Unseasonal Rain : विदर्भ, खान्देशात दाणादाण; पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

आज विदर्भ आणि खान्देशसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि नगर या भागांमध्येही पाऊस
weather update Unseasonal Rain crop damage farmer agriculture akola jalgaon
weather update Unseasonal Rain crop damage farmer agriculture akola jalgaonsakal
Updated on

अकोला/ जळगाव : अवकाळी पावसाने गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना फटका दिल्यानंतर आज विदर्भ आणि खान्देशसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि नगर या भागांमध्येही पावसाने दाणादाण उडविली. अकोला आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले.

अकोल्यातील काही गावांमध्ये फळपीके आणि भाजीपाला पिकांनाही फटका बसला. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर काही जनावरांचाही मृत्यू झाला. इतर शहरांमध्ये पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळित झाले.

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस कोसळला. अकोल्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने जोरदार तडाखा दिला. दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडाली तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली.

बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व अकोला तालुक्यांतील काही गावांमध्ये गारपीट झाली. त्यामुळे कांदा पिकासह लिंबू, संत्री, केळी व इतर फळबागांना मोठा फटका बसला आहे. कानशिवणी परिसरामध्ये गारपिटीमुळे सहा ते सात गावांना बसला. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने कांदा, भुईमूग, उन्हाळी मूग, टोमॅटो, लिंबू आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

आंब्यांचा बहरही गळून गेला. माझोड येथे गारांच्या मारामुळे दहा बकऱ्या दगावल्या. हवेचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी लिंबूची झाडे उन्मळून पडली. खान्देशात जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर (ता. जामनेर) परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही वेळ गारा देखील पडल्या.

पाऊस सुरु झाल्यानंतर वादळही आल्याने काही घरांची पत्रे उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या अवकाळीने बाजारात पाल बांधलेल्या दुकानदारांची एकच धांदल उडून अनेकांचे नुकसानही झाले. काही वेळ पावसाचा जोर अधिक असल्याने शेतांमध्ये पाणी साचले होते. आजच्या अवकाळी पावसामुळे पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

इतर जिल्ह्यांतही पाऊस

  • सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर शहर मोहोळसह अनेक तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

  • सातारा शहर, तालुका आणि वाई तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस

  • जळगावमध्ये पावसामुळे मका, गहू, सूर्यफूल आणि केळीच्या पिकाला फटका

  • कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.