चंद्रमुखी... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज - प्रसाद ओक

चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस
Chandramukhi Marathi Movie News, Prasad Oak on Chandramukhi
Chandramukhi Marathi Movie News, Prasad Oak on Chandramukhi
Updated on

कच्चा लिंबू, हिरकणी अशा दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरी सांभाळल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक चंद्रमुखी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.  प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. निर्माते अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेन्मेंट निर्मित हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक याच्याशी साधलेला संवाद. (Chandramukhi Marathi Movie News)

: चंद्रमुखी या चित्रपटाची कल्पना तुमच्या मनात कशी काय आली.. ?

-चंद्रमुखीची कथा मला विश्वास पाटील यांच्या कादंबरीतून सापडली. 1997-98 साली मी रणांगण नावाचं नाटक करत होतो. ते नाटक विश्वास पाटील यांनी लिहिलं होतं. तेव्हा खरं तर माझी आणि त्यांची ओळख झाली होती. त्या नाटकामुळे मला कळालं की विश्वास पाटील हे खूप मोठे लेखक आहेत. त्यानंतर मी त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या. त्यांचं लेखन मला खूप आवडायला लागलं. झाडा-झडती, महानायक जितके त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या होत्या तितक्या मी वाचून काढल्या. आणि त्या कादंबऱ्यांमध्ये मला चंद्रमुखी सापडली.

ही कादंबरी मी 2003-04 साली वाचलेली होती आणि तेव्हापासून मला वाटायचं की या कादंबरीवर चित्रपट बनू शकतो. त्यानंतर जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करेन तर याच चित्रपटामधून करेन असं ठरवलं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. चंद्रमुखीच्या आधी मी 2-3 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर मला चंद्रमुखी हा चित्रपट साकारण्याची संधी मिळाली. अर्थात विश्वास पाटील यांनी मला संधी आणि हक्क दिले त्यांच्या कादंबरीवर चित्रपट बनवण्यासाठी. त्यांचे खरंच खूप आभार, आणि मला प्रचंड आनंद झाला हा चित्रपट बनवताना.

तरीही चंद्रमुखी या कादंबरीवर चित्रपट बनवावा असं तुम्हाला का वाटलं?

-विश्वास पाटील हे उत्तम लेखक आहेत आणि त्यांच्या जवळ जवळ मी सगळ्या कादंबऱ्या वाचल्या आहेत. मला त्यांचं लेखन खूप आवडतं. एक जिवंत कलाकृती मला त्यांच्या कादंबरीमध्ये सापडते. चंद्रमुखी ही कादंबरी वाचल्यानंतर मला खूप वाटायचं की या कादंबरीवर चित्रपट व्हावा. एका कमर्शियल चित्रपटात जे काही हवं असतं ते सगळं काही या कादंबरीत होतं. त्यामुळे मला असं वाटलं की, निश्चितच या कादंबरीवर चित्रपट घडू शकतो आणि ते मी साकारण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात लव्ह स्टोरी आहे, गाणी आहेत, लोककला आहे, व्हिलन आहे, कॉमेडी आहे. एकंदरीत प्रेक्षकांना जो एंटरटेन्मेंट हवं असतं ते सगळं काही या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ः  अमृता खानविलकर व आदिनाथ कोठारे या कलाकारांची निवड कशी केली आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करताना कसं वाटलं ?

-अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे खरंच खूप चांगले कलाकार आहेत. ते नेहमी स्वतःला चित्रपटातील पात्रांमध्ये झोकून देतात. भूमिका कोणतीही असली तरी प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतात. या चित्रपटातील भूमिका करण्यासाठी त्यांनी मला पूर्ण वेळ दिला. या चित्रपटाकरिता मी कलाकारांचे वर्कशाॅप घेतले. अमृताने साधारणतः 8 ते 10 महिने दिले होते वर्कशॉपमध्ये, कारण अमृताला चंद्राची भाषा शिकवायची होती. तिला थोडं वजन वाढवायला लावलं. पुन्हा देहबोली, हावभाव या सगळ्या गोष्टी या वर्कशॉपमध्ये मी करून घेतल्या. अमृताने देखील तितक्याच जिद्दीने हे काम पूर्ण केलं. आदिनाथने देखील तितकीच मेहनत घेतली आहे. त्याच्याकडे आधीच 2-3 प्रोजेक्ट होते. त्याने त्या प्रोजेक्टच्या तारखा या चित्रपटाकरिता थोड्या पुढे ढकलल्या. कारण त्याला चंद्रमुखी या प्रोजेक्टचं गांभीर्य कळलं. त्यामुळे या दोघांनीही पुरेपूर वेळ दिला चंद्रमुखी या चित्रपटासाठी. त्यांनी उत्तमरीत्या या चित्रपटात काम केले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रचीती तुम्हाला येईलच.

