Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक. इथल्या जनतेनं आळीपाळीने काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला संधी दिली आहे. पण १९९९ नंतर तो मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड राहिला आहे. आता यंदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र असणारे तशा जागावाटपही बऱ्याच ठिकाणी झालंय. त्यामुळे जळगावातही अशीच लढत पहायला मिळणार होती.
पण त्याउलट आता ही लढत भाजप विरुद्ध भाजपचेच विद्यमान खासदार अशी होणारे आणि त्यामुळेच भाजपचे टेंन्शन वाढलंय. म्हणजे भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण स्वत: उमेदवारी न घेता आपल्या मित्राला म्हणजे करण पवारांना उमेदवारी दिली.
आता जरी उमेदवार करण पवार असले तरी उन्मेष पाटलांसाठी ती निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजपचेच विद्यमान खासदार अशी होणार आहे. पण ठाकरेंनी या मतदारसंघात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती? करण पवार नेमके कोण आहेत? जाणून घेऊ....
जळगावातून भाजपकडून उन्मेश पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. पण ऐनवेळी भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत हातात ठाकरेंचं शिवबंधन बांधलं. त्यामुळे जळगाव लोकसभेची भाजपला सोपी वाटणारी जागा 'डेन्जर झोन' मध्ये गेल्याचे बोलले जातंय. उन्मेष पाटलांसोबत पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ही प्रवेश केला.
आता विद्यमान खासदार राहिलेले उन्मेष पाटील यांना सहज उमेदवारी मिळाली असती. कारण ठाकरेंकडे किंवा महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवारी असा कोणी नव्हता. सुरवातीला स्मिता वाघांना अमळनेरमधूनच ललिता पाटील यांचा प्रवेश करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण पाटलांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई न करता ठाकरे गट वेट अॅड वॉचच्या भुमिकेत होते.
अशात उन्मेष पाटील ठाकरेंच्या गळाला लागले. पण उन्मेश पाटीलांनीही स्वत: उमेदवारी न घेता मित्र असलेल्या करण पवारांना उमेदवारी द्यायला सांगितली आणि करण पवारांना निवडून आणण्याची शपथ उन्मेष पाटील यांनी घेतली.
त्यामुळे भाजपसमोर पक्षांतर्गत आव्हान उभं राहिलं. आता करण पवार यांच्या बद्दल सांगायच तर करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. पारोळा - एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. भास्करराव पाटील हे २० वर्ष आमदार होते. राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत. मराठा समजाचा तरुण चेहरा अशी त्यांची ओळख. करण पवार हे आधी राष्ट्रवादीत होते. 2009 ला राष्ट्रवादीकडून नगर सेवक म्हणून निवडून आले. मात्र २०१४ ला मोदी लाटेत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे ते जवळचे मानले जातात. सर्व पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत . एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी चांगलीच तयारी केली होती. आता भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात करण पवारांची ताकद किती? पारोळ्यात तर ते नगराध्यक्ष असल्याचे या भागात त्यांची ताकद आहे. त्यात एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी तयारी केल्यानं पारोळा, एरंडोल, भडगावात चांगला करण पवारांचा चांगला जनसंपर्क आहे.
दुसरीकडे चाळीसगावातून उन्मेष पाटील हे त्यांच्यामागे मोठी ताकद उभी करू शकतात. उन्मेष पाटील स्वत: खासदार असल्याने ते बळही पवारांच्या मागे असेल. जळगाव शहरात त्यांचा असलेला मित्र परिवार, ठाकरे गटाची असलेली ताकद त्यांना बळ देणारी आहे. शिवाय महाविकास आघाडीचे मित्र पक्ष व काका माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील यांचे पाठबळ त्यांना ताकद देणारे ठरू शकते. त्यात भाजपच्या शहरातील या फुटीचा फायदा करण पवारांना होईल. त्यामुळे स्मिता वाघांना तगडी लढत मिळण्याची शक्यता आहे.
पण करण पवारांना मिळणारा राजकीय पाठींबा आणि जमेच्या बाजू पाहता भाजप आता आपला उमेदवार बदल्याच्या तयारीत आहे. पवारांना पारोळ्यातूनच आव्हान उभे करत दहा वर्ष खासदार असलेले ए.टी.नाना पाटील यांना उमेदवारी देण्याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भाजपचे संकटमोचक आणि जळगावची जबाबदारी असलेले गिरीश महाजन आणि ए.टी.पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.
कारण पारोळ्यात जितकी ताकद करण पवारांची आहे. तशीच तोडीसतोड ताकद ए.टी.पाटलांची आहे. दहा वर्ष खासदार असल्यानं इतर मतदारसंघातही त्यांना मानणारा मोठा गट आहे. त्यात चाळीसगाव जिथून उन्मेष पाटलांचे पाठबळ पवारांना मिळू शकते. ते चाळीसगाव ए.टी.पाटलांची सासुरवाडी आहे. त्यामुळे ती एक जमेची बाजू. त्यामुळे करण पवारांच्या विरोधात एस. टी. पाटील ते तोडीसतोड उमेदवार ठरू शकतात. पण आधीच स्मिता वाघांना उमदेवारी जाहीर झालेली असताना तशी तयारी सुरु झालेली असताना त्यात विद्यमान खासादाराने पक्षांतर केलेलं असताना अचानक उमेदवार बदलण्याची रिस्क भाजप घेणार नाही.
कारण २०१९ लाच लोकसभेसाठी स्मिता वाघांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. पण उन्मेष पाटलांना उमेदवारी देत स्मिता वाघांना माघार घ्यावी लागली होती. पण त्यावेळी तडकाफडकी निर्णय न घेता स्मिता वाघ यांनी भाजपाप्रती आपली निष्ठा दाखवली, जी उन्मेष पाटलांनी दाखवली नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा एका महिला उमेदवाराचे तिकीट कापणे भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे जळगावचा गड भाजप कायम राखणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.