माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची असंख्य गाणी गाजली. हीट झाली; परंतु गाण्याची रॉयल्टी असते हे त्यांना ठावूक नव्हते. त्या वेळी सगळ्या नामवंत कंपन्यांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची असंख्य गाणी गाजली. हीट झाली; परंतु गाण्याची रॉयल्टी असते हे त्यांना ठावूक नव्हते. त्या वेळी सगळ्या नामवंत कंपन्यांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. त्या कंपन्या उभ्या राहिल्या; परंतु वडिलांना या गाण्यांतून कधीही रॉयल्टी मिळाली नाही. पैशासाठी गाण्यापेक्षा रसिकांसाठी गाण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर जपले. मीही तेच केले आहे. शिंदे घराण्यात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व कळायला तिसरी पिढी यावी लागली; पण माणसं जोडल्याचं समाधान आयुष्यभर पुरून उरणार आहे.
शिंदे घराण्यात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व कळायला तिसरी पिढी यावी लागली. माझे आजोबा, आजी भगवान शिंदे आणि सोनाबाई शिंदे हे सुरुवातीला रस्त्यावरती गाणी गात असत. त्यातून त्यांचे अर्थाजन चालायचे. सोलापूर पट्टा हा दुष्काळी आहे, त्यामुळे त्यांनी रस्त्यावर गाणी गात मुंबईकडे प्रवास सुरू केला. मुंबईत आल्यानंतर भायखळा येथे प्रल्हाद शिंदे म्हणजे माझ्या वडिलांचा जन्म झाला. दगडी चाळ, ग्रँट रोड या परिसरात त्याचा तो प्रवास सुरू होता.
वडील शिकलेले नव्हते. त्यांना आपण लोकांपर्यंत जातोय, आवाज गावागावापर्यंत पोहोचतो, हे त्यांच्या दृष्टीने महत्चाचे हेाते. एकदा गाणे हीट झाल्यानंतर त्या गाण्यावर प्रल्हाद शिंदे गावोगावी कार्यक्रम करायचे. त्यात वरून जे पैसे मिळायचे, बिदागी मिळायची, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. परिस्थिती हलाखीची असायची म्हणून वडिलांनी मला मंगळवेढ्यात ठेवले, तर मिलिंदला बोर्डिंगमध्ये टाकले होते... आम्हाला वर्षातून एक जोडी कापड मिळायचे. त्या वेळी काँग्रेसचे आमदार मरवडे वकील यांनी वडिलांना शेती करून दिली; परंतु शेती नावावर करावी लागते, हेदेखील वडिलांच्या लक्षात आले नाही. केवळ आपल्या गाण्यावर लक्ष दिले होते. त्यामुळे बक्षिसी मिळालेली शेतीपण हातातून गेली. पुढे मी स्वत:च्या पैशातून गावी शेती घेतली आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. प्रल्हाद शिंदे यांना त्या वेळी पेन्शनही मिळाले नाही. शासकीय पेन्शन त्यांच्या मृत्यूनंतर जाहीर झाले होते.
१३ वर्षांचा झाल्यानंतर तबला वाजवायला सुरुवात केली. वडील कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर असल्याने घरामध्ये सून पाहिजे म्हणून माझे लग्न केले. सुरुवातीला गायक म्हणून तयार झाल्यावर ज्या आर्थिक गणिताच्या चुका प्रल्हाद शिंदे यांनी केल्या, त्या मीपण केल्या. मी सुरुवातीला व्हीनसमध्ये गाणे गायले तेव्हाचा काळ खरेतर संघर्षाचा होता. आनंद शिंदे हा प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा आहे, त्यामुळे चालला तर चालला म्हणून लोक घेत होती. जेव्हा ‘नवीन पोपट’ हे गाणे हीट झाले तेव्हा त्यांचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव गेले; परंतु ज्यांची नोंद इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी झाली, तरी मला त्या गाण्यासाठी रॉयल्टी मिळाली नाही. कार्यक्रम नियमित नसल्यामुळे घरात आर्थिक तंगी कायम असायची; मात्र मी मुलांना त्याची झळ पोहोचू दिली नाही.
मुलांच्या शाळेला उन्हाळ्यात सुट्टी असायची, त्या वेळी मी त्यांच्याजवळ नसायचो. कार्यक्रम करत गावोगाव फिरत असायचो. मुलांना पुढे मी का असे करतो ते कळाले. घरातून एका मुलाला डॉक्टर करायचे स्वप्न माझ्या पत्नीने पाहिले. पैशाची तंगी असतानाही ते स्पप्न पूर्ण केले. मला शास्त्रीय संगीत शिकायचे होते; मात्र त्या वेळी मला योग्य मार्गदर्शक मिळाला नाही. मात्र मुलाच्या बाबतीत मी कसूर होऊ दिली नाही. आदर्श हा सुरेश वाडकर यांच्याकडे शिकला.
