मुंबई - ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालायची गरज नाही, अध्यात्मात शास्त्र हे आधीच समाविष्ट (इनबिल्ट) असल्याने ते आपण अभ्यास करून तपासायची गरज आहे. आपल्या जुन्या शास्त्राचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःची क्षमता वाढवायला हवी. प्रत्येक जण ही क्षमता वाढवू शकतो, कारण आपण सर्वच जण असामान्य आहोत. या मनुष्य देहाची किंमत अनंत आहे,’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’तर्फे आयोजित मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी अध्यात्म, विज्ञान, खरे समाधान, खऱ्या सुखाची व्याख्या आणि ते मिळविण्यासाठी काय करायला हवे, आदी मुद्द्यांवर तरुणांशी संवाद साधला.
‘अध्यात्म’ आणि ‘आजचे विज्ञान’ यांची सांगड कशी घालावी, या तरुणाईच्या मनातील प्रश्नावर अभिजित पवार म्हणाले की, ‘‘रामायणात विमानाचा उल्लेख आहे, याचा अर्थ पूर्वीपासून आपल्याकडे विज्ञान आहे. आपल्या पूर्वीच्या संगीतात गणित आहे. ‘अष्टविनायक’ म्हणजे आठच गणपती का आहेत? त्याचे उंदीर हे वाहन का आहे? देवळात कासव का असते? ही सर्व रूपके आणि प्रतीके आहेत.
कासव जसे हात लावल्यावर आपले चार पाय आणि डोके आक्रसून घेते, तसेच देवळात जाताना आपली पाचही इंद्रिये नियंत्रणात ठेवून एकाग्रतेने भक्तीवरच लक्ष केंद्रित करावे, याची आठवण करून देणारे हे शास्त्र आहे. त्रिमुखी दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहे. शंकर किंवा गजानन-गणपती ही शरीरशास्त्राची रूपके आहेत.
ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली असे म्हणतात, म्हणजे तेव्हा हे तंत्र ज्ञानेश्वरांकडे होते. म्हणजेच तेव्हाचे हे तंत्र हे आधुनिक होते; अन्यथा ज्ञानेश्वरी खरी नाही, असे म्हटले पाहिजे. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, हे साऱ्या गावाने बघितले होते. फक्त हा इतिहास ब्रिटिशांनी लिहिला आणि ते आपण सिद्ध करू शकत नाही, त्यामुळे ते सांगतात ते खरे मानावे का?
पाश्चात्त्य लोक एकेकाळी म्हणत की पृथ्वी चपटी आहे, ते खरे होते का? उलट आपले पंचांगातील कॅलेंडर हे ‘इंग्लिश कॅलेंडर’पेक्षाही अत्यंत अचूक आहे. ‘इस्रो’ने यान सोडताना पंचांगांचा वापर केल्याचे नमूद केले होते. ज्योतिषशास्त्राचाही आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केले पाहिजे. संगीतशास्त्र, वेद या सर्वांचा अभ्यास करायला हवा. अर्थात, असा अभ्यास करण्यासाठी आपली क्षमता हवी, ती नसेल तर ती वाढवायला हवी. हे आपण करू शकतो, कारण प्रत्येक जण असामान्य आहे.’
मनुष्य जन्माचे मोल मोठे
‘आपल्या मनुष्य जन्माचे मोल मोठे असून प्रत्येक अवयवाची किंमत काढली तर ती अनंत भरते. त्यामुळे आपण स्वतःला गरीब म्हणवून घेण्यात काहीही अर्थ नाही. ही आपली शक्ती आपल्याला कळली पाहिजे. ज्या भूमीला संतांचा आशीर्वाद आहे, अशा महान राष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात आपण आहोत.
प्रत्येकात देवत्व आहे हे भक्ताने विसरू नये, त्यामुळे खरे भक्त एकमेकांना नमस्कार करतात. आपण आपल्यातल्या देवत्वाला नमस्कार करतो. त्यामुळे आपण सामान्य नाही तर सर्व जण असामान्य आहोत हे लक्षात ठेवा. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालताना कशालाही नावे ठेवू नका, पाश्चिमात्य विज्ञानदेखील शिकून घ्या. आपले ते श्रेष्ठ आणि त्यांचे कनिष्ठ असे काही नाही; मात्र आपल्याकडे पूर्वी काहीही नव्हते असा गैरसमजही नको.
