नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन् रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतोय.
किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना
समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवरील कावनाई किल्ला. पूर्वी कावनाईत सांख्यशास्त्र विद्यापीठ होते. त्यावेळी चीन प्रवासी व अभ्यासक हुयेनत्संग यांनी त्यास भेट दिली होती. त्यावेळी त्याने दिलेली घंटा, सनद आणि ताम्रपट मंदिरात आहे. किल्ल्यावरील दरवाजा बऱ्या अवस्थेत आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजूला गुहा आहे. गडाच्या माथ्यावर दक्षिणेला एक मोठे तळे आहे. बुरुज तुटले असून, आतील जुनी वास्तूच्या केवळ काही अवशेष पडलेले दिसतात. किल्ल्याची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यावर दरड कोसळली असून, किल्ल्यावर जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. किल्ल्यावर आठ पाण्याच्या टाके आहेत. मुख्य तलाव सोडल्यास इतर टाके माती पडल्याने कोरडे झाले आहेत. ही सारी रचना पाहिल्यावर किल्ल्यावरील जलव्यवस्थापन ठळकपणे डोळ्यापुढे उभे राहते. पावसाळ्यात पाणी वाहून न जाता आजूबाजूच्या टाक्यात कसे जाईल व तेथून ते झिरपून मुख्य तलावात पाणी वर्षभर कसे राहील, अशी सुंदर अभ्यासू योजना किल्ल्यावर आहे. जलव्यवस्थापनाची ही सारी व्यवस्था सुस्थितीत आणल्यास कावनाईच्या उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल.
महाशिवरात्रीला किल्ल्यावर कुस्त्यांची दंगल
किल्ल्यावर पार्वती व शंकराचे मंदिर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. मंदिरातील रामदासबाबा किल्ल्यावर राहतात. त्यांनी इथे औषधी वनस्पतींची लागवड करून झाडांचे संवर्धन केले आहे. गावात श्रीराम, कामाक्षी, हनुमान, गणपती, विठ्ठल-रुखुमाई, खंडेराव मंदिर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळस्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थ इथे आहे. महाशिवरात्रीला आणि चैत्र पौर्णिमेला कामाक्षी माताचा यात्रोत्सव होतो. चंपाषष्ठीला खंडेरावाची यात्रा भरते. महाशिवरात्रीला कुस्त्यांची दंगल होते. भाऊसाहेब वाघ हे कीर्तनकार गावचे आहेत. चार भजनी मंडळे गावात आहेत. हरिश्चंद्र पाटील, शिवाजी पाटील, निवृत्तिनाथ शिरसाठ, सुरेश रायकर, ज्ञानेश्वर शिरसाठ भजन म्हणतात. शिवाय गावात अनेक पहिलवान आहेत. मुकणे धरणातील योजना खराब झाल्याने उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. धरण असून पाणी नाही अशी अवस्था गावाची झाली. गावात एक चौकोनी विहीर पाहायला मिळते. पहिली ते दहावीपर्यंत गावात शाळा आहे. गावातील स्मशानभूमीची अवस्था बिकट आहे. अंतर्गत रस्ते, गटार असे प्रश्न आहेत. विजेचा खेळखंडोबा नेहमीचा आहे. गावात दहानंतर एकही बसगाडी येत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी अडचण होते. आदिवासींना रोजगारासाठी नाशिकचा रस्ता पकडावा लागतो. गावात दवाखाना आहे, पण औषधे नाहीत, अशी दवाखान्याची अवस्था आहे.
विकासनिधी मिळाला तर गावचे विषय मार्गी लागले असते
आमच्या गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. महिलांना पाणी आणण्यासाठी विहिरीवर जावे लागते. उन्हाळ्यात टॅंकरशिवाय पर्याय नसतो. आठ दिवसांपूर्वी किल्ल्यावरून माती ढासळल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी विकासनिधी गावाला मिळाला असता, तर गावातील रस्ते, गटार योजना व किल्ल्याच्या संवर्धन असे विषय मार्गी लावणे शक्य होते. - सुनीता पाटील, सरपंच
गावाचा विकास करायचा असेल, तर किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे. गावातील तरुणांना गाइडचे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यातूनही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. किल्ल्याजवळील परिसरात वन विभागाने वृक्षारोपण करावे. - महेश गाढवे, ग्रामस्थ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.