गाणी पँथरची!

१९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. या चळवळीने महाराष्ट्रात एक नवा इतिहास लिहिला. यात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे प्रारंभापासून सहभागी होते.
Anand Shinde
Anand ShindeSakal
Updated on
Summary

१९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. या चळवळीने महाराष्ट्रात एक नवा इतिहास लिहिला. यात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे प्रारंभापासून सहभागी होते.

१९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. या चळवळीने महाराष्ट्रात एक नवा इतिहास लिहिला. यात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे प्रारंभापासून सहभागी होते. ते मोठ्या अभिमानाने स्वत:ला पँथर म्हणायचे. या चळवळीच्या निमित्ताने वडिलांसोबत मी महाराष्ट्र पिंजून काढला. त्या आठवणी आजही हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत... दलित पँथरपासून सुरू झालेल्या चळवळीच्या गाण्यांची परंपरा चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली. आदर्श, उत्कर्ष यांनी अतिशय आत्मीयतेने ही परंपरा सुरू ठेवली आहे.

लित पँथरची चळवळ सुरू झाली तेव्हा प्रल्हाद शिंदे या चळवळीचे मुख्य आवाज होते. पँथरचे नेते नामदेव ढसाळ, राजा ढाले, भाई संगारे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्या राज्यभर सभा होत असत. त्या वेळी प्रत्येक सभेपूर्वी प्रल्हाद शिंदे आणि माझे गाणे सादर होत असे. त्या वेळी राज्यात दलित पँथरची कुठेही सभा असो, आयोजक माझ्या वडिलांना आणि मला बोलवायचे. मोजकी चार माणसे सोबत घेऊन आम्ही कार्यक्रमाला जायचो. पँथरच्या सभेत वडिलांच्या गाण्याचा कार्यक्रम ठरलेला असायचा. तेव्हा हॉटेल नव्हते. आम्ही कार्यकर्त्यांच्या घरी थांबायचो. गावाला जाण्यासाठी धड रस्तेही नव्हते. बैलगाडीतून प्रवास करून तिथे पोहचत असायचो. कार्यक्रमासाठी स्टेज तयार केला जात नसायचा. केवळ सतरंजी अंथरुन कार्यक्रम सुरू व्हायचा. छोटा माईक असायचा आणि वडिलांचे गाणे सुरू व्हायचे. कार्यक्रम रात्री उशिरा सुरू व्हायचा आणि सकाळपर्यंत चालायचा.

कित्येकदा गावाच्या चावडीवर कार्यक्रम करू देण्यास गावकऱ्यांकडून विरोध व्हायचा. कार्यक्रम मध्येच थांबवला जायचा. इतर समाज कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हल्ले करायचे. अशा वेळी कार्यक्रम छोट्याशा ठिकाणी, बुद्धविहारात घेतला जायचा. अनेक अडथळे येऊनही कधी वडिलांनी कार्यक्रम अर्धवट सोडला, गावातून परतले असे झाले नाही. मी पँथर आहे. कार्यक्रम करूनच जाईन, अशी प्रल्हाद शिंदे यांची ठाम भूमिका असायची. या कार्यक्रमाचे मानधन वडील कधी मागत नव्हते. आयोजकांकडून काही दिले गेले तर ते स्वीकारायचे.

हम तो आशिक है, भीमजी पे मरते हैं

नाम पे उन के देंगे कुर्बानी

मुझे दुनिया कहे पागल

मै भीम का दिवाना हूँ!

हे गाणे मी खास दलित पँथर चळवळीसाठी तयार केले होतो. मी ज्या समाजात जन्म घेतला आहे, ती चळवळ पुढे घेऊन जाणे माझे कर्तव्य आहे ही त्यामागची भावना होती. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजासाठी हे करत राहीन असे मी अभिमानाने म्हणायचो. हे गाणे सुरू झाले की तरुणाईचे रक्त सळसळायचे. ठेका धरून तरुण नाचायला लागायचे. अन्यायाविरुद्धचा निखारा या गाण्यामुळे मनामनात पेटायचा. आज या गाण्याला कित्येक वर्षे उलटून गेली; मात्र ते आजही तेवढेच हिट आहे. प्रत्येक कार्यक्रमात अगदी रिॲलिटी शोमध्ये या गाण्याची फर्माईश होतेच.

तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय

समाजाचं काय गड्या समाजाचं काय?

आंबेडकरी समाजाला अंतर्मुख करणारे वामनदादा कर्डक यांचे हे गाणे दलित पँथरच्या चळवळीमध्ये जोश भरायचे. बाबासाहेबांमुळे तुम्हाला सर्व मिळाले; मात्र समाजाचे काय. चळवळीत सहभागी व्हा असे आवाहन करणारे हे गाणे. वामनदादांच्या उपस्थितीत मी टी सिरीजसाठी हे गाणे रेकॉर्ड केले. चळवळींना बुलंद आवाज देणारे वामनदादा कर्डक माझ्यावर मुलासारखे प्रेम करायचे. माझ्या शब्दांचे सोने करणारा आनंद आहे, असे ते कौतुकाने म्हणायचे. हे गाणे जेव्हाही गायचो, लोक अंतर्मुख होत असत.

