बहिणींचं नातं हे खूप खास असतं. कधी त्या एकमेकींच्या बहिणी असतात, कधी एकमेकींची आई होऊन एकमेकींना सांभाळतात, तर कधी मैत्रिणी होऊन प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात.
- अश्विनी बागल, मोनालिसा बागल
बहिणींचं नातं हे खूप खास असतं. कधी त्या एकमेकींच्या बहिणी असतात, कधी एकमेकींची आई होऊन एकमेकींना सांभाळतात, तर कधी मैत्रिणी होऊन प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात. मराठी मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या अशाच दोन बहिणी म्हणजे अश्विनी व मोनालिसा बागल. त्या नात्याने एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत, पण मनाने एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत.
मोनालिसा म्हणते, ‘अश्विनीताई माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. ती अतिशय समजूतदार, प्रेमळ आहे, पटकन कुणावरही विश्वास ठेवते. ती कधीच कुणासाठी काही करायला मागंपुढं पाहात नाही. एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, हे मजल्यावर ती दुसरा कोणताही विचार न करता आधी त्या मदतीच्या हाकेला धावून जाते. तिच्यात कमालीचा संयम आहे. कशावरही ती पटकन रिअॅक्ट होत नाही. या दोन्ही गोष्टी मी तिच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतेय. तिनं मला एखादी गोष्ट न करण्याचा सल्ला दिल्यास ती गोष्ट मी करत नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात तिनं घेतलेली मेहनत मी जवळून पाहिली आहे. तिला नेहमी नवीन काहीतरी शिकायला आवडतं. अभिनेत्री म्हणून काम करताना ती भूमिका छोटी आहे की मोठी, याचा कधीच विचार करत नाही. ती प्रत्येक रोल तितक्याच मनापासून आणि प्रामाणिकपणे करते. सहकलाकारांचं निरीक्षण करत ती अनेक गोष्टी आत्मसात करत असते. अनुभवानं मोठ्या असलेल्या सहकलाकारांकडून ती तिच्या कामात आणखीन काय सुधारणा करायला हवी, याचं ती मार्गदर्शन घेते. मात्र, इतक्यावरच न थांबता आपण त्या गोष्टीत कसे पारंगत होऊ शकतो, यासाठी ती प्रयत्न करते.’
अश्विनी म्हणाली, ‘मोनाचं आणि माझं नातं लहानपणीपासूनच खूप स्पेशल आहे. लहानपणी ती थोडी हट्टी होती. माझ्याकडं जे असेल तेच तिला हवं असायचं. पण दुसरीकडं आई-बाबांनी कधी काही नवीन गोष्ट आणल्यास ती ते माझ्यासाठी राखून ठेवायची आणि आम्ही दोघी मिळून त्या खाऊचा किंवा वस्तूचा आनंद घ्यायचो. आम्ही लहान असताना आमचे वडील वारले, त्यानंतर मोना फार समजूतदार झाली. काही वर्षांपूर्वी आमच्या आईचंही निधन झालं आणि त्यानंतर मोना घरचीही जबाबदारी उचलू लागली. मला कधीही तिला काही सांगावं लागलं नाही. आमच्या आयुष्यात घडलेली छोट्यातली छोटी गोष्टही एकमेकींबरोबर शेअर करतो. मोना आजही माझ्यासाठी शॉपिंग करते, माझ्या कपड्यांचं डिझायनिंग ती करते आणि तेच कपडे मी घालते. कोणत्याही दोन बहिणींप्रमाणं आम्हीही एकमेकींचे कपडे, दागिने शेअर करतो पण त्यावरून आमच्यात कधीच भांडणं होत नाहीत. ती उत्तम स्वयंपाक करते. ती आतापर्यंत कधीही माझ्या शब्दाबाहेर गेलेली नाही. तिला मित्र परिवारही फार नसल्यानं तिला प्रत्येक गोष्टीत मी लागते. कधी काही कारणानं मी खचल्यास मोना माझी समजूत काढते, प्रोत्साहन देते. माझ्या आधी ती अभिनय क्षेत्रात आली. तिची सगळी कामं मी पाहिली आहेत, पण आगामी ‘राव रंभा’ या चित्रपटात तिनं साकारलेली भूमिका मला अतिशय आवडली आहे. अभिनय क्षेत्रात अनुभवानं ती मला थोडी सिनिअर असल्यानं तिच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.’
लवकरच ही बहिणींची जोडी आपल्याला ‘भिरकीट’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. यात मोनालिसा रेश्मा, तर अश्विनी सुरेखा ही भूमिका साकारात आहे. या चित्रपटात या दोघींबरोबर गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके असे दिग्गज कलाकार असल्यानं या दोघींनाही या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव भरपूर काही शिकवून जाणारा होता, असं त्यांनी सांगितलं. अश्विनीनं शूट केलेला हा पहिलाच चित्रपट असल्यानं हा चित्रपट तिच्या कायम मनाजवळचा राहील, असं तिनं सांगितलं. त्यामुळं या दोन्ही बहिणींना एकत्र काम करताना बघणं प्रेक्षकांसाठीही खास ट्रीट असेल.
(शब्दांकन - राजसी वैद्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.