कुठेतरी या सर्व जुन्या शास्त्रांचे आपल्या समाजात पुनरुज्जीवन झाले पाहिजे, ते परत आले पाहिजे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे,’ असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले. ‘आसक्ती सोडा, त्याग करा तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील,’ असेही त्यांनी सांगितले.
संतुलित जीवनासाठी
‘संतुलित जीवन जगण्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन मार्ग आहेत. आज विश्वगुरूंची चर्चा सुरू असताना परदेशी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होत आहेत. त्यांना आपल्यातील ऊर्जा उपासनेत फायदा दिसतो. दुसरीकडे आपली मुले परदेशी जात आहेत, त्यांनी जरूर जावे, पण फक्त पैसे कमावण्यासाठी, नोकरीसाठी जाऊ नये, तर आपल्या संस्कृतीचा फायदा इतरांना मिळावा म्हणून विवेकानंदांप्रमाणे तिथे जावे.
अध्यात्माच्या मार्गाला कोणी गेला तर त्याला आपल्याकडे संन्यासी समजले जाते. काही जण साधेपणाचा किंवा दारिद्र्याचा अभिमान बाळगतात, मात्र हा खोटा अहंकार आहे. आपल्या मनाची अवस्था रामाप्रमाणे हवी, राजवाड्यातही राहता आले पाहिजे किंवा वनवासही आनंदाने स्वीकारता आला पाहिजे. आज कोणी सरळ मार्गाने पैसे कमावले तरी त्यात चोरीमारीची शंका येते. त्यामुळे धनिकांकडे पैसा वाढत असून गरीब आणखी गरीब होत आहेत.
आपला सनातन धर्म विश्वासाठी आहे, सत्याच्या बाजूने उभे राहणारे, लोकांसाठी जगणारे हे सर्व जण धर्माच्या बाजूने आहेत. गीतेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, हे मला आमच्या श्री गुरुजींनी दाखवून दिले होते. खरी सिद्धी असलेल्या व्यक्तींकडे अशी सर्व उत्तरे असतात. यामुळे आपल्या जीवनाला वेगळे वळण मिळू शकते. आपण वेगळ्या पद्धतीने जगू शकतो. त्यासाठी आपण एक मॉडेल तयार करत आहोत, त्यात तुमचा सहभाग हवा आहे,’ असे आवाहन पवार यांनी केले.
नॅचरल इंटेलिजन्सही महत्त्वाचे
‘सध्या जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बोलबाला आहे, माणसाची कितीही प्रगती झाली तरी जगातील दुःख, अडचणी, युद्धे वाढतच आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ठीक आहे, पण ‘नॅचरल इंटेलिजन्स’देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘नॅचरल’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांची सांगड घालायला हवी, असे श्री गुरुजी नेहमी म्हणत असत.
मी स्वतः स्थिरस्थावर होऊन पैसा मिळवायला सुरुवात केल्यावरही त्यातून आनंद, सुख मिळत नव्हते हे ध्यानात आले. मात्र अध्यात्माकडे वळल्यावर त्याचे संतुलन करू शकतो, वेगळा मार्ग मिळू शकतो, हे लक्षात आले. आज आपण शिक्षण घेतो, नोकरी, धंदा, विवाह, लक्ष्मीचा आशीर्वाद हे सारे आपल्याला हवे असते; मात्र सिद्धी प्राप्त झालेले साईबाबांसारखे फकीर हे आसक्तीच्या पलीकडे होते.
त्यांच्याकडे घरे, मालमत्ता, संपत्ती काहीही नव्हते. आजच्या व्यावहारिक जगात अशा व्यक्तींना यशस्वी म्हणता येणार नाही. पण अनेक मंडळी या साईबाबांच्याच पायावर डोके ठेवतात. त्यामुळे या दोघांतले कोण जास्त यशस्वी, हे आपणच ठरवायला हवे.
