8 महिन्यांतच 1307 विवाहितांनी गाठले पोलिस ठाणे! हुंडा, मानपान अन्‌ कर्ज फेडण्यासाठी सासरच्यांकडून छळ; नवरी अन्‌ नारळ मागणाऱ्यांनाही पैसा, दागिन्यांची हाव

विवाहापूर्वी पती- पत्नी एकमेकांचा प्राण असल्याच्या शपथा घेतात, सात जन्म सोबत राहण्याच्याही वल्गना करतात. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच संसारात वितुष्ट निर्माण होऊन विवाहिता पोलिस ठाण्याची पायरी चढत असल्याची सद्य:स्थिती आहे. संशय, माहेरून पैसे, दागिने आण किंवा विवाहातील मानपानावरून हा वाद होत असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीतून स्पष्ट होते.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : विवाहापूर्वी पती- पत्नी एकमेकांचा प्राण असल्याच्या शपथा घेतात, सात जन्म सोबत राहण्याच्याही वल्गना करतात. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच संसारात वितुष्ट निर्माण होऊन विवाहिता पोलिस ठाण्याची पायरी चढत असल्याची सद्य:स्थिती आहे. संशय, माहेरून पैसे, दागिने आण किंवा विवाहातील मानपानावरून हा वाद होत असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीतून स्पष्ट होते.

हुंड्यामुळे होणारा विवाहितांचा छळ कमी करण्यासाठी १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. त्यानंतर त्यात वेळोवेळी सुधारणाही झाली, तरीदेखील अद्याप ही प्रथा संपलेली नाही हे विशेष. आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून मुलगी पाहायला गेल्यानंतर काहीजण ‘नवरी अन्‌ नारळ’ एवढेच द्या, असे म्हणतात. पण, विवाहानंतर तुझ्या आई- वडिलांनी विवाहात आमचा मानपान व्यवस्थित केला नाही, दागिने, महागड्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

माहेरील किंवा सासरच्यांची लुडबूड नवविवाहित पती-पत्नीच्या संसारात वितुष्ट निर्माण होत आहे. कोरोनानंतर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल प्रकरणांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नांचा चुराडा झालेल्या सुशिक्षित महिला कौटुंबिक छळाला कंटाळून काहीजणींनी आत्महत्या केली आहे. या लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी राज्य स्तरावरून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

मोबाईलमुळे वाढतोय संशय अन्‌ भांडणे

मोबाईलवर सतत बोलणे, काहीतरी पाहणे, सोशल मिडियाचा वापर, अशा कारणांमुळे पती- पत्नीच्या संसारात संशय वाढू लागला आहे. चार भिंतीत ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतीच मर्यादित विवाहिता न्यायासाठी पोलिस ठाण्यांची पायरी चढत आहेत. दुसरीकडे सुशिक्षित तथा नोकरदार, व्यावसायिक विवाहितांचाही छळ सुरु आहे. मागील तीन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील चार महिला डॉक्टरांनी आत्महत्या केल्या असून त्यात कौटुंबिक छळ हेच कारण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. पैसा हे आयुष्य नसून नातेसंबंध दृढ होणे जरुरी आहेत. त्यामुळे पैसा, हुंडा, दागिन्यांसाठी भांडण न करता संवादातून मार्ग काढा, असा सल्ला जाणकार देतात.

८ महिन्यांतील कौटुंबिक छळाच्या तक्रारी

  • शहर पोलिस

  • १००४

  • ग्रामीण पोलिसांकडील तक्रारी

  • ३०३

  • जिल्ह्यातील एकूण तक्रारी

  • १,३०७

  • समुपदेशनाने मिटलेल्या तक्रारी

  • १,०५६

  • प्रलंबित तक्रारी

  • २५१

समुपदेशनातून अनेकांचा संसार जोडण्यात यश

मोबाइलचा अतिवापर, संशय, हुंडा, विवाहातील मानपान, कर्ज फेडायचे आहे, व्यवसायासाठी किंवा नवीन बांधकामासाठी, वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आण म्हणून सासरच्यांकडून छळ होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. दोन महिला पोलिस अधिकारी व १६ अंमलदारांच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींवर तातडीने समुपदेशन करून तोडगा काढला जातो. संसार तुटण्याच्या उंबरठ्यावरील वाद मिटवून त्यांचा संसार पुन्हा जोडण्याचे काम आमच्या विभागाकडून यशस्वीपणे सुरू आहे.

- धनाजी शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला कक्ष, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.