आठवणीतील लक्ष्मीकांत बेर्डे...

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी माझ्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही ग्रेट आहेत, याची मला जाणीव झाली.
laxmikant berde
laxmikant berdesakal
Updated on

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी माझ्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही ग्रेट आहेत, याची मला जाणीव झाली. त्या दिवसानंतर त्यांच्यात आणि माझ्यात मैत्रीचं नवं नातं सुरू झालं...

माझं ‘नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला...’ हे गाणं म्हणजे माझं पहिलंवहिलं सुपरहिट लोकगीत. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्या काळात सर्वाधिक कॅसेट्स एका दिवसात विकल्या गेल्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. गाण्याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेने प्रभावित होऊन चंपक जैन यांनी जुहूच्या ‘सी प्रिंसेस’ हॉटेलमध्ये सक्सेस पार्टी आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यात एक असा कलाकार उपस्थित होता, ज्यांनी आपल्या कामाने मलाच काय संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. तो कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे ..!

मी त्यांचा खूप मोठा फॅन होतो. त्यांच्याच हस्ते मला डबल प्लॅटिनम डिस्क देऊन गौरवण्यात येणार आहे, हे जेव्हा मला कळलं, तेव्हा माझा आनंद मी तेव्हाही शब्दात मांडू शकलो नाही आणि आजही मांडू शकत नाही. माझी आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची ती पहिली भेट. त्या सोहळ्यात आमच्यात खूप गप्पा झाल्या. त्यांनी मला शाबासकीची थाप दिली आणि म्हणाले, ‘‘या एकाच गाण्यात तुम्ही अख्ख्या जगाला नाचायला भाग पाडलंत आणि मीही तुमचा फॅन झालो आहे.’’

माझ्या गाण्याचे शब्दन् शब्द त्यांना पाठ होते, हे ऐकून मला फारच आनंद झाला. ज्या कलाकाराचे आपण फॅन आहोत, त्या कलाकाराने आपलं इतकं मनापासून कौतुक करणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लवकरच नव्या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे आणि त्यात त्यांना माझ्या आवाजात एक गाणं गाऊन हवं आहे. ते म्हणाले, ‘माझ्या कामातली एनर्जी आणि तुमच्या आवाजातील ताकद तोडीस तोड आहे. त्यामुळे एक धडाकेबाज गाणं या चित्रपटात झालंच पाहिजे.’

तो चित्रपट म्हणजे ‘मज्जाच मज्जा’ आणि गाणं म्हणजे ‘पोपट बोलतोय मिठू मिठू’. तो काळ लाईव्ह रेकॉर्डिंगचा होता. त्यावेळी गाणी पूर्वतयारीनिशी सर्व लाईव्ह वादकांसोबत एका दमात रेकॉर्ड होत होती. या गाण्यात माझा एक वेगळा चंक होता आणि माझ्यासोबतच इतरही गायक-गायिका आणि भरपूर वादकांचा ताफा स्टुडिओत होता. लक्ष्मीकांत बेर्डे स्वतः जातीने हजर होते आणि माझ्या रेकॉर्डिंगदरम्यान त्यांनी मला खूप प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला.

रेकॉर्डिंगनंतर काही दिवसांत त्यांचा मला फोन आला, की या गाण्यात पडद्यावर त्यांना असं दृष्य हवं आहे की माझाच कार्यक्रम सुरू आहे आणि माझ्याच तोंडी हे गाणं आहे. तसेच ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावरही चित्रित होणार आहे.

शूटिंगचा दिवस आला आणि मी सेटवर पोहचलो. काही वेळातच लोक लक्ष्मीकांत यांना विचारू लागले की ‘आनंद शिंदे’ हे भारतीय चित्रपट मंडळाचे सभासद नाहीत, तर त्यांना आपण कॅमेऱ्यासमोर कसं काय उभं करणार? ही बाब माझ्यापर्यंत न पोहचू देता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्याचक्षणी १५१ रुपयांची फी भरून मला भारतीय चित्रपट मंडळाचे लगोलग सभासद केले. त्यादिवशी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी माझ्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही ग्रेट आहेत, याची मला जाणीव झाली. आणि तो शूटिंगचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. त्या दिवसानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझ्यात मैत्रीचं नवं नातं सुरू झालं.

‘मज्जाच मज्जा'' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी अवघा महाराष्ट्र त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत फिरलो. त्या प्रवासादरम्यानचा एक किस्सा मला आठवतो. त्यांच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम अख्ख्या महाराष्ट्राला इतकं आहे, की त्यांना ‘सर’ किंवा ‘लक्ष्मीकांतजी’ असं न म्हणता लोक प्रेमाने ‘लक्ष्या’ म्हणायचे. तेव्हा ते मला मिश्किलपणे म्हणायचे, ‘अरे आनंद, मला कुणीच लक्ष्या मामा, लक्ष्या काका असंही म्हणत नाही.’ त्यावर मी त्यांना म्हणायचो, ‘तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इतके वेड लावले आहे की त्यांना त्यांचे ‘लक्ष्या’च वाटता.’ संपूर्ण प्रवासभर मी त्यांच्यासोबत लोटपोट होऊन हसतच होतो, एवढं मला आजही आठवतंय.

त्यानंतर मी त्याच्यासाठी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. ‘थरथराट’ चित्रपटातलं ‘राणी गं, गंगू गं’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. माझा कुठलाही नवीन लोकगीतांचा अल्बम बाजारात आला की तो ऐकून ते मला आवर्जून फोन करायचे. कायम मजा-मस्ती करत कौतुकाची थाप पाठीवर द्यायचे आणि म्हणायचे, ‘‘आनंद, अशीच गाणी बनवत राहा आणि लोकांचं मनोरंजन करत राहा.’’ नेहमी एका मोठ्या भावाप्रमाणे ते मला प्रोत्साहन देत राहायचे. आमच्यात इतका स्नेह होता की आजही मला असं वाटतं की लक्ष्मीकांत बेर्डे यांना माझा आवाज जमा सूट व्हायचा तितका कोणालाच सूट होत नाही. माझ्या गाण्यांना चित्रपटातून जिवंत करणारा तो पहिला कलाकार होता आणि माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावासारखा होता.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.