‘रिॲलिटी शो’ सर्वांसाठी मोठी संधी आहे. ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो कलाकार एखाद्या मंचावर सहज जाऊ शकतो. या संधीचा लाभ घायला हवा. स्वतःला तयार करा. संधी वारंवार मिळेल असंही नाही.
‘रिॲलिटी शो’ सर्वांसाठी मोठी संधी आहे. ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो कलाकार एखाद्या मंचावर सहज जाऊ शकतो. या संधीचा लाभ घायला हवा. स्वतःला तयार करा. संधी वारंवार मिळेल असंही नाही. त्यामुळे प्रचंड मेहनत घ्या, तयारी करा आणि मग स्वतःला सिद्ध करा. काही ‘रिॲलिटी शो’मध्ये तुमचं दिसणं, कपडे घालणं, नाचणं यावरही फोकस केला जातो; पण गायक म्हणून तुम्ही एखाद्या ‘रिॲलिटी शो’मध्ये गेलात तर तुम्हाला गाणंही उत्तम गाता आलंच पाहिजे. केवळ स्वतःच्या नटण्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर तुमच्या आवाजाला नटवा.
आमच्या काळात फारसे चॅनेल्स नव्हते. त्यामुळे ‘रिॲलिटी शो’चाही प्रश्न नव्हता. दूरदर्शन होतं. त्यावर एखादा शो चालायचा. ९० च्या दशकात ईटीव्ही चॅनेल आलं. त्यावर पहिला ‘व्यावसायिक कार्यक्रम’ सुरू झाला. त्याचं नाव होतं ‘गौरव महाराष्ट्राचा.’ हा पहिला ‘रिॲलिटी शो’. या कार्यक्रमात मला ‘जज’ म्हणून बोलावलं होतं. त्याचं शीर्षक गीत ‘आदर्श-उत्कर्ष’ने केलं होतं. हा कार्यक्रम लोकांमध्ये फार फेमस झाला होता. या कार्यक्रमाला सुरेश वाडकर महागुरू तर साधना सरगम आणि वैशाली सामंतसुद्धा परीक्षक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी माझ्या घराण्यातील सौरव वखाडे हा स्पर्धक जिंकला होता.
आता ‘रिॲलिटी शो’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनेक चॅनेल्सवर विविध कार्यक्रम होत आहेत. त्यात काही वावगे आहे, असे मला वाटत नाही. नवोदित गायकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असं मला वाटतं. आमच्यावेळी एखाद्या संगीतकारापर्यंत पोचायला फार कष्ट पडायचे. पोचलो तरी ते भेटतील याची काही शाश्वती नसायची. माझं ‘नवीन पोपट’ गाणं आल्यानंतर कित्येक गाणी हिट झाली, त्यानंतर कुठे मला चंपक जैन हे प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना भेटायला घेऊन गेले होते. आता ‘रिॲलिटी शो’मुळे नवीन मुलांना मंच उपलब्ध होत आहे. मोठ्या कलाकारांशी थेट संवाद साधता येत आहे. प्रसिद्धी मिळत आहे. या संधीने नवीन कलाकारांनी सोनं करायला हवं असं मला सांगावसं वाटतं.
‘आता होऊन जाऊ द्या’ या कॉन्टेस्टमध्ये माझा मुलगा आदर्शने सहभाग घेतला होता. सुदेश भोसले, राहुल रानडे, अश्विनी भावे यांच्यासारखे मोठे कलाकार त्या शोमध्ये होते. त्यावेळी मी एकच सल्ला दिला की, ‘‘ही तुझी मॅच आहे, तुझा शो आहे, तू तुझ्या मनाप्रमाणे परफॉर्म कर. जे काही करशील ते पूर्ण तयारीनिशी कर. आपलं ‘बेस्ट’ तिथे दे. एकदा का मंचावर गेलास तर मग कोणतंही कारण देऊ नकोस. गायकाने नेहमी तयार असायला हवं. कोणतंही गाणं, कोणत्याही पद्धतीचं गाणं तुम्हाला सहज गाता आलं पाहिजे.’’ आदर्शने या कार्यक्रमात चांगला फरफॉर्म केला. त्याचं नाव झालं. त्याची मेहनत बघून संगीतकार अमित राजने त्याला ‘दुनियादारी’ सिनेमात गायची संधी दिली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही’ हे दर्जेदार गाणं गाऊन घेतलं. या गाण्यामुळे आदर्शचही नाव झालं. ही संधी त्याला टीव्हीवरील ‘रिॲलिटी शो’मुळे मिळाली. याआधी आदर्शने एका म्युझिक कंपनीसोबत ५०० पेक्षा अधिक गाणी केली होती. पण त्याला मोठा ब्रेक, मोठी संधी तो आनंद शिंदे यांचा मुलगा म्हणून नाही तर त्याने स्वत:ला ‘रिॲलिटी शो’मध्ये सिद्ध केल्याने मिळाली.
