लोकसंगीत म्हणजे लोकांना आवडणारी गाणी... लोकगीतांची मला अगदी लहानपणापासूनच फार आवड होती. माझी सुरुवातच लोकगीतापासून झाली.
लोकसंगीत रेकॉर्ड करताना मी वेगवेगळे प्रयोग करायचो. एखादं गाणं लिहिल्यानंतर, गाणं तयार झाल्यानंतर मी ते गाणं सर्वप्रथम माझ्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांसमोर थेट गायचो. हे गाणं गात असताना प्रेक्षक त्या गाण्याला कसा प्रतिसाद देतात, त्या गाण्यातलं त्यांना नेमकं काय आवडतं हे जाणून घ्यायचो आणि त्यानंतर हे गाणं रेकॉर्ड करायचं की नाही हे ठरवायचो. त्यातून लोकसंगीताच्या प्रयोगशील रसिकाश्रयाने मी समृद्ध झालो आहे.
लोकसंगीत म्हणजे लोकांना आवडणारी गाणी... लोकगीतांची मला अगदी लहानपणापासूनच फार आवड होती. माझी सुरुवातच लोकगीतापासून झाली. ते लोकसंगीताचे दिवस होते. अनेक लोकगीतं त्यावेळी फेमस झाली होती. द्विअर्थी गाणी त्याकाळी फार चालत असत. ‘मळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी’, ‘ह्यो ह्यो पावणा’, ‘सकुचा मेव्हणा’, ‘तुझ्याकडे बघून हसतोय ग’, ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’, ‘जसं पोळीवर पडलंय तूप’, ‘वरमाई रुसली, ऐन लग्नात जी’ अशी काही लोकगीतं, काही द्विअर्थी लोकगीतं लोकांच्या तोंडावर होती. प्रल्हाद शिंदे, श्रावण यशवंते, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, रंजना शिंदे यांची फार चलती होती. त्यांच्यामुळेच लोकगीतांवर जास्तीत जास्त कल होता. तेव्हा माझी नुकतीच सुरुवात होती. एवढे दिग्गज असताना आपले पाय रोवणे, लोकगायक म्हणून जागा तयार करणे एवढं सोपं नव्हतं. जेव्हा मी मुकाबल्याला सुरुवात केली, त्या वेळी सुरुवातीला फक्त गणपतीचं आणि सत्यनारायनाचं गाणं गायचो; पण लोकांना ही गाणी कधी संपतील आणि लोकसंगीताला कधी सुरुवात होईल, असं वाटायचं. त्या वेळी माझ्याकडे सामाजिक प्रबोधन करणारी गाणी काही फार नव्हती. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकगीतानेच मुकाबले यशस्वी करायचो आणि लोकगीतानेच समोरच्या पार्टीवर मात करायचो.
मी नवनवीन लोकगीतं आणायचा प्रयत्न करायचो. प्रचंड तयारी करायचो. त्यामुळे समोरच्या पार्टीलादेखील आठ-आठ दिवस सराव करावा लागायचा. लोकगीताच्या माध्यमातून मी तयारी करून जम बसवायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे माझ्या लोकगीतांना एक धार यायची, जी थेट श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घ्यायची. त्यामुळे विरोधी पार्टीलाही घाम फुटायचा. आनंद शिंदे यांच्या लोकगीतांचा मुकाबला कसा करायचा, यासाठी ते सतत प्रयत्न करायचे. यातूनच खऱ्या अर्थाने माझं लोकसंगीत खुललं आणि फुललं. तिथूनच खऱ्या अर्थाने माझ्या लोकगीतांच्या आणि लोकसंगीताच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर माझ्या वाट्याला जास्तीत जास्त लोकगीतंच आली. माझ्या लोकसंगीताच्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘माझा नवीन पोपट हा’, ‘शुभमंगल सावधान’ या लोकगीतात वेगवेगळा बाज आणून यातच मी जास्तीत जास्त गाणे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वीही झालो.
सुरुवातीला स्टेज शो करण्यावर माझा आणि माझा भाऊ मिलिंदचा अधिक भर होता. थेट प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांच्या काळजाला भिडणारं गाणं गायचं यात एक वेगळीच मजा होती. त्यानंतर मात्र आम्ही काही वेगवेगळे प्रयोग करण्याच्या प्रयत्न केला. जसा उर्दू कव्वाल अजीज नाजा हिंदी पंचरंगी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता, त्या प्रकारचे काही कार्यक्रम करायचे ठरवले. त्यासाठी दादा कोंडके यांची पंचरंगी कार्यक्रम गाणी तयार करायची होती. ही जबाबदारी मिलिंदने घेतली. त्याने पंचरंगी गाण्यांसाठी त्या वेळचे प्रसिद्ध गीतकार रमेश वाकचौरे यांना विनंती केली, मात्र ते व्यग्र असल्यामुळे म्हणा किंवा त्यांचा मूड नसेल म्हणून म्हणा, ते पंचरंगी गाणी करून द्यायला काही तयार होईनात. आमची पंचायत झाली. पंचरंगी गाणी तर लिहून घ्यायची होतीच, मग आता करायचं काय, असा प्रश्न पडला. शेवटी मिलिंदने एक शक्कल लढवली. वाकचौरे यांना मद्यपानाची फार आवड होती. मिलिंदने ती हेरली.
