गाणी पावसाची, बळीराजाची

मान्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हिरवाईने नटणाऱ्या शेतीवाडीसोबत संगीताचेही चांगले ऋणानुबंध आहेत.
गाणी पावसाची, बळीराजाची
Updated on
Summary

मान्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हिरवाईने नटणाऱ्या शेतीवाडीसोबत संगीताचेही चांगले ऋणानुबंध आहेत.

मान्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हिरवाईने नटणाऱ्या शेतीवाडीसोबत संगीताचेही चांगले ऋणानुबंध आहेत. पावसासोबतच मला वडिलांची, माझी असंख्य गाजलेली गाणी आठवतात. पावसाच्या विविध छटा असलेली अनेक गाणी शिंदे कुटुंबाने आतापर्यंत गायली आहे. या सर्व गाण्यांचा केंद्रबिंदू माझा शेतकरी राजा होता. पावसाची विनवणी करणारे एकमेव लोकगीत गाण्याचा मानही शिंदेशाहीला मिळाला आहे. एक शेतकरी म्हणून याचा आजही मला गर्व वाटतो.

माझे वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांनी १९८३ मध्ये पाऊस पडण्यासाठी विनवणी करणारे पहिले, कदाचित एकमात्र लोकगीत गायले. ते गाणे होते, पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी शेत माझं, लय तान्हील, चातकावाणी...

त्या वेळी राज्यात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून वडिलांनी गाणे तयार केले होते. हे गाणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत अर्थपूर्ण आहे. ते कानावर पडले की गावाकडच्या आठवणी डोळ्यांपुढे यायला लागतात. शेतकरी पावसाला आपला मित्र म्हणून हाक मारतोय, पावसाला माझ्याकडे ये म्हणतोय. या गाण्यात हिरवळ, पाऊस, वारा, माती या सर्वांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तेव्हाच्या वेळी ही गाणी दूरदर्शन किंवा रेडिओवर वाजवायची. शेतकऱ्यांचे दु:ख या गाण्यातून व्यक्त व्हायचे. पेरणी व्हायची तेव्हा दु:ख जाऊन आनंद पसरायचा.

शेतकरी राजा ही कॅसेट करण्याअगोदर प्रल्हाद शिंदे म्हणाले, आकाशातून पाऊस पडेल तेव्हा पडेल; मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून जो अश्रूंचा पाऊस पडतोय, त्या दु:खाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हे गाणे गायले पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, सेव्ह साईल या सर्व पर्यावरण चळवळीतील गोष्टींचा त्या वेळच्या या गाण्यात अंतर्भाव होता.

मान्सून आला, शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला. तो चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. अशा वेळी मला वडिलांचे हे गाणे आठवते. त्या आठवणी जाग्या होतात. शिंदे कुटुंबाने असंख्य छटा असणारी पावसाची गाणी गायली आहेत. यामध्ये रोमँटिक गाणीही आहेत; मात्र बहुतांश गाण्यांतील केंद्रबिंदू हा आपला बळिराजा होता. हे गाणे विशेषत: गावाकडून शहरात स्थायिक झालेल्यांना आवडते. माझे वडील प्रल्हाद शिंदे जेव्हा कल्याण मार्केटमध्ये यायचे, तेव्हा त्यांचे मित्र आवर्जून त्यांच्याकडून ‘पड रे पाण्या’ हे गाणे गाऊन घेत असायचे. मीदेखील हे गाणे अनेकदा गायले, त्याच्यातला भावार्थ अनुभवला आहे.

पाण्याप्रमाणे तिसऱ्या पिढीत हे गाणे झिरपले. माझा मुलगा आदर्श, उत्कर्षने अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हे गाणे गायले. ३९ वर्षे उलटून या गाण्यावर आजही प्रेक्षक तेवढेच प्रेम करतात. पहिला पाऊस पडला रे पडला की आजही व्हाट्स ॲपवर सर्वाधिक फॉरवर्ड होणारे हे गाणे आहे.

शेतकरी दादा, शेतकरी दादा रे...

