‘लेन कटींग’ अपघाताचे प्रमुख कारण! ऑनलाइन दंड करून सोडणे कितपत योग्य? बेशिस्तांकडून कोट्यवधी दंड वसूल करणाऱ्या यंत्रणांसमोर रस्ते अपघात रोखण्याचे आव्हान

भरधाव ट्रकने चिरडल्याने महूद-दिघंची मार्गावर एका कुमारवयीन मुलीसह सहाजणींच्या झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायक आहे. मजुरी करुन पोट भरणाऱ्या त्या महिलांचा गेलेला बळी चिंतेचा विषय ठरला आहे. सोलापूर हा अपघातप्रवण जिल्ह्यातील राज्यात कधी तिसर्‍या तर कधी चौथ्या क्रमांकावरील जिल्हा आहे.
sakal solapur
accidentaccident
Updated on

सोलापूर : भरधाव ट्रकने चिरडल्याने महूद-दिघंची मार्गावर एका कुमारवयीन मुलीसह सहाजणींच्या झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायक आहे. मजुरी करुन पोट भरणाऱ्या त्या महिलांचा गेलेला बळी चिंतेचा विषय ठरला आहे. सोलापूर हा अपघातप्रवण जिल्ह्यातील राज्यात कधी तिसर्‍या तर कधी चौथ्या क्रमांकावरील जिल्हा आहे. चालकाची झोप, प्रवाशांची मानसिकता बदलली गेली नाही तर हकनाक बळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कटफळ (ता. सांगोला) येथे झालेल्या अपघातास पूर्णपणे चालकच जबाबदार असल्याचे स्पष्ट आहे. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला बसलेल्या महिलांचा हकनाक बळी गेला. तुटपुंज्या मदतनिधीने ही हानी भरून निघणे अशक्यच आहे. त्या महिलांच्या जीवितहानीने सोलापूर व अपघात याचे समीकरण पुन्हा एकदा पटलावर आले आहे.एकंदरीतच गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीतून सोलापुरातील महामार्गांवरील वाहतुकीचे जीवघेणे वास्तव समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाचा वर्षात 421 अपघातात 228 जणांचा गेलेला बळी चिंतेचा विषय आहे. महामार्ग दळणवळणासाठी सोयीचे ठरण्यापेक्षा मृत्यूचे सापळेच ठरु लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्याची कारणमिमांसा करताना आपणच आपल्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे, असे वाटते.राज्यातील अध्यात्मिक पंढरी म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. पंढरपूर, अक्कलकोटबरोबरच शेजारच्या तुळजापूर व गाणगापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. कोरोनानंतर जगण्याच्या अस्थिरतेमुळे या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांच्या संख्येत कैकपटीने वाढ झालेली आहे.

प्रत्येक शनिवार-रविवारी तसेच जोडून आलेल्या सुट्टीदिवशी खासगी वाहनांतून येथे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. अक्कलकोटला निवासस्थानांची संख्या कमी अन् परगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या पाचपट अशी स्थिती सुट्टीच्या कालावधीत होत असल्याचे चित्र आहे. धकाधकीच्या जीवनात कशाचीच गॅरंटीच नसल्याची भावना दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. त्यातून हा मार्ग वाढीस लागला आहे.सोलापूर जिल्ह्यातील दळणवळणात रस्त्यांची स्थिती उत्तम झालेली आहे. सोलापूर-औरंगाबाद, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-बंगळुरु, सोलापूर-पुणे या सर्व मार्गांचे चौपदरीकरण झाल्याने वाहनांच्या वेगात वाढ झाली आहे. अतिवेगात जाणारी वाहने पाहली की छातीत धस्स होते. तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणारे सर्वच रस्त्यांची स्थिती उत्तम झाली आहे. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांपेक्षा खासगी वाहनांचा प्रवास सुखकर व कमी खर्चाचा ठरु लागला आहे. यामुळे खासगी वाहनांच्या व त्यातून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत अलिकडील काळात वाढ झाली आहे. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त प्रवास, किलोमीटरचा हिशेब, मुक्कामापेक्षा रात्रीचा प्रवास व सतत ड्रायव्हिंग यातून अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवस-रात्र वाहन चालविताना चालकाची पूर्ण झोप न झाल्याने त्याच्या मानसिक संतुलनावर झालेल्या परिणामातून अपघात वाढल्याचेही अनेकदा समोर आले आहे.

वाहनचालक व प्रशासनाची जबाबदारी

सोलापूर जिल्ह्यातील आठ महामार्गावर असलेल्या ३६ ब्लॅकस्पॉटमुळे अपघात होत असताना संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हे एकीकडे खरे असले तरी दुसरीकडे सोलापूर शहर-जिल्ह्यात शेकडो मैलावरून वाहने येतात. त्यांना रस्त्याचा नेमका अंदाज नसतो. या मार्गावर वाहन चालविताना आपली काळजी आपणच घ्यावी लागणार आहे.

लक्ष्यवेधी...

  • चालकाची पूर्ण झोप आवश्‍यक, सलग ड्रायव्हिंग नको

  • अतिवेग धोकादायक, रस्त्याची ओळख नसल्याने सावधानता बाळगावी

  • चालकाचे मद्यप्राशन व बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यावर ठोस कारवाई नाही

    महामार्गावर चुकीच्या ठिकाणचे पार्किंग- चुकीचे ओव्हरटेकींग, महामार्गावर थांबलेली वाहने

  • क्षमतेपेक्षा जादा प्रवासी, रस्त्यांवरील खड्डे

'लेन कटींग' अपघाताचे प्रमुख कारण...

चारपदरी, सहापदरी महामार्ग झाले, पण सर्विस रोड ठेवला मोकळा आणि चकाचक नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी असो की कामगार महिला- पुरुष हे दररोज कामावर जाण्यासाठी मुख्य महामार्गावर येऊन वाहनांची वाट पहात थांबलेले दिसतात. त्यावेळी अनेक वाहने लेन कटींगचा नियम पायदळी तुडवून भरधाव वेगाने निघून जातात. वास्तविक पाहता आरटीओ, स्थानिक वाहतूक पोलिस व महामार्ग पोलिस आणि इंटरसेफ्टर वाहने, या यंत्रणांनी लेन कटींग या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. महूद-दिघंची मार्गावरील अपघातात ट्रक चालकाने लेन कटींगचा नियम मोडल्याने झाल्याचे पाहायला मिळाले.

नुसता ऑनलाइन दंड करून सोडणे कितपत योग्य?

रस्ता सुरक्षेसाठी म्हणजेच जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघात होऊ नयेत, वाढलेले अपघात नियंत्रणात आणणे, अपघातप्रवण ठिकाणी सुविधा करणे अशा उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा रस्ता सुरक्षा समिती करते. त्या समित्यांची किमान 1 ते 3 महिन्याला बैठक व्हावीच असा नियम आहे. अपघात रोखण्यासाठी आता दंड वाढवला आहे. पण, अपघात रोखणे हाच खरा प्रामाणिक हेतू असल्यास एखाद्याने नियम मोडला तर त्याला ऑनलाइन ई- चालान फाडले जाते. दुसरीकडे नियम मोडून बिनधास्तपणे पुढे जाणार्‍या चालकाला इंटरसेफ्टर वाहने ऑनलाइन दंड करतात आणि ती वाहने पुढे तशीच मार्गांवर धावतात अशी वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.