अभिनेता प्रसाद ओकनं(Prasad Oak) स्वतःला हिंदी टेलीव्हिजनपासून लांब का ठेवलं याचा मोठा खुलासा केला आहे. प्रसाद ओक शेवटचा आपल्या 'दिया और बाती हम' मालिकेत दिसला होता. तो म्हणाला,''तो मराठी इंडस्ट्रीमध्ये सुखी आहे. आणि हिंदीत काम करण्याचा त्याचा कुठलाही मानस नाही''. जेव्हा त्याला याविषयी स्पष्टिकरण मागण्यात आले तेव्हा तो लगेच उत्तरला,''हिंदीत मराठी कलाकारांना कमी मानधन दिलं जातं. मराठीत तो कलाकार कितीही मोठा असला तरी हिंदीत गेल्यावर त्याचं मानधनं कमीच मोजलं जातं. पण हिंदी कलाकारांना मात्र जास्त पैसे दिले जातात मग अगदी त्या हिंदी कलाकाराचं मराठी कलाकाराच्या तुलनेत रोल कमी असला तरी''.
प्रसाद ओक याच मुद्द्यावर पुढे म्हणाला,''मी विचार करतो एवढा दुजाभावा कशाला? इतक्या कमी पैशात काम करायचं तर यापेक्षा जास्त मी मराठीत कमावतो. मग मी हिंदीत काम का करु? मला मराठी मालिका किंवा एखाद्या कार्यक्रमातून जास्त पैसे मिळतात. मग मी आर्थिक दृष्ट्या माझा दर्जा का कमी ठेवू? मला यावर कधीच भाष्य करायचं नव्हतं खरंतर'', असंही प्रसाद ओकनं नमूद केलं. बरं इतकंच नाही तर इतरही त्याच्याबाबतीत हिंदी टेलीव्हिजनमध्ये घडलं त्यावर प्रसादनं खुलासा केला आहे. तो म्हणाला, ''खरं सांगायचं तर,मला हिंदीतून काही खूप ऑफर्स आल्या वगैरे असा काही भाग नाही. मला कारण माहित नाही त्यामागचं. पण मी फार विचार नाही करत त्यावर. हिंदी इंडस्ट्रीत काम करायची जबरदस्त इच्छा किंवा ध्यास असलेला मी अभिनेता नाही. मी माझ्या मराठी भाषेत सुखी आहे. तिथे माझ्यावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात''.
पुढे तो म्हणाला, ''मी कधीच हिंदीत काम करणार नाही असं नाही. मला जर त्यांनी चांगले पैसे दिले कामाचे तर नक्कीच मी करेन. मला अगदी छोटीशी भूमिका मग ती मालिका किंवा सिनेमात करायला मिळाली तरी ती करण्यास माझी हरकत नाही. फक्त कामाचा मोबदला योग्य मिळायला हवा. मला हिंदी मालिका,शो किंवा ,सिनेमाही दिग्दर्शित करायला आवडेल'',असंही खासकरून प्रसाद म्हणाला. प्रसादने याआधी 'कच्चा लिंबू','हिरकणी' असे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्या सिनेमाविषयी प्रसाद ओक प्रचंड उत्सुक आहे. तो सिनेमाविषयी म्हणाला,''हा मोठा सिनेमा आहे,लोक गेल्या दोन वर्षांपासून सिनेमाची वाट पाहत आहेत. मी माझ्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टमधून नवीन ऊर्जा घेतो. मी खूप मेहनत घेतो. कारण त्यामुळे मला पुढचं चांगलं काम मिळणार असतं. जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अपय़श मिळालं की लोकं तुमच्याकडे दुर्लक्ष करतात...हे मला होऊ द्यायचं नाही''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.