काल सगळीकडे अयोध्या राम मंदिर सोहळ्याचं उत्साहाचं वातावरण होतं. अशातच उद्धव ठाकरेंनी मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. याच पार्श्वभूमीवर नुकतेच उद्धव ठाकरे गटात गेलेले किरण माने यांनी पोस्ट लिहून काळाराम मंदिराचा इतिहास सांगितला आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन केलेल्या पुजेचं महत्व सांगितलं आहे.
किरण माने लिहीतात, "नाशिकचं काळाराम मंदिर हे भारतातल्या एका लै मोठ्या क्रांतीकारक घटनेचा जिताजागता सबूत आहे भावांनो ! आपल्यासारख्याच हाडामांसांच्या माणसांनी, माणसात येण्यासाठी केलेला संघर्ष पाहिलाय इथल्या एकेका पत्थरानं...तो ही पुर्वाश्रमीच्या 'हिंदूं'चा संघर्ष !
ज्या रामानं शुद्र मानल्या गेलेल्या शबरीची उष्टी बोरं आनंदानं खाल्ली... त्याच शबरीच्या लेकरांना मात्र या काळाराम मंदिराची पायरीबी शिवायला बंदी होती. मानवता श्रेष्ठ मानणारा प्रभू श्रीरामचंद्र भेदाभेद मानणार्या वैदिकांनी 'हायजॅक' केला होता. चातुर्वर्ण्यासारख्या नीच परंपरेनं आपल्याच हिंदू धर्मातल्या आपल्याच माणसांचा, रामाला विटाळ होतो असं घोषित केलं होतं."
किरण माने पुढे लिहीतात, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं, या जातीव्यवस्थेच्या उतरंडीवर घाव घालायचा. वैदिकांच्या दडपशाहीविरोधात बंड पुकारलं. "आम्ही हिंदू आहोत. मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे. तो आम्ही मिळवूनच शांत बसू." अशी डरकाळी फोडली.
२ मार्च १९३० ला बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. दोन दिवसांत महाराष्ट्रभरातनं पंधरा हजार हिंदू गोदातीरी जमा झाले. बाबासाहेबांनी भाषण केलं आणि आंदोलन सुरू झालं.
खरंच मनापास्नं विचार करा भावांनो, धर्म ही संकल्पना किती सोयीनं वापरली जाते ! आपल्याच धर्मातली आपलीच माणसं, आपल्या माताभगिनी कुठला देव अस्पृश्य मानेल??? असा कसा असेल धर्म? असो.
तर बाबासाहेबांनी खूप काळजी घेतली होती की कुठेही या सत्याग्रहाला गालबोट लागू नये. पण बाबासाहेब मंदिराच्या दुसर्या बाजूला असताना, रामनवमीचा रथ बाहेर निघाला तेव्हा अचानक या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. दोन गट आक्रमक झाले. मारामारी, दगडफेक झाली. बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहोचेपर्यन्त दगडांचा तुफानी वर्षाव सुरू झाला. पोलिसांचं कडं फोडून भास्कर कद्रे नावाचा भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला. बाबासाहेबही जखमी झाले. हा सत्याग्रह पाच वर्ष चालला."
किरण माने शेवटी लिहीतात, "शेवटी मंदिर प्रवेश न मिळाल्याने व्यथित होऊन डॉ. आंबेडकर यांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली आणि देशाच्या इतिहासाला नवं वळण मिळालं !
आज सगळे समाज सुशिक्षित झाले आहेत. स्वत:चा विचार करायला शिकले आहेत. या अख्ख्या प्रकाराचा आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या धडावर असलेल्या आपल्या डोक्यातील आपल्या मेंदूने शांतपणे विचार करूया...
आपल्या वडिलांनी आपल्या सावत्र आईला दिलेल्या शब्दाचा मान राखून राजवैभव त्यागणार्या रामाच्या 'काळाराम मंदिरा'त आज उद्धवजी ठाकरे आपल्या सगळ्या जातीच्या बहुजन सहकार्यांसह जाऊन महापुजा केली ही साधी घटना नाही. बरेचजण याला राजकारण म्हणतील. ते असेलही... पण याचवेळी हा ही विचार करा की आज वैदिक विषमतावादी धर्माचं राजकारण करणार्यांचा उन्माद पहाता... त्याला काऊंटर म्हणून ज्या मंदिरात आपल्या क्रांतीसुर्यानं त्या विषमतेवर पहिला घाव घातला... तिथेच पुजा करून समतावादी धर्माच्या वाटेवर जाण्याची सूचक कृती करणं, या चालीला राजकारण म्हणूनही खूप मोठे मोल आहे, हे नाकारुन चालणार नाही.
आज सगळ्या विरोधकांनी नांगी टाकलेली असताना राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारताना सगळ्यात समर्पक उत्तर देणारे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय प्रेरणादायी प्रयत्नांना कमी लेखाल तर खुप मोठी किंमत मोजावी लागेल. वैदिकांच्या, मनुवाद्यांच्या विषारी विळख्यात गेलेले राजकारण हळूहळू का होईना शिव शाहु फुले आंबेडकरी वाटेवर नेण्याची हीच योग्य वेळ आहे. राम राम."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.