बहुरुपी, बहुरंगी आणि बहुढंगी विनोदवीर!

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांत आपल्या चतुरस्र अभिनयाने ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे अशोक सराफ!
Ashok Saraf
Ashok SarafSakal
Updated on
Summary

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांत आपल्या चतुरस्र अभिनयाने ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे अशोक सराफ!

- अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते आणि मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील महानायक अशोक सराफ आज (४ जून) वयाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. अवघे पाऊणशे वयोमान असलेले ‘तरुण’ अशोकमामा आजही सळसळत्या उत्साहाने सर्वत्र वावरतात. त्यांच्यातील कमालीची ऊर्जा, दिलखुलासपणा, मिश्कील शैली, प्रेमळ-मनमोकळा स्वभाव, ध्यास, जिद्द, मेहनत, नम्रता, आपुलकी अन् साधेपणा त्यांच्या जीवनप्रवासात अधोरेखित झाला आहे. बोलतानाही तो दरवळतो. ‘सकाळ’च्या टीम ‘अवतरण`सोबत झालेल्या गप्पांदरम्यान ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीचा पट उलगडून दाखवताना त्यांनी रंजक किस्से आणि विनोदाची सांगड घालत अनेक आठवणींना उजाळा दिला, तेव्हा एक कसलेला अभिनेता अन् बहुरूपी, बहुरंगी आणि बहुढंगी विनोदवीर मनात घर करून गेला...

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांत आपल्या चतुरस्र अभिनयाने ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे अशोक सराफ! ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते डिजिटल सिनेमा असा मोठा टप्पा गाठणाऱ्या अशोकमामांनी मराठी चित्रपटांतील विनोदाला वेगळी ओळख दिली. विनोदाचा वेग आणि लय त्यांनी बदलली. स्लॅपस्टिक विनोदाचा नवा बाज त्यांनी आणला. जवळजवळ तीनशे सिनेमांत काम केलेले अशोकमामा त्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्यातील तळमळ असलेला अभिनेता सतत डोकावत राहतो. ते म्हणतात, मी खरं तर चरित्र अभिनेता. मला कुठलीही भूमिका करता येते, पण इमेजच अशी झाली की मला सतत कॉमेडीच राहावं लागतं. प्रेक्षकांच्या दृष्टीने मी तसाच आहे म्हणून मला बदलता येत नाही. आपल्याकडे इमेज नावाची गोष्ट आहे. प्रेक्षकांनी तुम्हाला एकदा त्यात पसंत केलं की ते सहसा दुसऱ्या भूमिकेत बघायला तयार होत नाहीत. इमेज ब्रेक केलेले फार कमी नट आहेत; पण आता मी ठरवून विनोदी भूमिका करत नाही. कारण माझ्या टाईपची आणि वयाची कॉमेडी लिहिणारेही कोणी सापडतच नाही. सध्याचे मराठी चित्रपट अजूनही फक्त हिरो-हिरोईनमध्येच अडकले आहेत. त्यापुढे हिरो-हिरोईनची आई आणि बाप याच्यापलीकडे जातच नाही. एखादी व्यक्तिरेखा घडवणारी भूमिका कोणी लिहितच नाही. मी नुकताच व्यक्तिरेखेला धरून केलेला चित्रपट ‘प्रवास’ आणि ‘जीवनसंध्या’ मात्र त्याला अपवाद.