वाकचौरे यांच्या लेखणीतून ‘पंचरंगी गाण्यां’ची नशा बेफाम झाली. त्यात दादा कोंडके यांचे धमाल गीत ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’, ‘अग ये जवळ ये लाजू नको’, ‘चल खेळ खेळू दोघे’ ही गाणी बसवली, जी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली...
अशा साकार झालेल्या पंचरंगी कार्यक्रमात खूप धमाल व्हायची. त्यानंतर या पंचरंगी कार्यक्रमाचे वाकचौरे यांना वेगळे पैसेदेखील मिळाले. गंमत म्हणजे यापुढे मद्याशिवाय मी पंचरंगी कार्यक्रम लिहिणार नाही, असं वाकचौरे आम्हाला थट्टेने म्हणायचे. त्या पंचरंगी कार्यक्रमाची नशा आजही कमी झालेली नाही. त्यानंतर मी वेगळ्या प्रकारची गाणी गायला सुरुवात केली. तीही श्रोत्यांना आवडू लागल्याने माझ्या वाट्याला इतर वेगवेगळ्या प्रकारची गाणीदेखील आली... त्यामध्ये मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘सोनियाची उगवली सकाळ’, ‘साईबाबांची भक्तिगीते’, वेगळ्या प्रकारची ‘देवी-देवतांची गाणी’ही माझ्याकडे भरपूर आली. काही अमृतवाणीही गायल्या. अशा प्रकारे मग वेगळ्या प्रकारची गाणी गाणे सुरू झाले; पण लोकगीत आणि आनंद शिंदे यांचं एक वेगळंच समीकरण तयार झालं. आजही लोकसंगीत किंवा द्विअर्थी प्रकारातील एखादे गाणे तयार करायचं असेल, तर ते गाऊन घेण्यासाठी पहिलं नाव येतं ते आनंद शिंदे यांचं. अशा प्रकारे मी श्रोते आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा बनवायचा प्रयत्न केला आहे. त्यातून माझी एक लोकसंगीताची वेगळीच दुनिया बनली आहे. या माझ्या दुनियेत मायबाप प्रेक्षकांनी इतर कुणालाही प्रवेश करू दिला नाही, त्यात प्रवेश करणं कुणाला शक्यही झालं नाही. लोकसंगीतावर आजही माझं राज्य चालतं, लोकसंगीतावर आधारित बनलेली गाणी मी आजही गायलो, तर लोकांना खूप आवडतात.
लोकसंगीत रेकॉर्ड करताना मी वेगवेगळे प्रयोग करायचो. एखादं गाणं लिहिल्यानंतर, गाणं तयार झाल्यानंतर मी ते गाणं सर्वप्रथम माझ्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांसमोर थेट गायचो. हे गाणं गात असताना प्रेक्षक त्या गाण्याला कसा प्रतिसाद देतात, त्यांना ते गाणं आवडतंय का? त्या गाण्यातलं त्यांना नेमकं काय आवडतं हे जाणून घ्यायचो आणि त्यानंतर हे गाणं रेकॉर्ड करायचं की नाही, हे ठरवायचो. मायबाप प्रेक्षकांना गाणं नाही आवडलं किंवा त्या गाण्याला कमी प्रतिसाद मिळाला, तरी मी ते गाणं कधीही रेकॉर्डिंगला घेत नव्हतो. जे गाणं लोकांना-प्रेक्षकांना आवडतं तेच गाणं मी रेकॉर्डिंगसाठी निवडायचो. त्या गाण्याची रेकॉर्डिंग करून ते कॅसेटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचो. आताही मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी जातो, तेव्हा मला वाटतील ती गाणी कधीच गात नाही. प्रेक्षक जी फर्माइश करतात, प्रेक्षकांना जी गाणी आवडतात तीच गाणी आजही स्टेजवर, माझ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गातो. जे प्रेक्षकांना आवडतं तेच लोकसंगीत असतं, त्यामुळेच प्रेक्षकांना आवडणारं गाणं मी गातो, जे त्यांना आवडत नाही, ते मी त्यांच्यावर जबरदस्तीने लादत नाही. या फर्माईशी पूर्ण करण्यामध्ये कार्यक्रमाचे तीन-चार तास कधी निघून जातात, तेच कळत नाही. मात्र त्यामुळे माझा प्रत्येक कार्यक्रम अधिक रंगतदार होतो. मायबाप प्रेक्षकही एन्जॉय करतो. कार्यक्रम अगदी फुलून जातो. प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद लागतो आणि त्यातून मला एक वेगळी ऊर्जादेखील मिळते. मायबाप प्रेक्षकांच्या या ऊर्जेनेच मला आजपर्यंत लोकसंगीताच्या अव्वल स्थानावर टिकवून ठेवलं आहे.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.