हे अवतारी पुरुष आपल्याला ‘आसक्ती नाही’ असे म्हणू शकतात; पण आपली स्थिती वेगळी आहे. आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समाधानदेखील हवे. स्वतःमधील कौशल्याची जाणीव ठेवून आपल्या क्षमता तपासा, त्यानुसार आपल्याला काय जमेल, काय नाही... ते बघा,’ असे पवार म्हणाले.
अवस्था आणि व्यक्तिमत्त्व
‘आपल्याकडे समज-गैरसमज खूप आहेत. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येईल. समाजात चार व्यक्तिमत्त्वाची माणसे आढळतात. ‘टाइप वन’ व्यक्तिमत्त्व असलेले लोक सारखा तर्कशुद्ध विचार करतात, त्यांचे वाचन पुष्कळ असते, ते विश्लेषण करतात, त्यांच्याकडे विवेकबुद्धीचा वापर करण्याची क्षमता असते.
त्यांच्याकडे भावनिक दृष्टिकोन कमी प्रमाणात असतो. त्यांच्यात भावभावना फार नसतात, मात्र बुद्धी खूप असते, तर ‘टाइप दोन’च्या व्यक्ती पटकन भावनिक होतात. त्यांच्यात बुद्धीवर भर देण्याचे प्रमाण थोडे कमी असते, तर मान- अपमान आदी गोष्टी त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाच्या असतात. ‘टाइप तीन’च्या व्यक्ती फार भावनिकही नसतात, फार बुद्धिवादीही नसतात.
त्या कधी भावनात्मक होतात तर कधी विवेकबुद्धीही वापरतात, तर ‘टाइप फोर’ प्रकारच्या लोकांमध्ये भावना जास्त नसतात, विवेकबुद्धीही जास्त नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे चारही प्रकारचे गुण असतात. दिवसाच्या काही वेळात आपण कधी पहिल्या, कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या प्रकारचे असतो.
असहाय मनःस्थितीत आपण शूद्र अवस्थेत असतो, ‘राजा’ किंवा ‘सामान्य माणूस’ हे कोणीही या अवस्थेत जाऊ शकतात. ‘टाइप तीन’च्या प्रकारात व्यवसाय करणारे वैश्य असू शकतात. ‘टाइप दोन’च्या प्रकारात पटकन भावनिक होणारे लोक, मानापमान मानणारे क्षत्रिय असू शकतात. ज्ञानोपासना करणारे हे ब्राह्मण असू शकतात.
आपण स्वतः या व्याख्येनुसार कधी ब्राह्मण, कधी क्षत्रिय, कधी वैश्य तर कधी शूद्र होऊ शकतो. यात जात-धर्म कुठेही येत नाही. जगातील कोणालाही हे लागू होऊ शकते. या मनाच्या अवस्था असतात. यातील आपली जी अवस्था दीर्घकाळ होते, ते आपले व्यक्तिमत्त्व असते,’ असे पवार यांनी सांगितले.
‘निवडणुकीत मत मागताना समोरचे मतदार सर्व ‘टाइप’चे असतात. पण मत मागणाऱ्याने ‘टाइप दोन’प्रमाणे भावनात्मक भाषण करून मतदारांनाही भावनात्मक बनवले तर ते मत देऊ शकतात. याचा अर्थ यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा काहीही प्रकार नाही. या अशा सर्व गोष्टी या ‘नॅचरल इंटेलिजन्स’मध्ये येतात.
आपल्या धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा चुकीचा अर्थ लोकांनी घेतला आणि काहींनी स्वार्थासाठी त्याचा वेगळा अर्थ लावून गैरप्रकार केला. हे नेमके काय होते? यात काय कल्पना आहेत? हे आपल्याला परत सगळे शोधायचे आहे,’ असेही पवार म्हणाले.
