‘सकाळ’मधील लतामय वातावरण!

लता मंगेशकर ‘सकाळ’ला भेट द्यायला येणार, अशी बातमी आम्हाला समजली आणि आम्ही आनंदून गेलो. त्या काळामध्ये लतादीदी पुण्यामध्ये वारंवार येत होत्या.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal
Updated on
Summary

लता मंगेशकर ‘सकाळ’ला भेट द्यायला येणार, अशी बातमी आम्हाला समजली आणि आम्ही आनंदून गेलो. त्या काळामध्ये लतादीदी पुण्यामध्ये वारंवार येत होत्या.

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाच्या (Death) बातमीने माझ्या मनात आठवणींची गर्दी झाली. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये (Sakal) (१९८६) काम करत होतो. रविवार सकाळ पुरवणी कामाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळी ‘सकाळ’मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून अनंत पाटणकर हे बातमीदार काम करीत होते.

लता मंगेशकर ‘सकाळ’ला भेट द्यायला येणार, अशी बातमी आम्हाला समजली आणि आम्ही आनंदून गेलो. त्या काळामध्ये लतादीदी पुण्यामध्ये वारंवार येत होत्या. त्याचे कारण त्यांचे विख्यात पिताजी पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक धर्मादाय रुग्णालय सुरु करण्याचे त्यांच्या मनात होते. त्यासाठी त्या वारंवार पुण्यात येत असत. आणखी एक कारण होते, ते म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांची दरवर्षी २४ एप्रिलला पुण्यतिथी असे,त्याचा कार्यक्रमही असायचा.

‘सकाळ’ला लतादीदी कधी भेट देणार याची चर्चा सुरू झाली, त्या दरम्यान आणखी एक गोष्ट ‘सकाळ’च्या संपादकीय विभागात चर्चिली गेली आणि ती म्हणजे लता मंगेशकर यांच्यावर एक पुरवणी करायची. त्या पुरवणीची तयारी सुरू झाली. सकाळचे तत्कालीन संपादक एस. के. कुलकर्णी, संपादकीय विभागातील ज्येष्ठ मंडळी अनिल टाकळकर, किशोर कुलकर्णी, सदा डुंबरे या सर्वांसह होणाऱ्या बैठकीत आम्ही सहभागी झालो. पाटणकर आणि मी काही विषय काढले आणि त्याची तयारी सुरू केली. मुख्य म्हणजे लता मंगेशकर यांचा ज्या गायकांवर प्रभाव आहे, त्यांच्याही मुलाखती घेण्याचे ठरले. माझ्यावर अनुप जलोटा यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी आली. जलोटा यांना आम्ही फोन केला, ते अतिशय आनंदून गेले आणि त्यांनी मुलाखतीसाठी मी ‘सकाळ’मध्ये येतो असे सांगितले.ते आल्यावर मी त्यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत या पुरवणीत नंतर प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे या वेळेला संपादकीय, प्रोसेस आणि पेजिनेशन विभागातील वातावरण हे पूर्णपणे लता मंगेशकरमय झाले होते. लता मंगेशकरांच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी तर सगळेच वातावरण लतामय होऊन गेले होते.माझ्या आठवणीप्रमाणे लतादीदींबरोबर त्यावेळी उषा मंगेशकर आणि बहुदा हृदयनाथ मंगेशकर हे आले होते. माझ्यावर आणि पाटणकरवर जबाबदारी होती, लतादीदींना प्रोसेस विभाग आणि पेजिनेशन विभाग दाखवण्याची. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर चालत होतो, बोलत होतो. मी अक्षरशः रोमांचित झालो होतो!

Lata Mangeshkar
लता दीदींचं पहिलं गाणं प्रदर्शितच होऊ शकलं नाही...

त्यावेळी एका पुरवणीचे लागलेले पान कंपोज होऊन तयार झालेले होते त्या पानाची कॉपी त्यांना काढून दाखवली आणि शिवाय हे पान कशा पद्धतीने लावले जाते, त्याही गोष्टी त्यांना आम्ही सांगत होतो. अतिशय कुतूहल आणि जिज्ञासेने लतादीदी आणि उषा मंगेशकर ऐकत होत्या.

यानंतर ‘सकाळ’च्या वतीने त्यांचा सत्कार सकाळ कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये संचालक प्रतापराव पवार आणि लीलाताई परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळीही लतादीदी किती छान आणि गोड बोलत होत्या, हे आम्ही सकाळमधील कर्मचारी अनुभवत होतो, आणि ऐकत होतो. ‘‘आता लवकरच मी कबीराचे दोहे म्हणणार आहे,’’ असे लतादीदी आपल्या भाषणात म्हणाल्या. ‘सकाळ’मधील त्यांच्या सत्काराचा फोटो दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या पानावर ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला आणि आतील पानांवर ‘सकाळ’च्या विविध विभागांच्या पाहणीचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. लता मंगेशकरांची पुरवणी १९८६ मधील त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ’ने प्रकाशित केली. खुद्द लतादीदींनी आणि हृदयनाथ यांनी त्याचे कौतुक केले होते.

‘सकाळ’च्या वृत्तपत्रीय इतिहासातले असे क्षण हे आम्हा सर्वांना रोमांचित करणारे ठरले! लतादीदींच्या जवळपास दोन-अडीच तासांच्या भेटीत आम्ही जणू एका स्वर्गीय स्वरलतेच्या सहवासात वावरत होतो हीच भावना खूप आनंद देत होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()