दिग्दर्शक प्रकाश झा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी राजनीती, चक्रव्यूह, आरक्षण असे काही चित्रपट बनवून समाजातील वास्तववादी विषयावर भाष्य केले. आता ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर आश्रम नावाची वेबसीरीज घेऊन येत आहेत . त्याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद..
--------------------------
ः आश्रम या वेबसीरीजचा विषय काय आहे आणि या विषयावर वेबमालिका काढावी असे तुम्हाला केव्हा व कधी वाटले....
-ही कथा एका क्रिमिनलची आहे आणि काल्पनिक आहे. आपल्या देशातील कित्येक लोक झटकन एखाद्यावर विश्वास ठेवतात. त्याच्या गोड गोड बोलण्याला भुलतात आणि मग त्यांना कळते की आपण काही तरी चूक केली आहे. साहजिकच त्याचा पश्चात्ताप त्यांना नंतर होतो. या वेबसीरीजमधील नायक हा क्रिमिनल आहे. लोकांना ते काही माहीत नसत. तो वेश बदलून कित्येकांना फसवीत असतो. त्याच्या भूलथापांना लोक बळी पडतात. ही कथा कोणत्याही साधू किंवा महंतावर आधारित नाही. आपल्याकडे काही साधू आणि बाबा आहेत. ते खूप मोठे आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
"आश्रम" ही सिरीज काशीपूरच्या बाबा निरालावर असून तो नंतर वादग्रस्त ठरतो. त्याच्याकडे असंख्य भक्त आणि अनुयायी येत असतात ज्यांना तो आशीर्वाद देत असतो. तो आपल्या अनुयायांना सांगतो: “मी तुला मोक्षच्या मार्गावर घेऊन जाईन.” त्यानंतर लगेचच राजकारणी त्याच्यात आणि त्याच्या अनुयायांमध्ये रस घेण्यास सुरुवात करतात. पण जेव्हा बलात्कार आणि हत्येच्या बातम्या माध्यमांमार्फत लोकांपर्यंत यायला सुरुवात करतात तेव्हा ही यशोगाथा तीव्र वळण घेते. त्यानंतर सुरू होतो तो रंजक पोलिस तपास. त्यानंतर या सगळ्याचा पोलिस कसा उलगडा करतात, हे पाहण्यासाठी ही सिरीज पाहावी लागेल.
ः पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की भारतातील एका संतावर ही वेबसीरिज आधारित आहे...
- अजिबात नाही. कुणी अशी तुलना केली असेल तर ती चुकीची आहे आणि ही वेबसीरीज पाहिल्यानंतर त्याची कल्पना येईल. मुळात माझ्या प्रत्येक कलाकृतीबाबत असेच काहीसे बोलले जाते. आरक्षण चित्रपटाच्या वेळी काही जणांनी म्हटलं की हा चित्रपट दलितांच्या विरोधात असेल. तेव्हा ठिकठिकाणी आंदोलने झाली. राजनीती, गंगाजल या चित्रपटांच्या वेळीही असेच घडले. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनी माझे कौतुक केले. काही जणांनी पुष्पगुच्छ पाठविले. ही वेबसीरीज पाहिल्यानंतर लोक नक्कीच कौतुक करतील. या नऊ भागांच्या वेबसीरीजमध्ये कोणत्याही गुरूची चर्चा नाही किंवा देवदेविकांची चर्चा केली नाही. कोणताही मंत्र-तंत्र नाही की जप वगैरे नाही. एक अपराधी माणूस वेश बदलून एकेकांना फसवीत असतो आणि तो कशा पद्धतीने फसवितो याची ही कहाणी आहे.
ः आरक्षण, राजनीती, चक्रव्यूह अशा काही चित्रपटांमध्ये तुम्ही विविध विषय हाताळले आहात. अशा विषयांसाठी खूप रिसर्च करावा लागतो. या वेबसीरीजसाठी किती संशोधन करावे लागले..
- प्रत्येक विषयाचे संशोधन वेगळे असते आणि ते करावेच लागते. काही वेळेला त्याला चार-सहा महिने लागतात तर काही वेळेला एखादे वर्षही लागते. ते सगळे विषयानुरूप ठरते. परंतु ही कथा काल्पनिक असल्यामुळे मला फारसे काही संशोधन करावे लागले नाही. ओटीटीसारखा नवा प्लॅटफाॅर्म आणि नवीन कथानक घेऊन येत आहे. या नव्या प्लॅटफार्मची मजा घेऊन तर बघूया असे वाटले.
ः मै उपदेश नही संदेश देता हूं शांती का...असा एक संवाद या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये आहे-सध्या आपल्या देशातील जनतेला कोणत्या संदेशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते..
- मी काय संदेश देणार. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे आणि चित्रपट बनविणे माझे काम आहे. देशातील करोडो जनतेने नरेंद्र मोदींना निवडून दिले आहे आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे.
ः काशीपूरचा बाबा निराला या भूमिकेसाठी बाॅबी देवोलची निवड तुम्ही कशी काय केली...
- कथानकावर जेव्हा आमचे काम सुरू होते तेव्हा बाॅबीने ही भूमिका साकारावी अशी आमची इच्छा होती. त्यानंतर आम्ही त्याला भेटलो आणि कथानक ऐकविले. त्याला ही कहाणी मनापासून आवडली. कारण कहाणीतील विविध कंगोरे त्याला खूप भावले आणि त्याने होकार दिला. या वेबसीरीजव्दारे तो वेबविश्वात पदार्पण करीत आहे. प्रेक्षक नक्कीच त्याचे स्वागत करतील.
ः भविष्यात ओटीटी प्लॅटफाॅर्मचे प्रस्थ किती वाढेल असे तुम्हाला वाटते...
- सध्या हा प्लॅटफाॅर्म नवीन आहे. त्यामुळे काही अंदाज बांधणे कठीण आहे. आगामी सहाएक महिन्यात नेमके चित्र स्पष्ट होईल. या प्लॅटफार्मवर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद, रेव्हेन्यू या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि सध्या मल्टिप्लेक्स बंद आहेत. त्यामुळे तेथील अंदाजही काही सांगता येत नाही. कदाचित भविष्यात ओटीटी प्लॅटफाॅर्म आणि थिएटर्स हातात हात घालूनच चालतील.
ः वेबसीरीज वेगळे माध्यम आहे आणि चित्रपट वेगळे. अधिक तयारी कोठे करावी लागते...
-वेबसीरीजमध्ये कथानक विस्तारित स्वरूपात सांगावे लागते आणि वेगवेगळे ट्रॅक आणावे लागतात. चित्रपटाची कथा केवळ दोन ते अडीच तासांमध्ये सांगावी लागते. बाकी चित्रीकरणाचे सगळे सारखेच असते. मला तरी अधिक काही वेगळे करतोय असे वाटले नाही. चित्रपटासारखेच शूटिंग करतोय असे वाटले.
ः हल्ली चित्रपटांप्रमाणेच वेबसीरीजचेदेखील दुसरा आणि तिसरा भाग येतो. याबाबतीत तुम्ही काही ठरविले आहे का..
-आता आम्ही नऊ भाग बनविले आहेत. त्यानंतर दुसरा सीझन बनविण्याचा विचार सुरू आहे.
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.