राज्यात सत्तापालट होणार? बंडखोर ४१ आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात

भाजपनेही सरकार अल्पमतात असून अविश्वास ठराव पारित करून बहुमत सिध्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या १०५ आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे आगामी ती-चार दिवसांत राज्यात सत्तापालट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Mahavikas-Aaghadi
Mahavikas-Aaghadisakal
Updated on

सोलापूर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय ४१ बंडखोर आमदारांपैकी कोणीच मुंबईत येणार नाही. राजीनामा दिल्यानंतरच समोरासमोर चर्चा करू, अशी भूमिका गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदांनी विशेषत: एकनाथ शिंदेंनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे भाजपनेही सरकार अल्पमतात असून अविश्वास ठराव पारित करून बहुमत सिध्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या १०५ आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे आगामी ती-चार दिवसांत राज्यात सत्तापालट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Mahavikas-Aaghadi
ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल? बंडात ९ मंत्र्यांचा सहभाग

महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे ५५, काँग्रेसकडे ४४ आणि राष्ट्रवादीकडे ५४ आमदार आहेत. त्यांना आठ-दहा अपक्षांचाही पाठिंबा असून त्यातील काहीजण सत्ता ज्यांची त्यांच्या बाजूने जातील, असे बोलले जात आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे सत्ता स्थापन करण्यापूर्वी अपक्षांच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीकडे जवळपास १७० आमदारांचे संख्याबळ होते. मात्र, आता त्यातील शिवसेनेच्या ४२ आमदारांनी सरकारविरूध्दच बंड पुकारले आहे. त्यामुळे अपक्षांचा पाठिंबा असतानाही महाविकास आघाडी सरकारकडे १४४ आमदार नाहीत, असे चित्र आहे. हीच संधी साधून भाजपने आता सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने राजभवनातील दौरे, संपर्क वाढविल्याचीही चर्चा आहे. पण, अजूनपर्यंत शिंदेंचा गट स्थापन न झाल्याने राज्यपाल किंवा विरोधकांना पुढील कार्यवाही करता येत नसल्याचे चित्र आहे. पहिल्यांदा गट स्थापनेसाठी शिंदेंकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, सरकारविरूध्द अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी उद्या (बुधवारी) बंडखोरांपैकी एक वरिष्ठ आमदार तथा मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. पण, पक्षातील आमदारांनी बंडखोरी केल्याने आपल्याला राजीनामा द्यावा लागला हा ठपका लागू नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आज (मंगळवारी) बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले. पण, बंडखोर आमदार महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी दोन दिवसांत राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mahavikas-Aaghadi
शेतकऱ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा! जुलैअखेर मिळणार ५० हजारांचे अनुदान

गुवाहाटीला न आलेले आमदारही संपर्कात

शिवसेनेचे सध्या राज्यात ५५ आमदार असून त्यातील ४१ आमदार सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत. त्यातील १६ ते १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शिंदेंना कमी आमदारांमध्ये गट स्थापन करता येणार नाही, हे त्यांना सांगायचे होते. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत न गेलेल्या १४ आमदारांपैकी पाच-सहा आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे बंडखोरी केलेल्या आमदारांमधील एकाने सांगितले. अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर सरकारला बहुमत सिध्द करावे लागेल आणि त्यावेळी गुवाहाटतील आमदार उपस्थित राहतील, असे अपेक्षित आहे. पण, तत्पूर्वी शिंदेंचा स्वतंत्र गट स्थापन होऊन त्याला मान्यता जरूरी आहे. त्यामुळे त्यासंदर्भात दोन दिवसांत काहीतरी पयार्य निघेल, अशी आशा विरोधकांना वाटत आहे.

Mahavikas-Aaghadi
म्हैसाळ हत्याकांडाचा सूत्रधार सोलापूरचा! गुप्तधनासाठी घेतलेल्या ८० लाखांसाठी 9 जणांची हत्या?

मुंबई महापालिकेची चिंता अन्‌ पक्षप्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांमध्ये मुंबई व ठाण्यातील जवळपास सात ते आठ आमदार आहेत. ज्या आमदारांसह स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या भरवशावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेवर नेहमीच भगवा फडकला. पण, बंडखोर आमदारांमुळे आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत ‘सत्ता कोणाची’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मागच्यावेळी भाजपच्या साथीने शिवसेनेला मोठे यश मिळाले होते. पण, आता ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, त्याच पक्षाबरोबर शिवसेनेची आघाडी आहे. त्यामुळे मुंबईकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काहीतरी ठोस निर्णय घेतील, असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.