रिमी सेनला चार कोटींचा गंडा; व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून अभिनेत्रीची केली फसवणूक
Actress Rimi Sen
Actress Rimi Sen
Updated on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनची सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव येथील एका व्यावसायिकाविरोधात खार पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावरुन आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रिमीनं ‘धूम’, ‘गोलमाल’, ‘हंगामा’, ‘बागबान’, ‘फिर हेरा फेरी’ आदी चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. (actress Rimi Sen cheated of Rs 4 crore filed Fir against businessman)

पोलिसांच्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये अंधेरी येथील व्यायामशाळेत रोनक जतीन व्यास या आरोपी व्यावसायिकाशी तिची ओळख झाली होती. रोनकने तिला तिमाही ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवल्यामुळं रिमी सेननं तिच्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून चार कोटी १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पण कालांतरानं तिने गुंतवलेल्या पैशातून तिला नफा किंवा गुंतवलेली मूळ रक्कमही मिळाली नाही. तसेच व्यावसायिकाने तिच्याशी संपर्क तोडल्यानं आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिनं खार पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी खार पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. अंधेरी येथील रहिवासी असलेल्या अभिनेत्री रिमीनं शुभमित्र स्वपनकुमार सेन या आपल्या खऱ्या नावानं पोलिसांत तक्रार दाखल आहे.

आरोपी व्यास हा मूळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असून सध्या गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात राहतो. व्यासची गुजरातमध्ये ‘फोमिंगो बेव्हरेज’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी कमोडिटी व्यवसायात गुंतवणूक करते असं रिमीला सांगण्यात आलं होतं. व्यासनं रिमीचा विश्वास संपादन करण्यासाठी पैशांच्या सुरक्षेची हमी म्हणून साडे तीन कोटी रुपयांचा आगाऊ धनादेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

रिमी सेनची कशी झाली फसवणूक?

रिमीनं फेब्रुवारी ते जुलै २०१९ दरम्यान व्यासच्या कंपनीच्या बँक खात्यात एकूण एक कोटी रुपये हस्तांतरीत केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर व्यासनं तिच्या गुंतवणुकीवर ४० टक्के परतावा देण्याचे वचन दिलं होतं. यानंतर रिमीनं ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान तीन कोटी १४ लाख रुपये रुपये व्यासच्या आकाऊंटवर ट्रान्सफर केले. अशा प्रकारे तिनं एकूण चार कोटी १४ लाख रुपये व्यासच्या व्यवसायात गुंतवले. त्यानंतर ठरलेल्या अवधीत व्यासने रिमीला पैसे परत केले नाहीत. तिने पैशांची मागणी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. मार्च २०२० मध्ये अभिनेत्रीनं व्यासकडे तिच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर त्यानं रिमीच्या कंपनीच्या खात्यात तीन लाख रुपये हस्तांतरीत केले. पैसे परत न मिळाल्यानं नाराज झालेल्या अभिनेत्रीनं व्यासनं दिलेला चेक बँकेत टाकला असता. संबधित खातं हे यापूर्वीच बंद केल्याची माहिती समोर आली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर खार पोलिसांनी भादंवि कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत व्यासविरोधात गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.