अशी संधी फक्त माझ्या मुलालाच नाही तर ‘रिॲलिटी शो’च्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो कलाकार एखाद्या मंचावर सहज जाऊ शकतो. या संधीचा लाभ घायला हवा. स्वतःला तयार करायला हवे. संधी वारंवार मिळेल असेही नाही. त्यामुळे प्रचंड मेहनत घ्या, तयारी करा आणि मग स्वतःला सिद्ध करा. काही ‘रिॲलिटी शो’मध्ये तुमचं दिसणं, कपडे घालणं, नाचणं यावरही फोकस केला जातो; पण गायक म्हणून तुम्ही एखाद्या ‘रिॲलिटी शो’मध्ये गेलात तर तुम्हाला गाणंही उत्तम गाता आलंच पाहिजे. केवळ स्वतःच्या नटण्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर आपल्या आवाजाला नटवा. तुम्हाला यश नक्की मिळेल.
आता मी अनेक ‘रिॲलिटी शो’मध्ये परीक्षक म्हणून जात असतो. तेव्हा मला निश्चितच सुरुवातीचे दिवस आठवतात. लहानपणी अगदी दादांचा मार खाऊन गाणं शिकलो. फक्त गाणंच नाही तर तबलाही मी शिकून घेतला. त्यानंतर गाणी गायला लागलो. अनेक गाणी गायली, अनेक गाणी प्रसिद्धही झाली होती. पण त्यावेळी आजच्याप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमांना जायची किंवा एखाद्या टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून जायची संधी काही मिळत नव्हती. अशी संधी मिळायला कित्येक वर्षे गेली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जेव्हा मला पहिल्यांदा परीक्षक म्हणून बोलावणे आले तेव्हा किती आनंद झाला, हे सांगणे अवघड आहे. बाळ पळसुळे यांच्यासारखे ज्येष्ठ संगीतकार त्यावेळी माझ्या सोबत होते. अशा कार्यक्रमांमुळेच मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची आणि संवाद साधण्याची संधीदेखील मिळते. आता परीक्षक आणि स्पर्धक या दोघांसाठी ही अशी संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
आजकाल ‘रिॲलिटी शो’वर अनेक आरोपदेखील केले जातात. काही स्पर्धकांना अधिक संधी तर काहींना मुद्दामहून डावललं जातं, अशी चर्चाही सुरू असते. मी आजपर्यंत ज्या-ज्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो, तेथे मात्र असा काही प्रकार मलातरी जाणवला नाही. पण मी याही पुढे जाऊन सांगेन, की एखाद्या स्पर्धकाने एका स्पर्धेत भाग घेतला तर बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नये. कारण जेव्हा तुम्ही मंचावर असता तेव्हा तो मंच, तो माईक, तो एपिसोड आणि परफॉर्मन्स हा तुमचाच असतो. तिथे तुम्ही जर पूर्ण तयारीनिशी गेलात तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. तुमच्या हातातील माईक कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, तिथे तुम्ही ‘परफेक्ट’ राहा. तुमचं बेस्ट द्या, तुम्हाला अवघं जग बघत असतं. तुमच्यात गुणवत्ता असेल तर तुम्हाला मोठी संधी नक्की मिळणार.
गायकाने नेहमी सैनिकप्रमाणे तयार राहायचं. जसे सैनिकाला कधीही मैदानात उतरावे लागते तसेच गायकानेही तयारी ठेवावी. आपल्या परफार्मन्समध्ये सातत्य हवे. आपल्यात गुणवत्ता असेल तर आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. क्रमांक येईल न येईल; पण रसिकांची मने जिंकता आली पाहिजेत. मी आजवर हजारो हिट गाणी दिली. मला कुठलं अवॉर्ड नाही मिळालं; पण त्यामुळे मी काही थांबलेलो नाही. लोकांचं प्रेम हेच माझ्यासाठी बक्षीस आहे. माझ्या गायकीतून, माझ्या गाण्यातून मला लोकांची मनं जिंकायची आहेत. आणि ते मला जमलं आहे, असं वाटत. म्हणून आज वयाच्या साठीनंतरही २५ वर्षांच्या हिरोसाठी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं जातं आहे. त्यामुळे आपलं काम करत राहा. तुमच्यासाठी जे काही असेल, ते तुम्हाला मिळेलच. पहिला क्रमांक नाही आला किंवा एखादी वेळेस अवॉर्ड नाही मिळाला म्हणून खचून जाऊ नका. माझा मुलगा उत्कर्षने ‘बिग बॉस’च्या संधीच सोनं केलं, त्याला गाण्यात अधिक रस आहे, पण त्याने त्या कार्यक्रमात जी अभिनयाची झलक दाखवली ती प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आवडली आणि त्यांनी त्याला त्यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतलं आहे. म्हणून सांगतो की तुम्ही स्वतःला नेहमी तयार ठेवा... संघर्षाला घाबरू नका. यश मिळालं तरी संघर्ष हा कायम सुरू असतो. मी आजही प्रत्येक गाण्यासाठी पहिल्या गाण्याप्रमाणेच संघर्ष करतो. माझी तयारी, मेहनत, संघर्ष आजही तसाच आहे.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.