टाईपकास्ट झाल्याची खंत नाही

मला टाईपकास्ट करण्यात आल्याची अजिबात खंत वाटत नाही. वजीर, भस्म, प्रवास... इत्यादी वेगळ्या धाटणीचे चित्रपट मी केले, पण माझ्यातलं टॅलेंट निर्मात्यांना जोखता आलं नाही, असं कुठेतरी वाटतं. त्यांना अशोकमामांमध्ये विनोदी नटच दिसतो, त्याला काय करणार? मामांकडून कॉमेडीच करून घेऊ, असं ते ठरवून टाकतात. पण मी नेहमी सांगत आलोय, रोल छोटा असला तरी महत्त्वाचा हवा. ‘सिंघम’मधला हवालदार याचं उत्तम उदाहरण. तो रोल छोटा, पण फार महत्त्वाचा होता. त्यात अख्ख्या चित्रपटाचा गाभा होता. रोहित शेट्टीने सांगितलं तेव्हाच मी व्यक्तिरेखेची ताकद ओळखली होती. सर्व पोलिसांचं दु:ख तो व्यक्त करतो आणि ते प्रेक्षकांना अपील होतं. मी बॉलीवूडमध्ये सातत्याने असेच रोल करण्याचा प्रयत्न केला. कारण मला माहीत होतं, की व्यक्तिरेखा छोट्या असल्या तरी त्या प्रेक्षकांना आवडणार... पोलिसाचा रोल माझ्या कायम जवळचा राहिला आहे. आठवणीतला पोलिस म्हणाल, तर ‘पांडू हवालदार’... ज्याच्यामुळे माझ्या अभिनय कारकिर्दीचा डोलारा उभा आहे, असं म्हणता येईल. खलनायकही खूप रंगवले. तेही रसिकांना आवडले. रसिकांना माझं विनोदी काम भावलं नि मला तेच करावं लागलं. त्यांची आवड प्रमाण मानून मीही काम केलं. निर्मातेही माझ्यातील विनोदवीराबरोबर आर्थिकदृष्ट्या जास्त कम्फर्टेबल होते. अशोकमामांनी कॉमेडी केली की आपण प्लसमध्ये असतो याची त्यांना पक्की जाणीव होती. मग ते मला बाकीच्या व्यक्तिरेखा का देतील, असं साधं गणित अशोकमामांनी बोलण्याच्या ओघात मांडलं.

दादा कोडकेंचं मोठेपण...

दादा कोंडकेंसोबत अशोकमामांची सुरुवात जोरात झाली. मात्र, त्यानंतर दोघांची जोडी फारशी दिसली नाही. त्याबद्दल सांगताना अशोकमामांमधला मिश्किलपणा पुन्हा जाणवला. खरं तर असा प्रश्न काही वर्षांपूर्वी तुम्ही त्यांनाच का नाही विचारलात, असा उलट सवाल करत त्यांनी दादांचं मोठेपण सिद्ध केलं. ते म्हणाले, की दादांनी खरंच नंतर मला नाही घेतलं. एखाद वेळेस माझ्यासाठी त्यांच्याकडे रोल नसेल किंवा माझ्याकरिता एखादी चांगली व्यक्तिरेखा त्यांच्याकडून लिहिली गेली नसेल. मला तरी काही वेगळं कारण त्यात वाटत नाही. दादा कोंडके यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण निघाली तेव्हा ओघाने प्रश्न आला, की तुम्ही दोघांनी मराठी विनोदाचा बाजच बदलला... त्याबाबत मामा म्हणाले, की खरं आहे ते. दादांची विनोदी शैली लोकनाट्याकडे झुकणारी होती. मी त्याला शहरी बाज दिला. त्या आधी राजा गोसावी, शरद तळवलकर इत्यादींचा विनोद संवादावर अधिक भर देणारा आणि प्रासंगिक होता. त्याचीही एक वेगळीच मजा होती.

‘व्याख्या विख्खी वुख्खू’ कुठून आलं?

‘व्याख्या विख्खी वुख्खू’ शब्द कानावर पडताच मामांच्या अभिनयाच्या कमाल दर्जाची झलक मिळते. त्याबाबत मामा सांगतात, एका सर्वांगसुंदर लकबीचा तो भाग आहे. बोलण्यातील अशी लकब अचानक आली पाहिजे. ती ठरवून नाही आणता येत. मी बापाचं सोंग घेऊन येणाऱ्या मित्राचा रोल करतोय, मग त्याचा आब त्यात यायला हवा म्हणून पाईप घेतला. पाईप ओढणं साधं काम नाही. मी ओढलेला धूर माझ्या घशात बसला. त्यातच मी पहिलं वाक्य घेतलं. ‘माळीबुवा, धनाजी वाकडे (शरद तळवलकर) इथेच राहतात का...’ तेव्हा माळीबुवा बोलताच मला घशात खाकरलं नि त्यातून ‘व्याख्या विख्खी वुख्खू’चा जन्म झाला. काही सेकंदातच आलेल्या शब्दांचं मी मॅनेरिझम बनवलं. बोलताना खोकत राहिलो आणि ते तीन शब्द अजरामर झाले... मामांनी साभिनय करून सारा प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा केला. आजही मी करत असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटकात निर्मिती सावंत यांच्या संवादात ‘व्याख्या विख्खी वुख्खू’ शब्द येतात तेव्हा अवघं नाट्यगृह टाळ्यांच्या गजरात त्याला दाद देतं...

