धर्मवीर २ चा मुहूर्त सोहळा आज ठाण्यात कोलशेत येथे संपन्न झाला. या मुहूर्त सोहळ्याला सिनेमातले कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा विशेष उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. त्यावेळी त्यांनी पहिल्या भागात प्रवीण तरडेंच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या, असा खुलासा केला.
प्रवीण तरडेंच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मला अनेक लोकं विचारतात पिक्चर हिंदी मे बनाओ. हा सिनेमा हिंदीमध्ये पाहिजे आपल्याला. काही लोकांना हा सिनेमा खटकला. काही लोकं सिनेमा बघता बघता उठून गेले. काही लोकांना काही सीन आवडले नाहीत. कोणाला आवडो न आवडो आता फायनल ऑथोरीटी मी आहे.
धर्मवीरचा पहिला भाग बनवताना काही गोष्टी प्रवीणच्या मनाविरुद्ध झाल्या. आता कलाकार लोकं सर्कीट असतात. सर्कीट म्हणजे वेडे असतात. मग गोड बोलून बोलून त्यांच्या मागे लागावं लागतं."
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "दिघे साहेबांवर सिनेमा करण्याचा उत्साह त्यांनी दाखवला. सिनेमाची सुरुवात तर झाली. त्यांचं कार्य प्रचंड आहे. तर ते किती भागात दाखवता येईल हे मला सांगता येत नाही. त्यांनी दिलेली जगण्याची शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे. सत्ता, संपत्ती, अधिकाराचा वापर आपण सर्वसामान्य लोकांसाठी केला पाहिजे. पहिल्या भागात मी नगरविकासमंत्री दिसलो तर दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री म्हणुन दिसेल. आम्ही घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी. बाळासाहेब - दिघे साहेब म्हणायचे नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. गडचिरोली मध्ये टाटा टेक्नॉलॉजीने अद्ययावत सेंटर उभारलंय . दरवर्षी ५००० तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे."
"धर्मवीर २" चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...." अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे.
चित्रपटात कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र "धर्मवीर २" या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय,? हे समजून घेण्यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.