सोलापूर : सध्याचा सत्ता संघर्ष, मंत्र्यांचे दौरे, सभा, आंदोलने, मोर्चा, त्यात पुन्हा सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आणि पुन्हा नियमित काम, गुन्ह्यांचा तपास व कौटुंबिक जबाबदारी, अशा अनेक भूमिका पोलिसांना पार पाडाव्या लागत आहेत. सध्या लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ खूप कमी. वर्षातील ३६५ दिवसांतील तब्बल १८० ते २८० दिवस बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. उर्वरित दिवसांमध्ये तपास काम अन् कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतोय. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिकदृष्ट्या देखील पोलिसांच्या अडचणी वाढत आहेत. ४५ टक्क्यांपेक्षा अधिकजणांना बीपी, शुगर, अशा समस्या असल्याची स्थिती आहे.
मुलांना आई-वडिलांनी योग्यवेळी पुरेसा वेळ द्यायची गरज असतनाही आणि वयस्क माता-पित्यांच्या आरोग्यकडे वेळोवेळी लक्ष द्यावे लागत असतानाही पोलिसांना बंदोबस्त, तपास काम वेळेतच करावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिसांच्या किरकोळ रजा १२ वरून २० केल्या. दुसरीकडे महिला अंमलदारांना आठ तासाची ड्यूटी करण्याचा निर्णय झाला, पण मनुष्यबळ कमी असल्याने अजूनही बहुतेक शहर-जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी नाही.
तसेच बंदोबस्ताच्या ड्युटीमुळे त्यांना हक्काच्या सुट्ट्या देखील घेता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या वर्षी प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमसपर्यंत पोलिसांसह सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्ट्या आहेत. मात्र, त्यावेळी पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त आहेच. तत्पूर्वी, मंत्री, माजी मंत्र्यांच्या सभा होतील. तसेच दरम्यानच्या काळात विविध प्रश्नांवरून काढलेले जाणारे मोर्चे, आंदोलनावेळी देखील पोलिसांनाच बंदोबस्त द्यावा लागणार आहे.
आरोग्य शिबिरांमधून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापुरात सण-उत्सव व महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आंदोलन व मोर्चाचे मुख्यालय सोलापूर असल्याने त्यावेळी देखील पोलिस बंदोबस्त लागतो. यासह इतर बंदोबस्त असतो, असा वर्षभरात एकूण २३० ते २६० दिवस पोलिसांना बंदोबस्त असतो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी शिबिरे राबवली जातात.
- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
...तरीही, गुन्ह्यांच्या तपासात आघाडीवर
सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, पंढरपूर वारी, आंदोलने, मोर्चा अशा अनेक प्रसंगात ग्रामीण पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना वर्षभरात साधारणत: १६० ते १८० दिवस बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. तरीपण, गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करण्यात ग्रामीण पोलिस आघाडीवर आहे.
- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
शहर-ग्रामीण पोलिसांचे मनुष्यबळ
शहर पोलिस दल
एकूण पदे मंजूर
२०९२
चालक शिपाई
९६
रिक्त पदे
२५०
फिल्डवरील मनुष्यबळ
१७४६
-----------------
ग्रामीण पोलिस दल
एकूण मंजूर पदे
२४६१
चालक शिपाई
५९
रिक्त पदे
१६५
फिल्डवरील मनुष्यबळ
१८५९
पोलिस स्वास्थासाठी शासनाकडे मास्टर प्लॅन काय?
दररोज किमान सहा ते आठ तास झोप घ्यावी, रात्री उशिरा जेवण करू नये, पहाटे सुर्योदयापूर्वी उठणे हे सदृढ आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. मात्र, पोलिसांवरील कामाचा ताण जास्त असल्याने अशा गोष्टी शक्य होतच नाहीत. कमी मनुष्यबळ असतानाही कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आणि स्वत:च्या कुटुंबातील चिमुकल्यांसह पती-पत्नी, आई-वडिलांपेक्षाही सामाजिक प्रश्नांकडे अधिक लक्ष देणाऱ्या पोलिसांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी सरकारकडे काहीच मास्टर प्लॅन नाही. उपाशीपोटी क्रांती होतच नाही, अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे शासनालाा गांभीर्याने पाहावेच लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.