रणबीर कपूर(Ranbir Kapoor) नेहमीच मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा कधी तो मुलाखत देतो मग ती सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं असू दे की आणखी कोणत्या कारणानं तो मनापासून बोलायला जातो आणि एखादं तरी वादग्रस्त विधान करुन बसतो. त्यानं अशीच काही इंट्रेस्टिंग वादग्रस्त विधानं केली आणि मीडियाला आयतं खाद्य मिळवून दिलं. मग काय अनेक दिवस मीडियानं त्याचा यावरनं पाठलाग केला अन् त्यानं केलेल्या विधानांचा पाठपुरावा केला. आईवडिलांपासून चोरून लहान वयात लागलेलं सिगारटेचं व्यसन असू दे,गर्लफ्रेंडसोबत केलेली चीटिंग असू दे(नाव सांगायची गरजच नाही कोण गर्लफ्रेंड ते) आणि स्वतःच्या आईृवडिलांच्या नात्यातील प्रॉब्लेम्स सर्वांसमोर थेट बोलणं असू दे. अनेकदा बोलताना त्याला भान राहिलं नाही आणि मग त्याला तोंडावर पडण्याची वेळ आली होती.
वयाच्या पंधराव्या वर्षी मी धुम्रपानाच्या आहारी गेलो होतो, असं वादग्रस्त विधान त्यानं संजू सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान केलं होतं. रणबीरनं 'संजू' सिनेमात संजय दत्तची भूमिका साकारल्यानंतर तो अनेकांच्या कौतूकास पात्र ठरला होता. त्यात त्यानं संजय दत्तची ड्रग्ज आणि मद्यपानाच्या आहारी गेलेली भूमिका अगदी उत्तम वठवली होती. त्याचवेळी २०१८ मध्ये एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं स्वतःला लागलेल्या व्यसनाचा देखील उल्लेख केला होता. त्यानं तेव्हा सांगितलं होतं वयाच्या १५ व्या वर्षी त्याला ध्रुम्रपानाचं इतकं व्यसन लागलं होतं की तो त्याच्या आहारी गेला होता. ४ महिन्यांसाठी मी सिगारेट ओढणं थांबवलं पण नंतर पुन्हा सुरू केलं आणि त्यानंतरचा काळ माझ्यासाठी खूप अडचणीचा ठरला हे देखील तो म्हणाला होता.
काही सिनेमेच बॉलीवूडमध्ये करुन करिअर सुरु होतंय तोच रणबीरनं आणखी एक मोठं वक्तव्य केलं ते आपले वडील ऋषी कपूर आणि नीतू सिंग-कपूर यांच्यातील नात्याला घेऊन. त्यानं आपल्या आई-वडिलांचे लग्न अडचणीत आहे असं मोठं वादग्रस्त विधान तेव्हा केलं होतं. २०११ मध्ये मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता,''कधी-कधी माझ्या आई-वडिलांमधील भांडणं खूप वाईट वळण घेतात. मी तेव्हा माझ्या गुडघ्यात डोकं खुपसून जीन्यावर सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत असाच बसून असतो. ते कधी भांडण थांबवतायत याची वाट पाहत. गेल्या काही वर्षांपासून माझ्या आई-वडिलांचं लग्न अडचणीत आहे. मी त्यांच्या भांडणाच्या कचाट्यात सापडतो,कारण मी तिथे असतो. आई खूप काळजी घेते की याचा आमच्यावर काही परिणाम होऊ नये. ती तिचं मन आमच्याकडे मोकळं करते जे तिच्यासाठी चांगलं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी ज्या वातावरणात वाढलो तिकडे सगळं खुप छान,चोवीस तास गुलाबाच्या पायघड्या पसरलेल्या आणि चहूबाजूला प्रेम असं काहीच नाहीय,नव्हतं. मी फक्त एका स्त्री आणि पुरुषातील नातं किती किचकट असू शकतं किंवा ते बनू शकतं हेचं कायम शिकत आलोय''.
नात्यात धोका देणं हा डाग तर रणबीरच्या माथ्यावर अनेकदा लागला आहे. जेव्हा तो दीपिका पदूकोणसोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा हे उघडपणे समोर आलं होतं. शेवटी रणबीरनंच एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं,''माझ्याकडून एखाद्या नात्यात जर काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये विचार करण्याची कमी समज आणि अनुभवाची कमतरता,काही गोष्टींचा घेतलेला गैरफायदा,काही कारणांमुळे आलेली स्वभावातील निष्ठुरता हे सगळं कारणीभूत आहे''. शेवटी रणबीरनं अनेक वर्ष केलेल्या तात्पुरत्या प्रेमाला रामराम ठोकत आलिया भट्टवर आपलं मन हारलंच. काही वर्षांपूर्वी रणबीर कपूरनं एक धक्कादायक विधान केलं होतं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. त्यानं वयाच्या १५ व्या वर्षी आपली व्हर्जिनीटी घालवली होती असं म्हटलं होतं. त्यानं आपण दारू,सिगारेट आणि काही काळापुरतं ड्रग्जच्या आहारी गेल्याचं देखील कबूल केलं होतं.
तर नुकतंच त्यानं आपले मोठे काका रणधीर कपूर(Randhir Kappor) यांना स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय असं देखील म्हटलं होतं. 'शर्माजी नमकीन' हा ऋषी कपूर यांचा सिनेमा त्यांच्या निधनानंतर आता प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा तो पाहिल्यानंतर काका रणधीर कपूर यांनी आपल्याला ऋषी कपूर यांचे कौतूक करायचे आहे,बोलाव त्यांना असं सांगितले. रणधीर कपूर यांना स्मृतीभ्रंशाचा आजारा झाला आहे असं मीडियाशी बोलताना रणबीरनं म्हटलं होतं. पण यावर रणधीर कपूर यांनी आपण उत्तम आहोत,आपल्याला काही झालं नाही,रणबीर जे बोलला ती त्याची मर्जी,तो त्याला जे वाटतं ते बोलला असं स्पष्टिकरण देत रणबीरच्या स्मृतीभ्रंश झाल्याच्या विधानाला खोडून काढलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.