Digpal lanjekar : सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे जोरात वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका अष्टक करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले चार चित्रपट प्रदर्शित झाले असून पाचवे पुष्प कधी भेटीला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर नुकताच 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. मुकेश ऋषी, चिन्मय मांडलेकर, माधवी निमकर, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर अशी दमदार कलाकारांची जंत्री या चित्रपटात आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला इतिहास, महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा असे आशयसूत्र या चित्रपटाचे आहे. या चित्रपटातील गाणी देखील रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता पुढचे पुष्प कोणते असणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी या शिव अष्टका या चित्रपट मालिकेतून समोर येत आहे. आता पर्यंत आपण फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि अफजलखान वधाचा इतिहास पाहिला. त्यामुळे पाचवा चित्रपटही असाच एक थरार असणार आहे. मागे अभिनेता अजय पुरकर एका मुलाखतीत म्हणाले होते की, या मुलाखतीच्या शेवटी पुढचे पुष्प उलगडले जाईल. त्यामुळे पाचव्या चित्रपटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
हा पाचवा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेवर (agryahun sutka)असणार आहे. राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा मोहीम, त्यासाठीची मोर्चेबांधणी, आग्रा भेट, या भेटीदरम्यान झालेल्या घडामोडी आणि महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका या सर्व थरारक घडामोडी या चित्रपटातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल अशी माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.