प्रणिती शिंदेंनी आमदारकीची हॅट्रिक केलेल्या मतदारसंघातील स्थिती काय? पुरुषांपेक्षा महिलांचेच मतदान अधिक, कशी अन्‌ कोणाकोणात आहे लढत, वाचा सविस्तर

शहर मध्य मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तीन टर्म येथून प्रणिती शिंदे या आमदार होत्या. त्या खासदार झाल्यानंतर पक्षाने चेतन नरोटे यांना पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात उतरविले आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
MP Praniti Shinde solapur
MP Praniti Shinde solapuresakal
Updated on

सोलापूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी) आपल्याला फायदेशीर असा विरोधातील उमेदवार कसा रिंगणात राहील, याची खबरदारी प्रमुख पक्षांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. तर अनेकांनी आपल्या मतांवर परिणाम करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून प्रमुख उमेदवारांनी त्या अपक्ष उमेदवारांची पाठ सोडलीच नाही. तरीपण, शहर मध्य मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. प्रामुख्याने या मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे.

शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तीन टर्म येथून प्रणिती शिंदे या आमदार होत्या. त्या खासदार झाल्यानंतर पक्षाने चेतन नरोटे यांना पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात उतरविले आहे. या मतदारसंघात आता काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे देवेंद्र कोठे, एमआयएमचे फारुक शाब्दी, माकपचे नरसय्या आडम व अपक्ष तौफिक शेख अशी पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

देवेंद्र कोठे (भाजप), चेतन नरोटे (काँग्रेस), फारुक शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप) या उमेदवारांशिवाय प्रा. डॉ. सुभाष गायकवाड (बसप), खिझार पिरजादे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मनीष कोमटी (राष्ट्रीय जनमंच सेक्युलर), योगेश शिदगणे (बहुजन मुक्ती पार्टी), रविकांत बनसोडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), श्रीनिवास संगेपांग (वंचित बहुजन आघाडी) यांच्याशिवाय तौफिक शेख, दत्तात्रय थोरात, देविदास दुपारगुडे, प्रदीप सर्जन, मनीष गायकवाड, रवी म्हेत्रे, ॲड. रोहित मोरे, विक्रम कसबे, सैपन शेख, डॉ. संदीप आडके हे उमेदवार अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. अपक्ष उमेदवार किती मते घेतात, यावर प्रमुख पक्षांतील कोणता उमेदवार विजयी होणार, याची समीकरणे अवलंबून असणार आहेत. या मतदारसंघातून आता एकूण २० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

शेवटच्या दिवशी ‘या’ १९ जणांची माघार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. ४) गौस कुरेशी, युसूफखान बशीर अहमद पठाण, सादिक अली फारुक शेख, मुस्तफा मकबुल शाब्दी, सादिक महबूब नदाफ, संतोष येमूल, अबुहुरेरा सय्यद, शिवराज गायकवाड, मनीष काळजे, अशोक बोकीवाले, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, शौकत पठाण, अंबादास गोरंटला, श्रीदेवी फुलारे, नागेश पासकंटी, रघुरामुलू कंदिकटला, श्रीनिवास संगा, प्रमोद गायकवाड या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

तीन मिनिटे विलंबामुळे तौफिक शेख यांचा अर्ज राहिला

शहर मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले तौफिक शेख काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण, दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी तौफिक शेख निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी भाजप उमेदवाराचे वकील ॲड. योगेश कुरे यांनी अर्ज मागे घेण्यास हरकत घेतली. तीन मिनिटे विलंबाने दाखल झालेल्या तौफिक शेख यांना अर्ज मागे घेता येणार नाही, अशी बाजू ॲड. कुरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यामुळे त्यांना अर्ज मागे घेता आला नाही.

महिला मतदारांची संख्या सर्वाधिक

शहर मध्य या मतदारसंघातील मतदारांची संख्या एकूण तीन लाख ४६ हजार ६७७ इतकी आहे. २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघात ५५.७१ टक्के मतदान झाले होते. २०१४ व २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक लाख ७० हजारांपर्यंत मतदान झाले आहे. या निवडणुकीत साडेतीन लाखांपैकी किती मतदान होणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यावर उमेदवारांचा भर राहील हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.