‘मिम्स’चं नवल वाटतं

५० वर्षांची कारकीर्द आणि आजची तरुण पिढी जी तेव्हा जन्मालाही आली नव्हती, ती तुमच्या सिनेमांवर आज मिम्स करतेय. धनंजय माने इथेच राहतात का? असा प्रश्न सोशल मीडियावर कमालीचा ट्रेंड करतो तेव्हा कसं वाटतं? असा सवाल आला आणि मामाही खूश झाले. ते म्हणाले, ‘अशीही बनवा बनवी’ आज ३४ वर्षांनंतरही प्रेक्षकांवर गारूड करून आहे. अजूनही लोकप्रिय आहे. मला माणसं भेटतात तेव्हा ‘अशीही बनवा बनवी’ची आठवण करून देतात. कारण तो सर्व स्तरांवरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमापासून अनेक स्थित्यंतरं मी पाहिलीत. त्यामुळे अशा काही ‘मिम्स’चंही नवल वाटतं.

काही भूमिका ना आम्ही विसरू शकत ना प्रेक्षक...

‘निशाणी डावा अंगठा’सारख्या सिनेमाबद्दल मामा भरभरून बोलले. रमेश इंगळे उत्रादकर यांच्या कादंबरीचं त्यांनी कौतुक केलं. त्यांच्या लेखनकलेची तारीफ केली. ते म्हणाले, सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा कादंबरी वाचून भारावून गेलो. विदर्भातली सर्व परिस्थिती, भाषा अन् लहेजा त्यांनी मोठ्या ताकदीने मांडला आहे. ते व्यक्तिरेखेत उतरवणं आव्हानात्मक होतं. वैदर्भीय टोन तसा कठीण आहे, पण व्यक्तिरेखेतील भाषा मी बरोबर पकडली. वैदर्भीय बोलण्याची निश्चित माहिती नव्हती. विदर्भातील सहकलाकार भारत गणेशपुरे होते. ते विदर्भातील भाषा बोलायचे. म्हणून मी माझी थोडी साधी भाषा ठेवली. अर्थात दिग्दर्शकाची तशी सूचना होती. खरंच सांगतो, काही व्यक्तिरेखा अविस्मरणीय असतात. ना आम्ही त्या विसरू शकत ना प्रेक्षक. त्यांपैकीच ती एक होती. अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत. वजीर, एक डाव भुताचा, भस्म, गुपचूप, धूमधडाका, अशीही बनवा बनवी... ‘वजीर’मधला कावेबाज पाताळयंत्री मुख्यमंत्री साकारणं आव्हान होतं. बोलण्यापेक्षा त्याचे हावभाव आणि नजर भेदक आहे. त्याच्या हसण्यातही जरब असलेली अशी ती व्यक्तिरेखा होती.

चित्रपटसृष्टीरूपी कुटुंब जगवण्याची तगमग...

मामांचे काही चित्रपट अयशस्वी ठरले. त्यांनाही ते माहीत होतं की ते करताना ते चालणार नाहीत, तरीही त्यांनी ते केले. अर्थात त्यात आड आली ती त्यांची सामाजिक बांधिलकी आणि चित्रपटसृष्टीरूपी कुटुंब जगवण्याची तगमग. त्याबद्दल ते म्हणतात, खरं आहे ते. आम्ही काम करतो तेव्हा आमच्यावर ३० ते ४० जणांचं कुटुंब अवलंबून असतं. मी नाही म्हणालो असतो तर निर्मार्त्यांनी चित्रपट केला नसता आणि त्यावर अवलंबून असलेल्यांचं नुकसान झालं असतं. म्हणून मी पैशाचा विचार न करता काम केलं. पूर्वीचे पटकथालेखक फार चांगले होते. मग ते वसंत सबनीस असोत की द. मा. मिरासदार. त्यांच्या पटकथांना नको म्हणणं अशक्यच होतं. आता मुद्दाम ‘नको’ म्हणावी अशी स्थिती आहे. आताच्या काही पटकथा सात-आठ पानांतच कळतात. त्या नकोशा वाटतात. सिनेमा म्हणजे काय, हेच त्यांना कळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पूर्वी कथेवर फार मेहनत व्हायची. अजूनही मराठी चित्रपट रसिक चोखंदळ आहेत. ते सिनेमाची गोष्ट काय आहे, ते आधी बघतात. त्यांना लंडन वा पॅरिस नको असतं. असं असतं तर आलिशान काहीतरी दाखवणारे सिनेमे कधीच पडले नसते. शेवटी सिनेमाची गोष्ट बोलते हे खरं, असं ते म्हणाले.

