Kailash Waghmare: कैलास वाघमारे हे नाव आता मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे.
कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याबरोबरच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलासला वेगळी ओळख मिळवून दिली.
त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. त्याने त्याच्या कामाने सर्वांना अवाक करून दखल घ्यायला भाग पडले आहे. लवकरच त्याचा आगामी ‘गाभ’ हा मराठी चित्रपट येणार आहे.
याच निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने मनोरंजन विश्वाचं भयानक वास्तव मांडलं. कामपेक्षा तुमच्या जातीला, दिसण्याला किती महत्व दिलं जातं यावर त्याने सडेतोड भाष्य केलं. त्याची ही मुलाखत चर्चेचा विषय ठरत असतानाच, 'मित्र म्हणे..' या पॉडकास्ट मध्ये त्यांनी जात वास्तवावर अत्यंत गंभीर आणि महत्वाचं भाष्य केलं आहे.
आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय दरी पाहायला मिळते, समानतेचा नारा सगळीकडून दिला जात असला तरी वास्तवात तसं आहेका हा देखील एक चर्चेचाच मुद्दा आहे. अशातच कैलासने मांडलेली बहुजणांची व्यथा आपल्याला विचार करायला भाग पाडते.
या मुलाखतीत कैलास म्हणाला, ''माझी आजी वारकरी होती. माझ्या आईची आई.. ती दिंडीमध्ये पंढरपूरला पायी चालत जात होती.. आजवर की गोष्ट मी कधीच कुठेच बोललो नाही. पण आज ओघओघाने विषय निघाला म्हणून बोलतो आहे. कारण अशावेळी मनातलं बाहेर आलेलं बरं असतं.''
''एक गोष्ट सांगतो, मला असं वाटतंय की, जेवढे बहुजन लोक माळकरी झाले किंवा देवा धर्माच्या नादी लागले. ते त्यांना देव आवडतो म्हणून नाही किंवा त्यांचं देवाने काही भलं केलं म्हणूनही नाही.. तर आम्हाला तुमच्यात स्थान मिळावं म्हणून ते इकडे वळले.'' अशा परखड शब्दात कैलासने आपले मत मांडले.
आपल्या समाजाचा एक भाग होता यावा ही आस बहुजन लोकांमध्ये होती. असे कैलास म्हणाला. या निमित्ताने कैलासने एका वेगळ्या विषयाला निर्भीडपणे वाचा फोडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.