सोलापूर : सध्या दहावी- बारावीची परीक्षा काही दिवसांवर आल्याने कॉपीमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १४) बैठक बोलावली आहे. पण, मुलीच्या विवाहामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी १२ ते १७ फेब्रुवारीपर्यंत रजेचा अर्ज दिला आहे. तेवढ्या दिवसाच्या रजेवर श्री. फडके ठाम असल्याने या बैठकीला कोण जाणार हे निश्चित नाही. दुसरीकडे फडकेंच्या रजेच्या काळात विभागाचा पदभार कोण सांभाळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानतंर या विभागाची जबाबदारी कधी श्री. नाळे तर कधी महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांनी सांभाळली. त्यानंतर शासनाकडून मारूती फडके यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली. पण, शालार्थ आयडीच्या प्रस्तावांची छाननी करताना काही मान्यतांची आवक- जावक नोंदवहीच गहाळ असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद द्यावी लागली. तर कार्यालयात पूर्वीच्या कामाचा ढिग, दररोज भेटायला येणाऱ्यांची गर्दी, अशा बाबी समोर होत्या. पण, आजारपणामुळे श्री. फडकेंनी एक महिन्याच्या रजेचा अर्ज दिला. तो मंजूर होत नसल्याने त्यांनी पाच वर्षांची सेवा शिल्लक असतानाही स्वेच्छानिवृत्तीचाही अर्ज दिला. या सर्व बाबी संपल्या आणि आता काही दिवसांपूर्वी श्री. फडके पुन्हा रूजू झाले. आता नेमकी बोर्डाच्या परीक्षेची घाई सुरू असतानाच त्यांनी मुलीचा विवाह असल्याने रजा मागितली आहे. त्यांचे कारण रास्त आहे, पण त्यांना तीन दिवसाचीच रजा मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, आपल्या कुटुंबातील पहिलेच लग्न असल्याने विवाहासाठी रितसर अर्ज केला असून अर्जानुसार तेवढीच रजा मिळेल, अशी आशा त्यांना आहे.
उपसंचालकांनाही ‘प्रभारी’ नेमण्याचा अधिकार
इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षेच्या नियोजनासाठी उद्या (मंगळवारी) पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर विस्ताराधिकाऱ्यांसह माध्यमिक शिक्षणमधील सर्वच अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार असून रविवार ते सोमवार सुट्ट्या आहेत. त्यामुळे जे काही नियोजन करायचे ते याच आठवड्यात १७ फेब्रुवारीपर्यंत करावे लागणार आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रभारी जबाबदारी कोणाकडे नाही दिली तर उपसंचालकांकडे तशी मागणी करण्याची कुजबूज माध्यमिक शिक्षण कार्यालयात सोमवारी सुरू होती. आता या विभागाची जबाबदारी श्री. फडके रजेवरून परत येईपर्यंत कोणाकडे दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.