व्यक्तिरेखा महत्त्वाची

नाटकाचं आणि सिनेमाचं तंत्र काय असतं, हेही मामांनी साभिनय समजावून सांगितलं. कलाकृती कोणतीही असो, तुमची व्यक्तिरेखा महत्त्वाची! तुमचा खर्च किती, तुमचा निर्माता किती मोठा यात कोणाला रस नाही. मी नेहमी पटकथेला महत्त्व दिलंय. मी ती आधी वाचतो आणि मगच व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. ती साकारताना कसं आणि कुठे बोलायचं, आवाजाची पातळी काय ठेवायची, चेहऱ्यावर कोणते भाव आणायचे हे त्यानंतर ठरतं, असं सांगताना मामांनी ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटकाच्या पटकथेची आणि पर्यायाने चिन्मय मांडलेकर यांच्या लिखाणाची तारीफ केली.

आत्मचरित्रात फक्त माझा जीवनप्रवास

आत्मचरित्राला उशीर का झाला? ७५ वर्षांपर्यंत का थांबलात? हल्ली तर काही जण तिशीतच आपल्याबद्दल भरभरून लिहितात, असा प्रश्न विचारला असता मामांमधील बहुरंगी विनोदवीर पुन्हा जागा झाला. आयुष्यात काही तरी घडू तर दे. त्याशिवाय आत्मचरित्र कसं लिहिणार, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. ५० वर्षांत इतके कलाकार, माणसं आणि प्रेक्षक भेटले की काय सांगू... पुस्तकात त्यांना सर्वांना सामावून घेणं आव्हान होतं. मी आधीच सांगतो, माझं आत्मचरित्र माझ्या सिनेमासारखं आहे. मला दुढ्ढाचार्यासारखं कोणाला उपदेश करायचा नाही की कोणाला काही शिकवायचं नाही. माझा प्रवास मी मांडलाय, बस्स... चित्रपटसृष्टीचा अनुभव असल्याशिवाय, तुम्ही केलेलं काम प्रेक्षकांना आवडल्याशिवाय तुम्ही त्यावर भाष्य कसं करू शकणार? माझ्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टींना आत्मचरित्रात उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यात माझं कुटुंब आहे... माझं घर आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अभिनयाचे बारकावे

अशोकमामा बोलत होते, पण सोबत अभिनयाचे बारकावेही सांगत होते. माझं पहिलं प्रेम नाटक असल्याचं ते म्हणाले. रंगमंचावरून माझी सुरुवात झाली. पहिलं नाटक वि. वा. शिरवाडकर यांचं, ‘ययाति आणि देवयानी.’ कला एकच, पण नाटक आणि चित्रपटाचं सादरीकरण वेगळं. नाटकात जिवंतपणा आहे. ३२ फुटांच्या रंगमंचावरून तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं. शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत तुमचा आवाज पोहचवायचा असतो. तुमचे हावभाव दिसले पाहिजेत. तेवढं भव्य तुमचं सादरीकरण हवं. आवाज दमदार हवा. सिनेमात तसं नसतं. कॅमेरा तुमचे सर्वच भाव टिपत असतो. तेव्हा सिमेमाच्या अंगाने तसा अभिनय करायचा असतो. मात्र, हल्ली तो तसा केला जात नाही, किंबहुना तो तसा करायचा असतो हेच कोणाला माहीत नाही, असा विरोधाभासही त्यांनी मांडला.

पत्नीची मालिका पाहावीच लागते!

प्रेक्षकांची अभिरुची पिढीगणिक बदलते. पूर्वीची तरुण पिढी आता म्हातारी झाली. पण त्यांना अजूनही तेव्हाच्याच कलाकृती आवडतात. आजच्या तरुणांची आवड वेगळी आहे. दोन्हींचा समतोल आम्हाला साधावा लागतो. आताचा जमाना ओटीटीचा आहे. खरंच त्यावरील काही मालिका चांगल्याच आहेत. त्या पसंत पडणारच. मुळात ५२ मालिकांसाठी लागणारं पाणी त्यात घालावं लागत नाही. वेगाने चित्रीकरण करून ८ ते १० भागांत त्यांची मालिका संपते. फाफटपसारा नसल्याने व्यक्तिरेखा कमालीच्या बांधीव असतात, असं सांगत मामांनी अप्रत्यक्षपणे नातेसंबंधांची अनावश्यक गुंतागुंत मांडून रतीब घालणाऱ्या मालिकांना फटकारलं. पत्नी निवेदिता सराफ यांची ‘भाग्य दिले तू मला’ मालिका मी आवर्जून पाहतो. कारण मला ती बघावीच लागते, असंही त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं.

