ऑन स्क्रीन : ‘रिक अँड मॉर्टी’ : अनन्यसाधारण ॲनिमेटेड सिटकॉम

२०१४ मध्ये ‘रिक अँड मॉर्टी’ ही मालिका समोर आली आणि त्यानंतर या मालिकेची लोकप्रियता आणि मालिकेतील विचित्रपणा उत्तरोत्तर वाढत गेल्याचे दिसते.
Rick and Morty
Rick and Mortysakal
Updated on
Summary

२०१४ मध्ये ‘रिक अँड मॉर्टी’ ही मालिका समोर आली आणि त्यानंतर या मालिकेची लोकप्रियता आणि मालिकेतील विचित्रपणा उत्तरोत्तर वाढत गेल्याचे दिसते.

२०१४ मध्ये ‘रिक अँड मॉर्टी’ ही मालिका समोर आली आणि त्यानंतर या मालिकेची लोकप्रियता आणि मालिकेतील विचित्रपणा उत्तरोत्तर वाढत गेल्याचे दिसते. या मालिकेपूर्वी ‘कम्युनिटी’ या रंजक सिटकॉमची निर्मिती करणारा डॅन हार्मन आणि ‘ॲडवेंचर टाइम’ या ॲनिमेटेड मालिकेसाठी प्रसिद्ध असणारा जस्टिन रॉयलंड यांनी निर्माण केलेली ही मालिका लागलीच अमेरिकन पॉप-कल्चरचा अविभाज्य भाग बनली. प्रौढांसाठीच्या या ॲनिमेटेड मालिकेचा ताजा, सहावा सीजन गेल्या वर्षी आला आहे.

रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘बॅक टू द फ्युचर’वरून (१९८५) प्रेरित पात्रे आणि मुलभूत घटनाक्रम ‘रिक अँड मॉर्टी’ची सुरुवात करून देतो. मात्र, लवकरच या मुलभूत प्रेरणा बाजूला पडून रॉयलंड व हार्मन आणि त्यांच्या साथीदारांचा विक्षिप्त, रंजक आणि तिरकस दृष्टिकोन मालिकेचे अवकाश व्यापतो.

रिक हा एक दारूडा, वैज्ञानिक म्हातारा आणि मॉर्टी हा त्याचा नातू - हे दोघे मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत. या जोडगोळीच्या अंतराळ-ब्रह्मांड, परग्रह, परग्रहवासी वगैरेंवरील साहसी मोहिमा पाहत असताना रिकचा आत्मसंतुष्ट नि आत्ममग्न स्वभाव, मॉर्टीच्या मनातील अनेकविध प्रकारची भीती, दोघांच्या वैयक्तिक-कौटुंबिक समस्या समोर येतात.

अनेक स्तरांवरील अतिशयोक्ती, विचित्र-विक्षिप्तपणापासून अजिबात अंतर राखून नसलेल्या दृष्टिकोनाबाबत ‘रिक अँड मॉर्टी’ ही ‘बोजॅक हॉर्समन’सारख्या समकालीन मालिकेच्या जवळ जाणारी आहे. मुख्य पात्रांचे अतिमद्यपान आणि एकूणच मादक पदार्थांचे सेवन, त्यांचे नैराश्य आणि आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, या साऱ्याचा त्यांच्या आयुष्यावरील परिणाम या बाबी दोन्हीकडे समान आहेत.

‘रिक अँड मॉर्टी’ ही मालिका अनेकविध चित्रपट, मालिका, चित्रपट विधा, संस्कृतींवरील तिरकस विनोद आणि उपहासाकरिता प्रसिद्ध आहे. ज्यात अनेक कलाप्रकार, कलाकृतींच्या विडंबनांचा समावेश होतो. ‘क्लोज रिक-काउंटर्स ऑफ द रिक काइन्ड’ किंवा ‘द रिकशॉन्क रिडेम्प्शन’ किंवा ‘रिकलस्टार रिकलॅक्टिका’ ही मालिकेच्या भागांची शीर्षके पाहिली, तरी या प्रकाराची कल्पना आणि लेखक-निर्माणकर्त्यांचे शब्द खेळावरील प्रेम लक्षात येऊ शकेल.

मालिकेचे वैशिष्ट्य हे तिने मुख्य प्रवाहापासून हटकून व फटकून, एका स्वतंत्र मार्गावर अस्तित्त्वात असण्यात आहे. रॉयलंड आणि हार्मन प्रेक्षक त्यांची बौद्धिक पातळी याविषयी विचार न करता आपल्याला मांडायचा असलेला मुद्दा ठळकपणे मांडत राहतात. त्यामुळेच विक्षिप्त, सीरियल मोहिमांसोबतच नैराश्यासारख्या मुद्द्यावरील तरल आणि धीरगंभीर भागही मालिकेत पाहायला मिळतात.

‘पिकल रिक’ हा तिसऱ्या सीजनमधील भाग या प्रकाराचे सर्वोच्च शिखर मानता येतो. यांसारख्या भागांनी मालिकेला लोकप्रियतेसोबतच एमी पुरस्कारही मिळवून दिलेला आहेत. ज्यात मालिकेच्या प्रचंड विचित्र, म्हटल्यास पोरकट, तरी त्याच वेळी प्रचंड प्रौढ व संयत दृष्टिकोन पाहायला मिळतो. हे निर्माण करण्यास अवघड रसायन नक्की कशा रीतीने निर्माण केले जाते, यासाठी ‘रिक अँड मॉर्टी’ पाहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.