Kiran Mane Post On Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे शहंशाह म्हटले जाते. गेल्या अनेक दशकापासून ते सर्वांचे मनोरंज करत आहेत. अमिताभ बच्चन आज त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी बी-टाऊनचे सर्व स्टार्स त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
या वयातही ते खुप फिट आणि सक्रिय आहेत. ते मोठ्या उत्साहाने काम करतात. त्यामुळे ते अजूनही सुपरस्टार आहेत. त्याचा चाहतावर्ग तगडा आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. तर अनेक कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच सातारचा बच्चन म्हणुन लोकप्रिय झालेले मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी देखील बिग बींसाठी एक खास लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात की,
…. या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबॉसमध्ये ‘सातारचा बच्चन’ हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती… पन तरीबी ‘मराठी मीम मॉक्स’वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलंवतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.
…”किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” लहानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो! लहानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टॉकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.
…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘अँग्री यंग मॅन’ मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी कॉलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !
…पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत! तोच ‘अँग्री यंग मॅन’ वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवनारा हा ‘शहेनशाह’ बघून वाईट वाटायला लागलं… पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी ‘चुप्पी साधलेला’ बघून आश्चर्य वाटायला लागलं… कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करण्याची पोस्ट करनारा… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसनारा… केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली..
…पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या माणसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!!
सलाम महानायक, कडकडीत सलाम…
किरण माने यांनी जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. त्याच्या लहाणपणीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आहे. सुरुवातीला एक बेधडक व्यक्तीमहत्व म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बिग बींमध्ये काळानुसार कसा बदल झाला याबाबत किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.