दलित पँथरचे सुरुवातीचे दिवस भारावलेले होते. गावोगावी आंबेडकरी गीतांचे जलसे होत असत. या माध्यमातून वडील (प्रल्हाद शिंदे) आणि मी आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून दलित पँथरच्या विचाराचा, कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करत फिरत असायचो. यानिमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

रणशिंग फुंकीले भीमा तू जाळण्या गुलामी

या निळ्या सैनिकांची घे निळी सलामी

माझ्या वडिलांनी गायलेले गाणे, दलित पँथरच्या चळवळीत सर्वाधिक गायले जायचे. हे गाणे मी संगीतबद्ध केले तेव्हा बाबासाहेबांनी अन्यायाचा कसा प्रतिकार केला, तो संघर्ष या गाण्यातून मांडला आहे. हे गाणे मला गायची संधी मिळाली. पुढे मुलगा आदर्श शिंदे यानेही हे गाणे त्याच्या पद्धतीने गायले आहे.

दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना

मी पाहिला भीमराव जनतेसाठी लढताना...

अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्यासाठीचे हे गाणे होते. त्या काळी राज्यात कुठल्या तरी गावात अत्याचार झाला, त्या वेळी बातम्या इतर जिल्ह्यात पोहोचत नसत. कारण आजच्यासारखा सोशल मीडिया तेव्हा नव्हता. केवळ छापील वृत्तपत्राच्या माध्यमातून दलित अत्याचाराच्या बातम्या पुढे यायच्या; मात्र मी आणि माझे वडील या पँथरच्या सभांच्या माध्यमातून अत्याचाराला वाचा फोडण्याचे, दुसरीकडे याबद्दल सांगण्याचे काम करायचो.

दलित पँथरच्या चळवळीत केवळ गायक म्हणून मी गायलो नाही, तर पँथर म्हणून चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला, त्याचा मला अभिमान आहे.

पँथरच्या काळात घरातील सर्वच सदस्य आंबेडकरी चळवळीत भाग घ्यायचे. आजही ६ डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करायला घरातला प्रत्येक सदस्य सामान्य आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून चैत्यभूमीवर जातो. आंबेडकरी समाजातले अनेक कलाकार मोठे झाले, सेलिब्रिटी झाले; मात्र ते चैत्यभूमीत फिरकत नाहीत, याची मनाला खंत वाटते.

सैनिक हो भीमाचे भीमराव आठवा रे

भीमराव आठवा रे चला निळ्या निशाणाखाली

सर्वांनी एक व्हा रे!

दलित पँथर चळवळ ओसरल्यानंतर ९० च्या दशकात सर्व रिपब्लिकन नेते विखुरले गेले. मी प्रचंड निराश झालो. त्या वेळी मी समाज एक व्हावा म्हणून हे गाणे केले. आपले मतभेद विसरून निळ्या निशाणाखाली एकत्र यावे, ही साद मी या गाण्याच्या माध्यमातून घातली. तरीही रिपब्लिकन ऐक्य होत नाही म्हणून मी घाटकोपरच्या रमाबाई चाळीत उपोषण केले. पाच दिवस उपोषण चालले, पाचव्या दिवशी रामदास आठवले यांच्यासह अनेक रिपब्लिकन नेते आले. माझे उपोषण सोडवले. अशक्तपणा आल्यामुळे ते मला राजावाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

खैरलांजी हत्यांकाडाने देश हादरून गेला होता. हे हत्याकांड का झाले, कसे झाले हे मांडण्याचा निर्णय मी घेतला. त्या वेळी खैरलांजी हत्याकांडाची संपूर्ण कथा मी या गाण्यातून मांडली. यावर संपूर्ण गाण्यातून हे भंयकर सत्य सांगणारा कदाचित मी पहिला गायक होतो.

औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरच्या चळवळीसाठी शोभूनी दिसते कमानीवर नाव भीमराव आंबेडकर, हे गाणे मी खास तयार केले होते. ते गाणे नामांतर चळवळीत लोकप्रिय ठरले होते. नामांतर चळवळ यशस्वी झाली, त्यानंतर मी आवर्जून स्टेजवर एक शेर पेश करायचो.

लेकरू जर का भीमाचे जळाले नसते

तर नाव विद्यापीठाला बाबांचे कधी मिळाले नसते

दलित पँथरपासून सुरू झालेल्या चळवळीच्या गाण्यांची पंरपरा चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली. आदर्श, उत्कर्ष यांनी अतिशय आत्मियतेने ही पंरपरा सुरू ठेवली.

भीम आमचा बाप

आम्ही भीमाची औलाद

आम्ही पँथर

या गाण्यातून उत्कर्ष, आदर्शने दलित पँथरच्या आठवणी जागवल्या. त्याचा मला खूप आनंद वाटतो. दलित पँथरची चळवळ संपली असेल; मात्र आमच्यातला पँथर अजून संपलेला नाही, संपणार नाही.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()