अग्नीने अशुद्धाचा नाश
‘आपल्याला जेव्हा दुःख होते तेव्हा आपण त्या सर्वशक्तिमान ईश्वराला विसरतो. मग सतत नामस्मरण करायचे म्हणजे काय? तर आपण दीपप्रज्वलन करतो तेव्हा आपल्या आतला प्रकाशही उजळला पाहिजे आणि आपण आतल्या अंधारापासून दूर गेलो पाहिजे. सतत तेवणारा दिवा पाहून आपल्याला नामस्मरणाचे विस्मरण होता कामा नये.
म्हणजेच त्याची शिकवण आचरणात यावी, आपले बोलणे, विचार तसे व्हावेत याकडे आपले लक्ष हवे. मनात चुकीचा विचार आला तर तो नष्ट झाला पाहिजे. सतत अग्नीच्या उपासनेने अशुद्ध गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत, ही जाणीव आपल्याला व्हायली हवी; अन्यथा नुसते श्लोक अथवा कर्मकांड करून काहीही फायदा नाही. चारही वेद पाठ असतील पण आचरणात काही येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. घरात फक्त कर्मकांड-पांडित्य, पूजा केली आणि बाहेर जाऊन भ्रष्टाचार केला तर त्याचा काहीही फायदा नाही,’’ असेही पवार यांनी नमूद केले.
स्वतःमध्ये बदल करा
‘तुम्ही जगाला बदलू नका तर स्वतःमध्ये बदल करा. आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वतःला बदला. समाजातील अडचण सोडविण्यासाठी तुम्ही काय करणार, याचा विचार करा. दुसऱ्यांना बदल सांगण्याआधी तुम्ही तो स्वतः मध्ये करा. तुमच्याकडे शंभर रुपये असतील, पण तुमच्या गरजा शंभर रुपयांपेक्षा कमी असतील तरच तुम्ही श्रीमंत आहात आणि गरजा शंभर रुपयांपेक्षा जास्त असतील तर तुम्ही गरीब आहात, हे ध्यानात ठेवा.
राजयोग सर्वांना असतो, पण आपल्या मनाची अवस्था तशी हवी. आपल्या सर्वांनाच पगारवाढ हवी असते पण ज्याला जास्त पगार आहे तो घर कसे चालवितो? तो सुखी आहे का? हे तपासा. घर अजून मोठे हवे, नवीन गाडी हवी, जास्त पैसा हवा या असहाय मनःस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे आहे. स्वतःमध्ये काय बदल करायचे ते ठरवा आणि दुसऱ्याला ऊर्जा देणारे, प्रोत्साहन देणारे व्हा,’ असेही पवार यांनी सांगितले.
उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार
तरुणाईने रोजच्या जीवनात अध्यात्म कसे आचारावे, या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘आपल्या सर्वांना आपल्या वयोमानानुसार आयुष्यात दीड ते दोन लाख तास आहेत. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच त्याची पायाभरणी केली तर त्याचे परिणाम शेवटच्या दिवसापर्यंत दिसतील. त्यासाठी आपली आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक प्रगती झाली पाहिजे.
उत्तम आरोग्यासाठी आपण उत्तम आहार आणि व्यायाम केला तर शारीरिक फायदा होईल. त्यासाठी आयुर्वेद तपासून ते आचरणात आणा. ‘प्रोटिन’साठी सर्वांनी मांसाहार घेतलाच पाहिजे असे नाही, कारण शेवटी आपण जे खातो त्यानुसारच आपण घडत असतो. त्यानुसार सात्त्विक, तामसी आणि राजसी या गुणांचा विकास होतो... तसाच आपला स्वभावही बनतो.
आपल्याला आपला शेवटचा दिवस कसा हवा आहे? आपल्याला कुठे जायचे आहे?... याचाही विचार करा. आपले शरीर आपण कसे विकसित करू, हे ठरवा. त्यासाठी स्वाध्याय केला नाही तर काहीही उपयोग नाही,’ असेही पवार यांनी सांगितले.
