"गोव्याला ड्रग्ज घेणाऱ्या लोकांची गरज नाही", असं विधान गोव्याचे पर्यटन मंत्री Goa Minister मनोहर आजगावकर यांनी सोमवारी केलं. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांच्या अटकेशी संबंधित प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. एका सरकारी कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. पर्यटकांकडून होणाऱ्या ड्रग्जच्या सेवनावर गोवा सरकारकडून कडक कारवाई करण्यात येत असल्याचं सांगताना ड्रग्जवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी गृह खात्याची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Aryan Khan arrested)
"आम्हाला गोव्यात ड्रग्ज घेणारी लोकं नकोत. त्याबाबतीत कडक कारवाई केली जाईल", असं आजगावकर म्हणाले. क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठही जणांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. ज्या क्रूझवर ही पार्टी होणार होती, ती कॉर्डेलिया क्रूझ मुंबईहून गोव्याला जाणार होती. ड्रग्ज सेवनाच्या उद्देशाने किंवा ड्रग्ज बाळगून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कसं रोखणार, असाही प्रश्न आजगावकर यांना यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर "या गोष्टी माझ्या हातात नाहीत. त्या गृह खात्याच्या हातात आहेत", असं उत्तर त्यांनी दिलं. गोवा हा ड्रग्ज आणि कचरा यांपासून मुक्त असावा, असं ते पुढे म्हणाले.
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने अटक केली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. क्रूझवरच्या पार्टीला अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि त्याची मित्रमंडळी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीकडे होती. त्यानुसार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. शनिवारी आर्यन खान आणि अरबाझ प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी अरबाजकडे सहा ग्रॅम चरस सापडले. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, पण त्याने ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यामुळे दोघांनाही क्रूझवर चढण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं. तर मुनमुन हिच्या बॅगेत पाच ग्रॅम चरस सापडले. या तिघांसोबत त्यांचे मित्र क्रूझवरच होते. त्यांच्याकडेही काही ड्रग्ज मिळण्याची शक्यता असल्याने एनसीबीचे अधिकारी क्रूझवर चढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.