मला आठवते की, मला पहिल्यांदा झारखंडला कार्यक्रमासाठी निमंत्रण आले होते. त्या वेळी त्यांनी २० हजारांत कार्यक्रम घेतला होता. तेव्हा मला झारखंड माहीत नव्हते, त्यामुळे नंतर त्यांना कळले की, आपण खूपच कमी पैसे घेतले. त्या वेळी मी माझे गाजलेले ‘मै भीम का दिवाना हूं’ हे गाणे तिथे गायले होते. त्यानंतर पुढे भोपाळ आदी शहरांत त्यांनी कार्यक्रम केले. त्यानंतर आर्थिक गणित कळायला लागले.
अत्यल्प मोबदल्यात मी गाणे गायचो. गाणे हिट झाले की, संबंधित कंपनी त्यावर पैसे कमवायची. त्याच गाण्यावर बाहेरचे शो मिळायचे आणि त्यावर जी काही कमाई होत असे, त्यावरच समाधानी असायचो. त्या वेळी मी आणि मिलिंद शिंदे सोबत होतो, तेव्हा मी ऑर्केस्ट्रा आणि दुसरीकडे कव्वालीचे कार्यक्रमही करायचो. मी एकाच वेळी तबला वाजवायचो, आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम करायचो. त्या वेळी मी नवीन पोपट हे गाणे पाचशे रुपयांमध्ये गायले होते.
घराला स्थैर्य मिळवून देण्यासाठी कार्यक्रम जास्त करायचो. त्या वेळी राज्यात कुठलाही संगीत कार्यक्रम ठेवला, तरी त्यात शिंदेची डिमांड असायची आणि आम्हाला कार्यक्रमाला बोलावले जायचे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर कार्यक्रम केले. काळू-बाळूच्या तमाशातही गाणे म्हटले. आनंद-मिलिंद नाईटचे कार्यक्रमही केले. त्या वेळी गोविंदा, जॉनी लिव्हर आणि आनंद-मिलिंद नाईटचा शो आम्ही करायचो. गोविंदा डान्स करायचे, जॉनी लिव्हर विनोद करायचे आणि मी आणि मिलिंद गाणे गायचो.
रॉयल्टी आणि अधिकाराचा विषय कोंबडी पळाली हे गाणे हिट झाल्यानंतर सर्वप्रथम माझ्या लक्षात आला. मुलं मोठी झाल्यानंतर मला आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व कळायला लागले. १९८६ पर्यंत स्वत:चे घरही नव्हते. त्या वेळी मी माझ्या सासरवाडीत गोरेगाव येथे झोपडपट्टी भागातील भगतसिंगनगर येथे राहत होतो. १० बाय १० च्या खोलीत आम्ही सर्व परिवार राहायचो. पुढे शोमधून उत्पन्न वाढायला लागले आणि पैसे जमवून पहिल्यांदा गोरेगावला चाळीतील घर घेतले. तिथून मी स्थिरस्थावर व्हायला लागतो. लग्नात माझी आर्थिक ऐपत नसल्यामुळे मी तेव्हा पत्नीला नकली मंगळसूत्र घातले होते. मनाला खूप खटकायचे. पुढे आर्थिक सुबत्ता आली तेव्हा तिला मी खऱ्याखुऱ्या सोन्याच्या मंगळसूत्रासोबतच सोन्याचे जोडवेदेखील केले.
पुढे आम्ही प्रोडक्शन हाऊस सुरू केले आणि आमचे कॉन्सर्ट सुरू झाले. आम्ही गाणी करायला लागलो. आम्हाला डिजिटल मार्केट, पीआर, आपल्यावरील टीआरपी याचे महत्त्व कळायला लागले. वडिलांनी सुरू केलेल्या अनेक संस्था, कंपन्यांमध्ये मी सेक्रेटरी आहे. त्या कंपन्या आणि संस्थांच्या नियोजित कार्यक्रमात मी जातो; परंतु मी जयंती आदी आपले कार्यक्रमही सोडलेले नाहीत. ते अजूनही करत असतो.
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांना तीनदा हार्ट अटॅक आला. त्यामुळे गाऊ नका, असे डॉक्टरांनी बजावले; मात्र हाडाचे गायक असलेल्या दादांनी गाणे सोडले नाही. त्यांची असंख्य गाणी हीट होती; परंतु त्यांना सरकारने एकाही पुरस्काराने सन्मानित केले नव्हते. वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर मात्र त्यांचा सत्कार सुरू केला. त्या वेळी मंत्री, नेते यायचे. माझी मुले मोठी झालेली आहेत, ती सक्षम आहे, माझा सत्कार करू नका, असे प्रल्हाद शिंदे त्या नेत्यांना म्हणायचे. पुढाऱ्यांनी वापरून घेतले, ही खंत मला आजही आहे. त्यामुळे राजकारणात जाऊन कलावंतांच्या अडचणी सोडवण्याचा मी संकल्प केला.
माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या काळातील सर्व खाणाखुणा मी जपल्या आहेत. माझी पहिली मोटारबाईक आजही सांभाळून ठेवली आहे. आपल्या जुन्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या पाहिजेत. जुनी माणसं, नाते सर्व काही मी जपले आहे, जीवनभर जपणार आहे.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.