सोलापूर : राज्य सरकारच्या ‘एक रुपयात पीकविमा’अंतर्गत गतवर्षीच्या ९६ लाखात १० ते १५ लाख शेतकरी वाढतील असा अंदाज होता. पण, तब्बल एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आणि सरकारचे गणितच बिघडले. आता शेतकरी हिस्सा १५५१ कोटी रुपये विमा कंपन्यांना द्यायचा कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्यासाठी बजेटमध्ये वाढीव तरतूद करायची की आकस्मिक निधीतून ही रक्कम द्यायची, याचा विचारविनिमय सुरु आहे.
गतवर्षी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा उतरविला होता. यंदा शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना जाहीर केली आणि गतवर्षीच्या तुलनेत शेतकरी संख्या दुप्पट झाली. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचा १५५१ कोटींचा हिस्सा विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ही रक्कम मिळाल्याशिवाय विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना २५ टक्क्यांची भरपाई मिळणारच नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यावर २१ दिवसांत भरपाई मिळणे अपेक्षित आहे. पण, सध्या सोलापूरसह बहुतेक जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून १५ दिवस झाले, तरीदेखील शेतकऱ्यास भरपाई मिळालेली नाही. एवढी मोठी रक्कम द्यायची अशी यावर मार्ग शोधला जात आहे. दरम्यान, ही रक्कम देण्यासाठी एकतर बजेटमध्ये वाढीव तरतूद करावी लागणार आहे किंवा राज्य आकस्मिक निधीतून विमा कंपन्यांना शेतकरी हिस्सा द्यावा लागणार आहे. पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तत्काळ मदत मिळावी यासाठी सरकारला तातडीने यासंबंधीचा निर्णय घ्यावाच लागेल, असे ‘कृषी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
२३ तालुक्यात चिंताजनक स्थिती
राज्यातील २३ तालुक्यांमध्ये १ जूनपासून सरासरीच्या ६० ते ७० टक्के पाऊस कमी झाला असून खरीप पूर्णपणे वाया गेला असून आता रब्बीच्या पेरण्याही करता येणार नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, नगरमधील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, पुणे जिल्ह्यातील शिरुर, बारामती, दौंड, पुरंदर (सासवड), हवेली (पुणे), सांगलीतील कडेगाव, खानापूर (विटा), कोल्हापुरातील चंदगड, राधानगरी, बीड जिल्ह्यातील वडवणी, परळी, अकोल्यातील अकोट आणि अमरावतीतील दर्यापूर या तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर या तालुक्यातही अशीच स्थिती आहे.
पाऊस नसलेली विभागनिहाय मंडळे
विभाग १५ ते २१ दिवा खंड २१ दिवसांहून अधिक खंड
नाशिक ८७ ७८
पुणे ६६ १७२
कोल्हापूर ४७ १००
छ. संभाजीनगर १०२ ३४
लातूर १२४ ५७
अमरावती १७२ १५
नागपूर १४ ००
एकूण ६१२ ४५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.