भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात प्राणाची आहुती देऊन तिरंगा फडकवणारे परमवीरचक्र सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांची कामगिरी अभूतपूर्व शौर्याने भरलेली आहे. अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी कारगिल युद्धात मोलाचे योगदान दिले. आपल्या सहकाऱ्यांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला आणि पाकिस्तानला धूळ चारली. दाक्षिणात्य दिग्दर्शक विष्णू वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह’ चित्रपटात बत्रा यांची रोमहर्षक शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. जी पाहताना आपला ऊर भरून येतो, डोळे पाणावतात आणि आपल्या सैनिकांच्या धाडसासमोर आपण नतमस्तक होतो.
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत-पाकमध्ये लढले गेलेले युद्ध मे ते जुलै असे तब्बल तीन महिने चालले. भारताच्या लष्करी इतिहासातील ते सर्वांत महत्त्वपूर्ण युद्ध मानले जाते. युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी देशासाठी जीवाची बाजी लावली. त्यांच्या शौर्यापुढे पाकिस्तानी सैन्य चारी मुंड्या चीत झाले. भारताने युद्ध जिंकले आणि कारगिलच्या पॉइंट ४८७५ वर तिरंगा झळकला… कारगिल युद्धातील रोमांचक थरार विष्णू वर्धन यांनी पडद्यावर जिवंत केलाय. त्यांच्या तोडीस तोड कामगिरी सिनेमॅटोग्राफर कमलजीत नेगी यांनी केली आहे. दोघांच्या मेहनतीला सर्वच कलाकारांची मोलाची साथी लाभल्याने एक अजरामर शौर्यगाथा उत्कृष्ट कलाकृतीच्या रूपाने पडद्यावर साकारली गेली.
‘शेरशाह’ची कथा आहे त्यागाची, अतुलनीय शौर्याची आणि देशप्रेमाची. चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते एका टॉक शोद्वारे. विक्रम बत्रा यांचा भाऊ विशाल आपल्या भावाची कथा संपूर्ण जगाला सांगत असतो. पालमपूरमध्ये राहणाऱ्या विक्रम यांचे लहानपणापासूनच एकच स्वप्न होते, ते म्हणजे सैन्यात भरती होणे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू असतात. जोडीला प्रेयसी डिंपल चिमा हिच्याबरोबरीचे सुंदर नातेसंबंधही दृढ होत असतात. स्वप्नाचा वेध घेत बत्रा १९९६ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात. प्रशिक्षणानंतर वयाच्या २३ व्या वर्षी जम्मू-काश्मीर रायफल्सच्या १३ व्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती होते. बत्रा अतिशय सरळ आणि साध्या स्वभावाचे असल्यामुळे बटालियनमधील एकेकाची मने जिंकत जातात. मरणाच्या भीतीवर मात केली की युद्धजन्य स्थितीत शत्रूला पाणी पाजता येते, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. तोच विश्वास ते सहकाऱ्यांमध्ये जागवतात.
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत शत्रूच्या अंगावर धावून जात त्यांचा खात्मा करणे असो, की बेसावध क्षणी हल्ला करून क्रूरकर्मा दहशतवाद्याला त्याच्या घरात घुसून मारणे असो, अशा प्रसंगांतून बत्रा यांच्यातील निडर जवान दिग्दर्शक आपल्या समोर मोठ्या ताकदीने उभा करतात. ब्लेडने अंगठा कापून रक्ताने प्रेयसीची मांग भरण्याचा फिल्मीपणाही बत्रा यांच्यात होता. तोही मोठ्या खुमासदारपणाने दिग्दर्शकाने मांडलाय. सुट्टीवर आलेल्या बत्रा यांना प्रेयसीचे प्रेम खुणावत असते. आपले कुटुंबीय आणि डिंपलशी वेळ घालवत असतानाच कारगिल युद्धाची ठिणगी पडते. सुट्टी संपण्याआधीच मनाची साद ऐकून बत्रा युद्धभूमीवर पोहचतात. ‘एक तर मी युद्धभूमीवर तिरंगा फडकावून येईन किंवा मी तिरंग्यात लपेटून येईन, पण नक्की येईन...’ असा विश्वास ते आपल्या जीवलग मित्राकडे व्यक्त करतात, पण नियतीला ते मान्य नसते...
विक्रम बत्रा यांचे खासगी आयुष्य ते भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी दाखवलेले शौर्य असा सगळा प्रवास चित्रपटात आहे. विक्रम बत्रा धाडसी आणि शूर सैनिक होतेच; शिवाय सच्चे व दिलदार मित्र, आदर्श व प्रेमळ मुलगा आणि तितकेच समजूतदार व जीवापाड प्रेम करणारे प्रियकर होते. त्यांच्या जीवनाचे विविध पदर विष्णू वर्धन यांनी पडद्यावर उत्तम रेखाटले आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम यांची भूमिका जिवंत केलीय. त्याने घेतलेली मेहनत चित्रपटात दिसते. बत्रा यांच्या व्यक्तिरेखाचा पूर्ण अभ्यास त्याने केलेला जाणवतो. ‘शेरशाह’तील त्याचे काम त्याच्या करिअरला नक्कीच वेगळी कलाटणी देईल. कियारा अडवानीनेही आपल्या सहस सुंदर भूमिकेने छाप पाडली आहे. पंजाबी कुडीच्या भूमिकेत ती भाव खाऊन गेली आहे. अन्य कलाकारांची तेवढीच तोलामोलाची साथ लाभलेली आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे कथेच्या अनुषंगाने आले आहे. चित्रपटाची कथा-पटकथा संदीप श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. त्यांनीच लिहिलेल्या उत्तम संवादाची जोड चित्रपटाला आहे आणि ते कुठेही लाऊड होणार नाही, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. म्हणूनच चित्रपट कलात्मक, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि संतुलित झाला आहे. याचे श्रेय सर्वांनाच द्यावे लागेल. खऱ्याखुऱ्या नायकाच्या अतुलनीय शौर्याची, निःस्वार्थ त्यागाची आणि निखळ प्रेमाची कथा चुकवू नये, अशीच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.