प्रेक्षक कोण हे महत्त्वाचं

सध्याच्या बोल्डनेस आणि लाऊड चित्रीकरणावरही मामांनी बोट ठेवलं. आपल्या काळातील मार्मिक विनोदाचं उदाहरण त्यांनी दिलं. ते म्हणाले, तेव्हाचे पंचेस आणि तेव्हाची शैली वेगळी होती. आता थोडं लाऊड होतंय, पण त्याचाही एक प्रेक्षक आहे आणि ते नाकारता येणार नाही. कोणत्या प्रेक्षकांसाठी करतोय ते महत्त्वाचं. काही गोष्टींना फक्त प्रसिद्धी मिळतेय म्हणून करण्यात अर्थ नाही. ते चिरकाळ टिकत नाही.

कुटुंबाबद्दल थोडंसं...

मुलगा अनिकेत शेफ झाल्याचा अभिमानही मामांनी व्यक्त केला. आम्ही त्याच्यावर कोणतीही मतं लादली नाहीत. त्याचा निर्णय त्याने स्वतःहून घेतला. आज त्याने पेस्ट्रीज बनवण्यात स्पेशलायझेशन केलंय. मास्टर शेफ झाल्याचा आनंद आहे. सध्या तो कॅनडात स्थायिक आहे. त्याने चित्रपट क्षेत्रात गती असूनही वेगळ्या प्रांतात आपली ओळख केली याचा आनंद आहे. आता लग्नाचं बघू. त्याला आम्ही कोणत्याही बंधनात ठेवलेलं नाही. त्याचं काय ते ठरवायला तो मोकळा आहे, असं ते म्हणाले.

इंडस्ट्रीत येण्याला मला विरोध झाला

आताची चित्रपटसृष्टीची स्थिती चांगली आहे. चार पैसे मिळू लागलेत. आमच्या वेळेला इंडस्ट्रीची काही खात्रीच नव्हती. माझे मामा गोपीनाथ सावकार निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार होते. मा. विनायक यांचे ते असिस्टंट होते तेव्हा. तरीही ते इंडस्ट्री सोडून नाटक कंपनीत आले. त्यांचाही मी इंडस्ट्रीत येण्यास विरोध होता. कारण त्यांना माहीत होतं की इथे खायचे वांदे आहेत. इथे तुमच्यात काही कला असेल तरच तुम्ही तग धरू शकता. तुम्हाला चांगलंच दाखवावं लागतं, असं मामा सांगत होते तेव्हा त्यांचा अभिनय पट डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि योगदान नकळतच त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

मान‘धना’च्या गोंडस नावाचं मला अप्रूप नाही

पूर्वीच्या अनेक निर्मात्यांनी मामांचे कामाचे पैसे थकवले किंवा त्यांनीच ते मागितले नाही, असं म्हटलं जातं. त्यानंतर अशोकमामा नावाचा मोठा ब्रॅण्ड झाल्यानंतरही ते पैशांसाठी कधी आग्रही राहिले नाहीत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, आयुष्यात पैशाला मी दुय्यम महत्त्व दिलं. पैसे सगळ्यांनाच हवे असतात, कारण आपलं कुटुंब त्यावर अवलंबून असतं; परंतु पैसे मिळतात म्हणून काही करायला गेलं की काही होत नाही. तुम्ही चांगलं काही केलं की पैसे आपोआप मिळतात. म्हणून मी कमी पैशांतही काम केलं. माझा स्वभावच आहे तो. त्याने मला काही फरक पडला नाही. आताही अनेक जण फित कापायला जातात नि लाखो रुपये कमावतात. मानधनाच्या गोंडस नावाखाली कुठेही बोलावतात, पण मी जात नाही नि गेलो तर पैसे मागत नाही. सुपाऱ्या असं एक नवीन नाव आता पडलंय. इथे दात पडायची वेळ आलीय नि सुपाऱ्या कसल्या खाता, अशी मार्मिक टिपण्णी करत त्यांनी अवाजवी मिरवणाऱ्यांना शालजोडीतले मारले.

