. सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनीतून वर्षाला दोन टीएमसी तर जुन्या जलवाहिनीतून एक टीएमसी, असे एकूण तीन टीएमसी पाणी उजनीतून घेतले जाणार आहे. त्यामुळे भीमा नदीतून सोडावे लागणाऱ्या २० ते २२ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

नोव्हेंबरअखेर काम पूर्ण होऊन होईल ट्रायल

समांतर जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात असून, धरणापासून ८०० मीटर अंतरावरील रखडलेले काम काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर हिवरे, पाकणी, खंडाळ या परिसरातील १२०० मीटरवर वन विभागाची परवानगी जरूरी असून, त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय टेंभुर्णी बायपासजवळील १८०० मीटर जमीन १२ ते १३ शेतकऱ्यांच्या मालकीची असून, त्यांना मोबदला देऊन ते कामही पुढील महिन्यात पूर्ण होईल. नोव्हेंबरअखेर पाइपलाइनचे ट्रायल होईल.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.