सांगतं हिरवं रान

तुझं शेती मळ्याचं गाणं

मी गातोय आनंदानं

पावसाची वाट पाहून शेतकरी जेव्हा पेरणी करतो आणि पाऊस पडायला सुरुवात होते. शेतात हिरवळ यायला लागते, पालवी फुटायला लागते, अंकुर फुटते त्याचा शेतकऱ्याला जो आनंद होतो, त्याचे हे गाणे आहे. माझा भाऊ मिलिंद आणि मी शेतकरी दादा हा अल्बम काढला होता. यामध्ये बळिराजाचे पावसाशी नाते, शेतातील सुख-दु:ख याचे वर्णन केले होते.

मोट वढतात बैल, नेटानी

पाणी झुळू झुळू वाहतेय पाटानं

स्वत: शेतात नांगर धरून

गहू, हरभरा पेरून

मिरच्या लावल्यात वाफ्याच्या काठानं

पाणी झुळूझुळू वाहतेय पाटानं...

शेतीची पेरणी सुरू झाली आहे. शेतात नवरा-बायको कष्ट करतात. आता शेतात पाणी सोडले जात आहे, त्या वेळी नवरा-बायकोची एकत्र मेहनत. त्याच्या मेहनतीला आलेलं फळ, त्याचा आनंद या लोकसंगीताच्या माध्यमातून व्यक्त केला. आजही पाऊस सुरू झाला, की गावागावात ट्रॅक्टरवर हे गाणे सुरू असते. शेतातील पाटाने पाणी वाहत असताना, शेत कसे फुलते, मिरची, फुलकोबी, वांग्यांपासून सर्व भाजीपाला शेतकरी कसा पिकवतोय, पाण्याने भाजीपाला कसा टम्म फुलला आहे, याचे वर्णन या गाण्यातून मी केले. मी स्वत: शेतकरी आहे. शेतात कामे केली आहेत. आजही आमचे कुटुंब शेतात राबते. ते लक्षात घेऊन हे गाणे मनापासून केले होते. शिंदेशाही, रिॲलिटी शोमध्ये हे गाणे मी आजही गातो आणि त्याला प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.

राया थेंबा थेंबानं

केलं मला गार

नव्वदीच्या दशकात मी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याकडून एक पावसाचे गाणे गाऊन घेतले होते. टी सिरीजच्या माध्यमातून हा अल्बम केला होता. त्याला मी संगीत दिले. हे गाणे एवढे हिट झाले, की लोकगीताचा बाज असलेल्या या गाण्यात पावसाच्या विविध छटा आहेत. आजही असंख्य तमाशाच्या फडांत हे गाणे हमखास वाजवले जाते.

आला काळ गं, आला काळ गं

चिखलामध्ये शोधे माऊली, तान्हा बाळ गं

पावसाच्या आनंदाबरोबरच पावसाच्या रौद्ररूपाने झालेल्या नुकसानीचे गाणेही मी केले. जेव्हा देशात त्सुनामीची लाट आली, पावसाचे रौद्र रूप बघायला मिळाले, त्या वेळी ते दु:ख व्यक्त करण्यासाठी मी एक अल्बम तयार केला होता. आला काळ गं, हे गाणे जेव्हा मी माझ्या शोमध्ये गायचो, तेव्हा असंख्य महिलांच्या डोळ्यांत आसवे यायची.

पुराचं वारं, कसं पसरलंय

घर पडलंय, उघड्यावर

हाक मारते, कोल्हापूर

पावसाच्या खूप छटा आहेत. अनेकदा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त बरसतो. पूर परिस्थिती निर्माण करतो. गेली दोनतीन वर्षं सलग कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी मी एका गाण्याची निर्मिती केली होती. हे गाणे उत्कर्षकडून लिहून आणि गाऊन घेतले. कोल्हापूरने मला माझ्या करिअरमध्ये खूप साथ दिली, प्रेम दिले, त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत हे गाणे आम्ही तयार केले. यातून आर्थिक हेतू काही नव्हता.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()