लक्ष्याचं आणि माझं नातंच वेगळं

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांतही आपली छाप उमटवली. लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की त्याच्यासारखा हरहुन्नरी नट मी पाहिला नाही. त्याला विनोद नेमकेपणाने कळायचा. तसा तो माझ्याच जातकुळीतला. साहजिकच माझी शैली त्याने पकडली. त्याचंही विनोदाचं टायमिंग उत्तम होतं. प्रत्येक नटाकडे ते असतं. तुम्ही ते वापरता कसं, ते महत्त्वाचं. आमचं टायमिंग चांगलंच जुळायचं. आमचं सीनमधलं गिव्ह अॅण्ड टेक महत्त्वाचं ठरलं. आम्ही ४० ते ५० चित्रपट एकत्र केले. ‘गोंधळात गोंधळ’ म्हणजे पहिली सोशल कॉमेडी. ती सुपरहिट ठरली. मग आला ‘नवरी मिळे नवऱ्याला’. त्यानंतर सोशल कॉमेडीची रांग लागली आणि माझी-लक्ष्याची जोडी हिट झाली. आम्ही एकाही नाटकात काम केलं नाही, याचीही खंत आहे.

नेहमी पाय जमिनीवर ठेवा

दोन मोठ्या स्टारमधील नात्याचाही मामांनी उलगडा केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. नट म्हणून दोघे मोठे झाले. आज दोन चित्रपटांनंतरही कलाकारांमध्ये फूट पडते. त्याबाबत बोलताना मामांनी आपल्या विनोदी शैलीत खिल्ली उडवली, पण एक मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले, असं होणं खरंच चांगलं नाही. जिद्द असावी, पण ती इंडस्ट्रीत टिकून राहण्याची. आजचं माझं काम प्रेक्षकांना आवडलं. उद्याची भूमिकाही पसंत पडलीच पाहिजे, असा अट्टहास करा. एक वेळ यश मिळवणं सोपं आहे, पण टिकवणं कठीण... तेव्हा एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा यश पचवायलाच शिका. माणसं जोडून ठेवणं महत्त्वाचं. मुळात यश विचित्र गोष्ट आहे. ते मिळालं तरी टिकवणं महत्त्वाचं. यश-अपयशातून येणारं नैराश्यही घातक आहे. तुमचा उदो उदो झालेला असतो आणि त्यातून मिळालेल्या ब्रेकमधून ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे नेहमी पाय जमिनीवर ठेवा, असा सल्ला त्यांनी आताच्या उदयोन्मुख कलाकारांना दिला.

निळूभाऊंसारखा सज्जन नट नाही झाला

इम्प्रोव्हायजेशन एक मोठी कला आहे. भूमिका कशी फुलवायची ते अभिनेत्याचं कसब आहे. एकदा एक सीन मी आणि निळूभाऊ फुले करत होतो. तेव्हा संवाद लिहिलेलेच नव्हते. मग आम्हीच काही ओळी ठरवल्या नि त्यावर अभिनय सुरू केला. पण तालमीदरम्यान मी एक वाक्य विसरलो. तेव्हा निळूभाऊंनी मला त्याची आठवण करून दिली आणि ते वाक्य बोलायला सांगितलं. आज कुठला नट असं करेल? आज तुला अॅक्टिंगमध्ये कसा खातो... तुला कसा पाडतो असाच विचार होतो. निळूभाऊंना मात्र सहकलाकाराची पर्वा होती. त्यांच्यासारखा दुसरा सज्जन माणूस मला सापडलाच नाही. आमचंही टायमिंग आणि रॅपो उत्तम होतं. तसा माणूस नाही भेटला पुन्हा, अशा शब्दांत मामांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. सचिन पिळगावकर यांच्याबरोबरही १४ चित्रपट केले. माझ्या भूमिकेचा सचिनने आधीच विचार केलेला असायचा. ‘आयत्या घरात घरोबा’ हे त्याचं उत्तम उदाहरण.

३२ वर्षांतील सर्वात मोठी भेट म्हणजे पत्नी निवेदिता!

