सोलापूर : नोंदणी कायद्यानुसार जागा- जमिनीच्या खरेदी व विक्रीवेळी दोन सज्ञान (१८ वर्षांवरील) साक्षीदारांचे बंधन घालण्यात आले आहे. पण, एकापेक्षा अधिक व्यवहारात पुन्हा तेच ते साक्षीदार नसावेत, जेणेकरून बनावट व्यवहाराला चाप बसेल या हेतूने नोंदणी महानिरीक्षकांनी काही महिन्यांपूर्वी एक परिपत्रक काढले आहे. तरीपण, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही अशी वस्तुस्थिती आहे. जागा किंवा जमिनीच्या फसवणुकीसंदर्भात पोलिसांत दाखल गुन्ह्यांवरून अनेक व्यवहारांमध्ये त्याच व्यक्ती साक्षीदार असल्याचे पहायला मिळते.
मुलांच्या भविष्याचा विचार करून आई-वडिलांनी जागा- जमीन जतन करून ठेवलेली असते. काहीजण वडिलोपार्जित जागा- जमीन आठवण म्हणून जपून ठेवतात. मात्र, मूळ मालकाला कागदपत्रातील काही समजत नाही, त्या जागा- जमिनीकडे त्याचे लक्ष नाही हे हेरून अनेकजण त्यांच्या ओळखीतील लोक बनावट कागदपत्रांद्वारे ती जागा किंवा जमीन बळकावतात. त्यांची सहमती नसताना, त्यांची खरेदीदस्तावेळी उपस्थिती नसताना देखील ती प्रॉपर्टी बळकावली जातेच कशी, हा प्रश्न अनेकांना आहे.
खरेदीदस्तावेळी दोन साक्षीदार त्यांच्याच ओळखीचे घेतल्यास, आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक केल्यास आणि तलाठ्याकडे नावनोंदीसाठी दस्त दिल्यावर पारदर्शकपणे ज्या मूळ मालकाची ती मालमत्ता आहे त्यांना नोटीस पोच झाल्यास निश्चितपणे बनावट व्यवहार थांबतील, असे अधिकारी सांगतात. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने अनेक मूळ मालक आजही न्यायासाठी पोलिस ठाणे, न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असल्याचे चित्र आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेरच काहींचे ठाण
तालुक्यातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयाबाहेर काहीजण आवर्जुन सकाळपासून बसलेले असतात. त्यांच्याकडे ढिगाने फोटो काढलेले असतात. खरेदीदस्त तयार करणाऱ्यांसोबत त्यांची ओळख असते. खरेदी-विक्रीचा दस्त करताना अनेकांना ओळखीचे साक्षीदार घेणे अडचणीचे ठरते. त्यावेळी त्याठिकाणी बसलेल्या व्यक्तींना साक्षीदार म्हणून घेतले जाते. वास्तविक पाहता ते साक्षीदार खरेदी घेणारा व विक्री करणाऱ्याला देखील ओळखत नसतात. पण, काही २०० ते ५०० रुपये दिले की ते कोणालाही साक्षीदार व्हायला तयार असतात.
नोंदणी महानिरीक्षकांच्या पत्रानुसार...
नोंदणी कायद्यात खरेदी- विक्रीच्या व्यवहारावेळी दोन सज्ञान साक्षीदार बंधनकारक आहे. पण, साक्षीदार कोण असावेत यासंदर्भात सविस्तर भाष्य नाही. अनेक व्यवहारात ठराविक व्यक्तीच त्याही अनोळखी व्यक्ती साक्षीदार असल्याच्या तक्रारीनंतर नोंदणी महानिरीक्षकांनी असा प्रकार होऊ नये म्हणून एक परिपत्रक काढले. बनावट कागदपत्रांद्वारे जागा किंवा जमीन बळकावल्याच्या गुन्ह्यात पोलिस कार्यालयात येतात, अधिकाऱ्यांची चौकशी करतात, न्यायालयात साक्ष द्यावी लागते. हा प्रकार टाळण्यासाठी खरेदीदस्तात तेच ते साक्षीदार नसावेत, असे त्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
परिपत्रक आहे, पण कायद्यात सज्ञान साक्षीदार घेण्याचा नियम
जागा किंवा जमिनीच्या खरेदीदस्तावेळी दोन सज्ञान साक्षीदार असावेत, असे कायद्यात नमूद आहे. तर विभागाच्या परिपत्रकानुसार अनेक व्यवहारात तेच ते साक्षीदार नसावेत, असे स्पष्ट केले आहे. अधिकारी कायद्याचे पालन करतात, त्यामुळे कायद्यात कायमची दुरुस्ती अपेक्षित आहे.
- गोविंद गिते, निवृत्त मुद्रांक शुल्क जिल्हा अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.