आताच काय ते ठरवा
‘आपल्याला मानसिक अवस्था कशी हवी? क्रोध हवा की संतुलित स्थिती हवी... की समत्वभाव हवा... हे ठरवा. अशा चांगल्या मानसिक अवस्थेसाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. मन इतरत्र भटकू नये, एकाग्र व्हावे यासाठी वर्तमानात जगणे आवश्यक आहे. म्हणून ध्यानधारणा हवी. या उपासनेशिवाय दुसरा मार्ग नाही.
ज्योतिध्यानामुळेही स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. आपल्याला चोवीस तास परम आनंदाच्या मस्तीत राहायचे असेल, तर आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे. आपण कायम या अवस्थेत राहू शकू त्यासाठी हे ज्ञानमार्ग असून ‘टाइप वन’ प्रकारच्या लोकांनी या ज्ञानमार्गाचा अभ्यास करावा. ‘टाइप दोन’ प्रकारच्या लोकांनी भक्तिमार्गानुसार श्रद्धा ठेवावी. कर्मयोग म्हणजे सत्कर्म करता येईल, काहीच जमत नसेल तर हटयोग म्हणजे प्राणायाम करू शकतो.
कारण आपल्याला राग येतो तेव्हा मनाची स्थिती बिघडते, श्वासावरील नियंत्रण जाते. श्वासावर नियंत्रण ठेवून हटयोगाने मन स्थिर करता येते. हे चार मार्ग असून सुखासाठी यातला कोणताही मार्ग निवडता येईल. दुसरे म्हणजे तरुण वयातच हा निर्णय घ्या. उतारवयात आपल्याला पुष्कळ शारीरिक-मानसिक चिंता असल्याने हा मार्ग आताच स्वीकारा,’ असेही पवार म्हणाले.
मुंबईत पादुका दर्शनाची संधी
‘आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे ठरवायचे एक चांगली संधी आली आहे. त्यात अर्थार्जनाबरोबर स्वावलंबी होण्याची संधीही मिळेल. यापूर्वीही अशी संधी साधलेल्यांना पुष्कळ फायदा झाला. ही संधी एप्रिलमध्ये मिळेल, त्यासाठी मार्च महिन्यात आपण मुंबईत एका कार्यक्रमाला आले पाहिजे.
स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, श्री गुरुजी, शेगावचे गजानन महाराज, रामदास स्वामी, निवृत्तिनाथ-ज्ञानदेव, सोपानदेव-मुक्ताबाई यांच्या मूळ पादुका मुंबईत प्रथमच एका व्यासपीठावर आणल्या जाणार आहेत. हे प्रथमच घडते आहे. त्यात तुम्ही सहभागी होऊन उपासनेच्या मार्गावर जाण्याची प्रतिज्ञा करा. रोज ‘अग्नी’ची उपासना करा, दानधर्म करा, दानाचा अर्थ ‘मोठे दान’ असा नसतो.
यज्ञ, ज्ञान, तप यांचा वापर कर्म करताना केला तरच ते कर्म सत्कर्म होते; अन्यथा ती फक्त निर्जीव कृती होते,’ असा असाही सल्ला त्यांनी दिला. ‘यासाठी बावन्न आठवड्यांचा अभ्यासक्रम असून त्या ज्ञानाची उपासना करा, वृक्षारोपण व अन्य काही समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबवावेत. या गोष्टी केल्यास तुमचे आयुष्य हमखास बदलेल. त्यासाठी मार्च महिन्यात मुंबईत स्वखर्चाने या, आधी नोंदणी करा. संतुलित जीवन जगण्यासाठी आयुष्य बदलण्यासाठी ही संधी असून, जे येथे येतील त्यांचे आयुष्य बदलेल,’ असेही पवार म्हणाले.
‘हा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यात चढ-उतार येऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूक फार करू नका, कर्ज काढू नका, श्रद्धा-सबुरी हवी, दरवर्षी थोडी रक्कम गुंतवा, तीन ते पाच वर्षे थांबण्याची तयारी ठेवा आणि चार चांगल्या गोष्टी शिकायची तयारी ठेवा. याच्यासाठी अकरा हजार रुपयांचा एक अभ्यासक्रमही घ्यावा लागेल,’ असेही पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.