अशोकमामांनी आपल्या यशस्वी संसाराचा मंत्रही उलगडून दाखवला. ते म्हणाले, मुळात संसार हाच एक मंत्र आहे. आपल्या मनात अहंकाराची भावना नसेल तर काहीच समस्या नाही. तो दुखावण्याचा संबंधच नाही. जोडीदारांनी एकमेकांचा समजून उमजून आदर केला तर काही अशक्य नाही. विश्वास आणि नात्याला मराठी माणसाच्या मनात फार मोठी किंमत आहे. आईला आई आणि बापाला बाप म्हणणारे आपण आहोत. बायको आयुष्यभर साथ देणारी असते. तुमचा स्वतःवर विश्वास हवा, बस इतकंच. माझी आयुष्यातली सर्वात मोठी भेट म्हणजे माझी बायको, निवेदिता सराफ! ३२ वर्षांपूर्वी देवाने मला जी भेट दिली ती कधीच विसरू शकत नाही. तिच्यामुळेच आज मी उभा आहे. अजूनही मी विनोद करू शकतो. माझ्या फिटनेसचं रहस्यही तीच आहे. मी लग्नाचा विचारच करत नव्हतो तेव्हा निवेदिता माझ्या आयुष्यात आली. तिने विचारताच मी नाही म्हणू शकलो नाही. कारण एवढी चांगली पत्नी मला मिळाली नसती आणि तिने ते सिद्ध करून दाखवलं. तुमचं खरं आयुष्य तुमच्या घरापासून सुरू होत असतं. तुम्ही घरात कसे असता ते बाहेर प्रतीत होत असतं. निवेदिताच्या आणि एकंदरीतच यशस्वी कारकिर्दीच्या बाबतीत ‘भाग्य दिले तू मला’ असंच देवाला म्हणावं लागेल...

अभिनयाच्या बाबतीत रंजना यांच्यासारखी जिद्दी अभिनेत्री पाहिली नाही

चित्रपटातील आवडीच्या अभिनेत्रींबाबतही मामा भरभरून बोलले. आजच्या पिढीतल्या काही अभिनेत्रींच्या अभिनयाची तारीफ त्यांनी आवर्जून केली. अभिनेत्री रंजना आणि मामांची पडद्यावरील जोडीही चांगलीच गाजली. रंजना यांच्याबरोबर काम करताना आलेला अनुभव त्यांनी सांगितला. ते म्हणाले, की रंजना खूपच टॅलेंटेड अभिनेत्री होती. काही तरी करण्याची तिला आस होती. अभिनयाच्या बाबतीत फारच जिद्दी आणि मेहनती होती. एखादी गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय, असा तिचा हट्ट असायचा. त्यातून ती शिकत गेली. तिचा विनोदाचा बाज कधीच नव्हता. तिने सुरुवातीला कधीच विनोदी भूमिका नाही केल्या, पण नंतर असे अफलातून काम केलं की तिचं कौतुक झालं. चरित्र भूमिकांबरोबरच विनोद साकारणारी ती एकमेव उमदा कलाकार म्हणता येईल. अलका कुबल, निशिगंधा वाड इत्यादींसारख्या अनेक अभिनेत्रीही खूप चांगल्या अदाकारा आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

तोंडावर ताबा, हेच फिटनेसचं रहस्य!

मी व्यायाम करत नाही. मी माझ्या तोंडावर ताबा ठेवलाय आणि तोही, घरी मुलाच्या आणि बायकोच्या रूपात दोन दोन शेफ असतानाही... म्हणूनच मी फिट आहे. कारण मला घरात केलं जाणारं कधी खायलाच देत नाहीत. मी प्रचंड फुडी आहे, तरीही मी ते ऐकतो. ऐकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, असे मामांनी आवर्जून सांगितलं.

थोडं खाण्याविषयी..

खाण्याबाबत बोलताना मामा म्हणाले, मला सगळ्या प्रकारचं जेवण आवडतं. मी काहीही खाऊ शकतो. माझ्या जेवणाबद्दलच्या कोणत्याही तक्रारी नाहीत. कारण वडिलांचे संस्कार. समोर पडेल ते खायचं, असं आम्हाला शिकवलं गेलं. ते मी आजही पाळतो. ‘अशोकमामांना चालतं’ असं म्हणत माझ्या स्वभावाचा मनोरंजनसृष्टीत अनेकांनी गैरफायदाही घेतला, पण त्याबाबत कधीच तक्रार नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.