तुम्ही एक उत्तम अभिनेता तर आहातच. त्याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शकही. या दोन्ही बाजू तुम्ही कशा प्रकारे सांभाळता?

-मराठी सिनेसृष्टीत जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा एक कलाकार म्हणून केलं. मुळात माझं स्वप्न हे दिग्दर्शक बनण्याचं होतं. मी पुण्यातून मुंबई या मायानगरीत आलो ते फक्त आणि फक्त दिग्दर्शक बनण्यासाठी. परंतु मला सुरुवातीला संधी मिळाली नाही. त्यामुळे मी अभिनयाकडे वळलो आणि त्यावेळेस लोकांना माझा अभिनय आवडतही होता. त्यावेळी मी अनेक नाटकांमध्ये काम केले... चित्रपटही केले. टीव्ही मालिका केल्या. प्रेक्षकांनीदेखील माझं कौतुक केलं. तेव्हा दिग्दर्शनाचं माझं स्वप्न मागेच राहिलं. 2015-16 साली माझ्या मनात आलं की आपण मुंबईत आलो तर आहोत ते दिग्दर्शक बनण्यासाठी. परंतु ते कार्य आपल्या हातून होत नाही आहे. मग 2015 साली मी दिग्दर्शनाचा खूप अभ्यास करायला लागलो. मनावर घेऊन सगळ्या गोष्टी करत गेलो आणि मग हळू हळू कच्चा लिंबू, आणि हिरकणी या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला.

चंद्रमुखी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?

- चंद्रमुखी ही कादंबरी वाचल्यानंतर एकंदरीत हा चित्रपट साकारायचा कसा हे मी माझ्या डोक्यात चित्र कोरलं होतं. मात्र चित्रपट साकारताना माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं ते म्हणजे कोरोना. या काळात अनेक लोकांना प्रचंड फटका बसला. याचा फटका मला देखील बसला कारण या चित्रपटाच्या कामाला मी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात सुरुवात केली होती. त्यावेळी मी कलाकारांचे वर्कशॉप घेत होतो.  दरम्यान, वर्कशॉप चालू असताना लॉकडाऊन लागलं आणि हे लॉकडाऊन ऑक्टोबर महिन्यापर्यँत गेलं. त्यामुळे आम्हाला त्या कालावधीत काहीच करता आलं नाही. ऑक्टोबरनंतर आम्ही नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन लागलं. जसजसे सरकार कोरोनाचे निर्बंध कमी करत होते तसतसं आम्ही चित्रपटाच्या कामाला लागत होतो. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होतो. अखेर आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा निश्चिंत खूप आनंद आहे.

या चित्रपटामधून प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळेल?

-चंद्रमुखी हा चित्रपट राजकारण आणि तमाशा कला यावर आधारित आहे. या चित्रपटात अजय -अतुल यांची खूप छान गाणी आहेत. ही गाणी गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिलेली आहेत. यात खडी लावणी आहे, बैठकीची लावणी आहे आणि महत्वाचं म्हणजे सवाल-जवाब लावणी देखील आहे. तब्बल 25-30 वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत सवाल-जवाब लावणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटात अमृता व आदिनाथ यांच्या अभिनयाची जुगलबंदी आहे, चिन्मय मांडलेकर यांचे अप्रतिम संवाद आहेत. माझ्या मते मनोरंजनाचे उत्तम पॅकेज म्हणजे चंद्रमुखी हा चित्रपट.

तुमच्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगाल?

-दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवीत आहे. त्यांनी खूप मोठे योगदान चित्रपटसृष्टीला दिले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका    अप्रतिम होत्या.. त्यामुळेच हा चित्रपट बनवत असल्याची घोषणा मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतीच केली होती.

- भाग्यश्री कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.