बाप हे असं नातं आहे जे वरवर कठोर वाटतं पण त्याच्या आत डोकावलं की एक प्रेमळ रसायन सापडतं. बाप - मुलीचं बाँडींग वेगळं असतं. आणि बाप - मुलाचं काहीसं वेगळं. अनेकदा बाप - मुलाच्या नात्यात काही गोष्टी बोलायच्या राहून जातात.
अनेकदा दोघांनाही एकमेकांसमोर मन मोकळं करावं वाटतं. पण काहीतरी अव्यक्त अशा गोष्टींची बंधनं येतात. आणि बोलायचंच राहून जातं. पण ज्या क्षणी मुलाला बापाच्या आतल्या माणसाची खऱ्या अर्थाने जाणीव होते ती भावना त्याच्यासाठी खूप स्पेशल असते.
बापलेकाच्या नात्याची अशीच हळवी कहाणी सांगणारा 'बापल्योक' हा सिनेमा भेटीला आलाय. कसा आहे हा सिनेमा जाणून घ्या..
(Baaplyok movie review marathi)
बापल्योक सिनेमाची गोष्ट आहे तात्या आणि त्यांचा मुलगा सागरची. अनेक प्रयत्न करून सागरचं लग्न ठरलंय. सागर लग्नासाठी उत्सुक. इतकं की, चोरून चोरून होणारी बायको मयुरीशी व्हिडिओ कॉल वर बोलतो. तिला जाऊन भेटतो. सागरचं तात्याशी मात्र पटत नाही. अशातच सागरच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याची जबाबदारी तात्यावर येऊन पडते.
तात्याशी आधीच वाकडं असलेला सागर आधी बापासोबत पत्रिका वाटायला टाळाटाळ करतो. पण नंतर त्यालाच जावं लागतं.
दोघे बापलेक बाईकवर आसपासच्या गावात त्यांच्या सग्यासोयऱ्यांना पत्रिका वाटायला निघून जातात. आणि मग सुरू होतो बापलेकाच्या नात्याचा हळुवार प्रवास. हा प्रवास तुम्हाला हसवतो, रडवतो आणि अंतर्मुख करतो.
बापल्योक सिनेमाची गोष्ट तशी छोटी. पण ती खूप छान सजवली आहे. निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरचा स्कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो. पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटतं नाही.
हल्ली पाणी टाकून सिनेमाची लांबी वाढवण्याच्या काळात बापल्योक सिनेमा फक्त दीड तासात नात्यांची सुंदर सफर आपल्याला घडवतो. सिनेमाचं आटोपशीर कथानक ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीत सुद्धा ऐकायला छान वाटतं.
याशिवाय सिनेमातले संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पाडतात असे अर्थपूर्ण आहेत. "भूतकाळाला पुन्हा भेटायचं असतं व्हय!" अशा छोट्या संवादांमधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते.
बापल्योक मध्ये सर्वच कलाकारांनी मस्त काम केलंय. विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे तात्यांची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेंडेंचा. आणि सागरच्या भूमिकेतील विठ्ठल काळेचा.
दोघांची केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी खूप छान रंगली आहे. अगदी खऱ्या आयुष्यात दोघे बापलेक आहेत इतका सहज त्यांचा अभिनय आहे.
मयुरी झालेल्या पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही लाजवाब. आईच्या भूमिकेत नीता शेंडे सुद्धा लक्षात राहतात.
बापल्योक पाहताना प्रत्येकाला त्याचा बाप आठवेल. बापाचा चेहरा कठोर असतो पण डोळ्यात लेकरांबद्दल, कुटुंबाबद्दल काळजी असते हे उमगेल. आणि बापल्योक पाहून झाल्यावर प्रत्येकाला आपल्या वडिलांना एक कडकडून मिठी मारावीशी वाटेल, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.