सोलापूर : पावसाने यंदा सर्वांचीच चिंता वाढविली असून भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ६ नोव्हेंबरलाच १७८ टीएमसीपर्यंत पाणीसाठा आहे. प्रत्यक्षात या धरणांमध्ये २५० टीएमसी पाणी असणे अपेक्षित होते. मध्यम प्रकल्पांनीही आताच तळ गाठला असून सध्या राज्यातील टॅंकर्सची संख्या ४७०वर पोचली आहे. यंदाचा टंचाई आराखडा तब्बल ८५० कोटींपर्यंत असणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत आराखड्यातील वाढ ८०० कोटींहून अधिक असणार आहे.
गतवर्षी राज्यात पाऊस चांगला पडला होता, त्यामुळे राज्याचा एकूण टंचाई आराखडा अवघा ३४ कोटींचा होता. पण, यावेळी कोकण वगळता इतर विभागांमधील जिल्ह्यांचा टंचाई आराखडा तब्बल ८५० कोटींपर्यंत जाईल, अशी स्थिती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोकण वगळता नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या विभागांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे.
पावसाचा खंड व परतीच्या पावसाची दडी, या पार्श्वभूमीवर धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही ही वस्तुस्थिती आहे. जमिनीची पाणीपातळी सरासरी एक मीटरने खालावली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी ते १५ जून (पावसाळा सुरु होईपर्यंत) संपूर्ण राज्याला विशेषत: मोठ्या शहरांना टंचाईचा सामना करावा लागणार असून आतापासूनच त्या शहरांनी ठोस नियोजनाला सुरवात केली आहे.
भीमा खोऱ्यातील धरणांची स्थिती
भीमा खोऱ्यात २६ धरणे असून त्या सर्वांची पाणी साठवण क्षमता २५० टीएमसीपर्यंत आहे. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे उजनी धरण सध्या ५२ टक्क्यांवर असून फेब्रुवारीतच ते मायनस होईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे घोड व पानशेत वगळता इतर २४ धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असून विसापूर, टेमघर, खडकवासला, वीर, नाझरे, उजनी ही धरणे ५० ते ५५ टक्क्यांवर आली आहेत. त्यामुळे फेब्रुवारी ते जून या काळात टंचाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानले जात आहे.
आठवड्यात राज्यात वाढले १३० टॅंकर
राज्यातील पाणी टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून मागील आठवड्यात राज्यात तीनशे गावे व अकराशे वाड्या-वस्त्यांवर ३४० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पण, या आठवड्यात टॅंकर्सची संख्या ४७०वर पोचली आहे. सातारा जिल्ह्यात ७०हून अधिक तर नाशिक जिल्ह्यात १००हून जास्त टॅंकर सुरु झाले आहेत. आता सातत्याने टॅंकर्सची मागणी वाढत आहे.
टंचाईची सद्य:स्थिती
जूनपर्यंत टंचाई आराखडा
८५० कोटी
पाण्याचे टॅंकर्स
४७०
धरणातील सरासरी साठा
८७ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.