-डॉ. श्रीपाल सबनीस
पु. ल. देशपांडे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे मराठी संस्कृतीचे भूषण ठरते. त्यांच्या समकालीन आणि नंतरही एक व्यक्ति अनेक भूमिका निष्ठेने यशस्वी करण्याचा चमत्कार सिध्द झालेला नाही. विनोदी लेखक म्हणून गाजलेले पुलं शिक्षक होते. कवी, कथा, कादंबरीकार आणि श्रेष्ठ नाटककार म्हणून त्यांची नोंद मराठी साहित्याच्या इतिहासात अटळ आहे. खोगीर भरती, व्यक्ती आणि वल्ली तसेच बटाट्याची चाळ ही त्यांची पुस्तके प्रसिध्द आहेतच. पण गणगोत, गाठोडं, अपूर्वाईसह आपुलकी सारखी अनेक पुस्तके पुलंच्या प्रतिभा सामर्थ्याची साक्ष देतात.
पुलं देशपांडे यांचे संगीतप्रेम आणि संगीतमय जीवन त्यांच्या कलात्मक सौंदर्यासक्त मनाचे दर्शन घडवते. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. कुबेर चित्रपटाला पुलंनी दिलेले संगीत प्रसिध्द आहे. त्यात त्यांनी गाणेही गायले आहे. पुलंच्या देवबाप्पा या चित्रपटातील नाच रे मोरा नाच हे गाणे मागील दोन – तीन पिढ्या आवडीनं ऐकत आहेत. वंदे मातरम, दूधभात सारखे काही चित्रपट पुलंच्या या क्षेत्रातील योगदानाचे दर्शन घडवतात. गुळाचा गणपती हा चित्रपट तर कथा, पटकथा ते दिग्दर्शना पर्यत सबकुछ पुलं म्हणूनच अनुभवता येतो.
पुलंच्या साहित्य व संगीतसह नाट्यविषयक श्रेष्ठ कर्तृत्वाची नोंद घेऊन साहित्य अकादमीनं आणि संगीत नाट्य अकादमीनं त्यांना पुरस्कार दिला होता. एकाच प्रतिभानवंताला दोन्ही अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित होण्याचे दुर्मिळ भाग्य पुलंनाच लाभले.
अनेक कलाप्रकारांमध्ये गती असणारे पुलंचे रसिक मन सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द होते. त्यांचे सामाजिक भानही जागृत होते. आणि त्यांची बहुसांस्कृतितता अभिजात होती. पेटी वाजवणारे पुलं, नकला करणारे व एकपात्री वगनाट्य लिहून नट म्हणून काम करणारे पुलं, वसंतराव देशपांडे यांच्या संगीत मैफलीत रमणारे पुलं, आणि गदिमा, सुधीर फडके यांच्या गीत रामायणांना दाद देणारे पुलं. अशी कितीतरी रुपं पुलं देशपांडे यांच्या सुसंस्कृत भूमिकेचे दर्शन घडवतात.
पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. त्यांचे विनोदी साहित्य आणि विनोदी किस्से पुढच्या अनेक पिढ्यांना हसवून ठेवणारे आहेत. पुलंची भाषणं समकालीन श्रोत्यांनी डोक्यावर घेतली. पण आजही त्यांची जादू तशीच आहे. नभोवाणी आणि दुरदर्शनची पुलंची कामगिरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग बनलीय. विशेष म्हणजे दुरदर्शनच्या पहिल्या प्रसारणातील पं.नेहरुंची पुलंनी घेतलेली मुलाखत प्रचंड गाजली.
पुलंनी प्रवासवर्णनं लिहिली. व्यक्तिचित्रणं लिहिली. कादंब-यांचे अनुवाद केले. चरित्रलेखनही केले. ८१ वर्षांच्या आयुष्यात एक व्यक्ति किती भव्य दिव्य साहित्यसेवा व संस्कृतीसेवा करु शकतो याचा आदर्श म्हणजे पुलं देशपांडे होत.
पुलंनी मराठीवरचे प्रभुत्व तर सिध्द केलेच. पण बंगाली व कानडीचा त्यांचा अनुबंध अर्थपूर्ण असल्यानं त्यांना इतर प्रांतांच्या रसिकांचेही प्रेम संपादन करता आले. त्यांची ही बहुभाषिक प्रेमाची भूमिका आणि बहुसांस्कृतिक संचिताची पुण्याई कुणालाही हेवा वाटावा अशीच आहे. शिवाय संगीत, साहित्य, नाट्य, गायन – वादनासह विनोद, चित्रपट, नकलाकार, एकपात्री अशा अनेक कलाप्रकारांची पुलंची सांस्कृतिक पुण्याई लाख मोलाची होती. म्हणून मराठी माती संस्कृती व मराठी माणसाच्या काळजात आज आणि उद्याही पुलं देशपांडे यांचे स्थान कायम कोरले गेलेयं. म्हणूनच पुलं देशपांडे यांचे कर्तृत्व सुगंधी व संस्मरणीय असण्याचे सत्य भूषणावह आहे. पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.....
-या लेखाचे लेखक ८९ व्या अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.