दिलीप कुमार-राज कपूर यांच्या घरांवर पाकिस्तान सरकारची कारवाई

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना औपचारिकरित्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
Raj Kapoor and Dilip Kumar
Raj Kapoor and Dilip Kumar
Updated on

पाकिस्तानच्या Pakistan खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने या शहराच्या मध्यभागी असलेल्या बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar आणि राज कपूर Raj Kapoor यांच्या वडिलोपार्जित घरांना औपचारिकरित्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पेशावरचे उपायुक्त खालिद मेहमूद यांनी बुधवारी या ऐतिहासिक इमारतींच्या सध्याच्या मालकांना अंतिम नोटीस बजावली असून १८ मे पर्यंत हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. खैबर पख्तूनख्वा (केपी) सरकारने ठरविलेल्या हवेलींच्या किंमतींबाबत मालक आपले आरक्षण सादर करू शकतात. प्रांतीय सरकार किंवा न्यायालय या घरांच्या किंमती वाढविण्याचा आदेश देऊ शकतात. (Dilip Kumar Raj Kapoor ancestral homes Pak govt begins process to take formal custody)

यापूर्वी केपी सरकारने राज कपूर यांच्या ६.२५ मार्ला घराच्या खरेदीची किंमत दीड कोटी आणि दिलीप कुमार यांच्या चार मार्ला घराच्या खरेदीची किंमत ८० लाख रुपये इतकी ठरवली होती. हे घर खरेदी करून त्यांचे संग्रहालयात रुपांतर करण्याची योजना सरकारने आखली होती. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात जागा मोजण्यासाठी मार्ला हे पारंपरिक एकक मानलं जातं. यानुसार एक मार्ला म्हणजे २७२.२५ चौरस फूट किंवा २५.२९२९ चौरस मीटर.

कपूर यांच्या हवेलीचे मालक अली कादिर यांनी २० कोटी रुपयांची मागणी केली होती. तर दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराचे मालक गुल रेहमान मोहम्मद यांनी सांगितले की, सरकारने ती साडेतीन कोटी रुपये या बाजारभावाने खरेदी करावी. खैबर पख्तूनख्वा पुरातत्व आणि संग्रहालये विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद यांनी सांगितले की, दोन्ही घरे ताब्यात घेतल्यानंतर ईद-उल-फितरनंतर त्यांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले जाईल.

हेही वाचा : 'आई कुठे काय करते'ची अभिनेत्री करतेय रुग्णांच्या नातेवाईकांची मदत

कपूर हवेली म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर किस्सा ख्वानी बाजारात आहे. राज कपूर यांचे आजोबा दिवान बश्वेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ आणि १९२२ दरम्यान हे घर बांधलं होतं. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच घरात झाला होता. प्रांतीय सरकारने त्याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं आहे. दिलीप कुमार यांचं १०० वर्षे जुनं वडिलोपार्जित घरसुद्धा याच परिसरात आहे. २०१४ मध्ये तत्कालीन नवाज शरीफ यांच्या सरकारने या घराला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं होतं.

या दोन्ही घरांच्या मालकांनी याआधी जागेचे व्यावसायिक महत्त्व पाहता घरं तोडून त्याठिकाणी व्यावसायिक प्लाझा बांधण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र पुरातत्व विभागाने या घरांचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांचं रक्षण करण्यासाठी मालकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.