मुंबईत सुरू असलेल्या ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हल मध्ये लेखक-दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या रुपाने मराठमोळा ‘आव्वाज’ घुमला. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘केनेडी’ हा चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे कौतुक तर झालेच, मात्र अक्षयने या चित्रपटासाठी केलेल्या ध्वनी संयोजनासाठी त्याची खास प्रशंसा झाली.
मुंबई पोलिसांवर बेतलेल्या एका काल्पनिक कथेवर आधारित ‘केनेडी’ हा चित्रपट अनुराग कश्यप यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. मामि महोत्सवात ‘केनेडी’ चित्रपटाचा प्रीमिअर झाला, त्यावेळी उपस्थितांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
ही संधी कशी मिळाली, याबाबत अक्षय सांगतो, ‘‘मी मूळचा लेखक-दिग्दर्शक आहे. यापूर्वी ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’ आणि ‘स्थलपुराण’ हे तीन चित्रपट मी केले आहेत. पण ध्वनी संयोजन ही मला आवडणारी गोष्ट आहे. ‘स्थलपुराण’ या चित्रपटाचे ध्वनी संयोजन मीच केले होते आणि त्या चित्रपटाचे जगभरातील अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झाले होते. हे कौतुक ऐकून एकदा अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी हा चित्रपट दाखवल्यावर त्यांना अतिशय आवडला. दोन-तीन महिन्यांतच त्यांचा मला फोन आला आणि ‘केनेडी’ चित्रपटासाठी ध्वनी संयोजन करशील का, अशी विचारणा त्यांनी केली. मी नाही म्हणणे शक्यच नव्हते. ज्यांना आदर्श मानून या क्षेत्रातील कामाला सुरुवात केली, त्यांच्यासह काम करण्याची संधी मिळणे अविस्मरणीय होते.’’
‘‘ध्वनी संयोजनाचे काम चित्रीकरणानंतर सुरू होते. पण अनुराग कश्यप यांच्या चित्रपटासाठी काम करताना त्यांची काम करण्याची पद्धत पाहायला मिळणार होती. त्यामुळे चित्रीकरण सुरु असताना मी दररोज सेटवर जात होतो. या पूर्ण प्रक्रियेत जणूकाही मी एखादा अभ्यासक्रमच पूर्ण केल्याची भावना आहे’’, असे अक्षयने सांगितले.
----
अनुराग कश्यप यांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. पण त्यांचा ‘परफेक्शन’चा आग्रह असे. एखादा ध्वनी अगदी मनासारखा मिळेपर्यंत त्यावर काम करावे लागत असे. मात्र यातून बरेच काही शिकायला मिळाले. ः अक्षय इंडीकर, लेखक-दिग्दर्शक
----
ध्वनी संयोजन का महत्त्वाचे?
‘‘चित्रपटाचा पडदा दोन मितींचा असतो. पण ध्वनीला असंख्य मिती आणि आयाम असतात. त्यामुळे आवाज तुमच्यावर विविधांगाने गारूड करू शकतो. कथेला आणि कथेतून निर्माण होणाऱ्या वातावरणाला तो अधिक गडद करतो. पार्श्वसंगीत आणि ध्वनी यात फरक असतो. प्रेक्षकांनी कथेतून बाहेर पडू नये, मात्र त्या कथेला उठाव यावा, अशा प्रकारे ध्वनी संयोजन करणे अपेक्षित असते’’, अशा शब्दांत ध्वनी संयोजनाचे महत्त्व अक्षय इंडीकर याने उलगडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.