Fighter Movie Review : गेल्या काही वर्षात देशभक्तीपर आधारित अनेक चित्रपट पाहायला मिळाले ज्यात खऱ्या घटनांवर आधारित चित्रपटांमधील थराराने प्रेक्षकांना आकर्षित केलं. खरे प्रसंग मोठ्या पडद्यावर जसेच्या तसे पाहणं हा अनुभव रोमांचकारी असतो. असाच अनुभव देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने केलाय.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेक्षकांसाठी देशभक्तीवर आधारित फायटर या चित्रपटाची पर्वणी पाहायला मिळतेय. देशभक्तीपर अनेक चित्रपट आपण पाहत असतो या सगळ्यात फायटरही त्याचं वेगळेपण सिद्ध करतो. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर हा चित्रपट देशभक्ती, नाती आणि भावभावनांचा मेळ साधतो. अभिनेता ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकत असल्याने या चित्रपटाविषयी चर्चा आणि उत्सुकता होती.
या चित्रपटाची कथा साधी सरळ आहे ज्यात पॅटी नावाचा हवाईदलातील सैनिक आहे. त्याच्या युनिटमध्ये त्याचे काही साथिदार देखील आहेत. भारतासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या या हवाई दल सैन्याची ही कहाणी भावुक करणारी आहे. ज्यात अनेक खऱ्या घटनांचा थरारही यात पाहायला मिळतो. 2019 सालचा पुलवामा हल्ला असेल किंवा बालाकोट एअरस्ट्राईक यासारख्या घटना आणि त्यांचा थरार उत्तम पद्धतीने सादर केलाय. हे प्रसंग अक्षरक्षह अंगावर रोमांच उभे करतात अशा पद्धतीने सादर करण्यात आलेत. चित्रपटाच्या कथेच सादरीकरण हे शेवटपर्यंत लक्ष वेधून घेणारं आहे. पूर्वार्धात तुम्हाला कथेतील विविध पैलू दाखवले जातात तर उत्तरार्ध थरारक प्रसंगांनी खिळवून ठेवतो.
या चित्रपटातील देशभक्तीपर प्रसंग, कलाकारांचा उत्तम अभिनय, आकाशात उंचच उंच भरारी घेणारी एअरफोर्सची विमानं, गाणी ही जमेची बाजू आहे. यात आणखी भर घालतीय ती ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या एकत्र कामाने. हे दोघेही देखणे चेहरे उत्तम अभिनय आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरदार छाप सोडतात. त्याचाच फायदा त्यांना हवाईदलातील सैन्य साकारताना झालाय.
हृतिक अन् दीपिका दोघंही स्क्रिनवर एकत्र छान केमिस्ट्री घेऊन येतात, शिवाय टीपिकल रोमँटिक सीन नसल्याने काहीतरी वेगळं पाहायला मिळतय. दोघांच्या भूमिकाही उत्तम लिहिल्या गेल्या असल्याने ही पात्रे खरीखुरी वाटतात. यांच्यासह अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ऑबेरॉय, संजीदा शेख, महेश शेट्टी, तलत अजीज, आशुतोष राणा यांसारखे कलाकारही भूमिकांना न्याय देतात.
ह्रतिक रोशने फक्त त्याच्या देखणे लूक्स आणि नृत्याच्या जोरावर नाही तर वैविध्यपूर्ण कामातून उत्तम कलाकार असल्याचं वेळोवेळी सिद्ध केलय. या चित्रपटातून ह्रतिक मोठा काळाने भारतीय जवानाच्या भूमिकेत झळकतो. लक्ष या चित्रपटातूनही त्याने जवानाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पॅटीच्या भूमिकेतील एकटेपणा, देशभक्ती, मैत्री, प्रेम हे सगळे पैलू त्याने उत्तम वठवले आहेत.
देशभक्तीपर आधारित भावूक करणारे प्रसंग हे पार्श्वसंगीताने आणखी प्रभावी वाटतात ज्याचं श्रेय जातं ते संचित आणि अंकित बल्हारा यांना. विशाल-शेखऱ यांची गाणी तर चित्रपटाच्या प्रदर्शना आधीपासूनच ट्रेंडिग होत आहेत. मात्र चित्रपटातील इश्क जैसा हे गाणं पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट संपण्याची वाट पाहावी लागते.
आकाशात भरारी घेणारे एअर फोर्स विमानांचे प्रसंग, त्याचे व्हीएफएक्स हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर झालेत. त्या सीन्सवर केलेली विशेष मेहनत दिसते त्यामुळे ते सहजतेने समोर येतात. आणि प्रेक्षकांची दाद मिळवून जातात.
एखाद्या देशभक्तीपर आधारित चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा घेऊन प्रेक्षक जातात, त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्यातील संवाद. अंगावर रोमांच उभे राहणारे संवाद असतील तर सीन्स देखील तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. मात्र संवादांच्या बाबतीत फायटर बऱ्याच ठिकाणी कमी पडतो. ह्रतिक, दीपिका, अनिल कपूर सारख्या उत्तम कलाकारांच्या वाट्याला संवाद मात्र फारच साधे आहेत. त्यात काहीच नाविन्य किंवा वैविध्य जाणवत नाही. सिद्धार्थ आनंद सारख्या दिग्दर्शकाने त्याच्या चित्रपटातील संवादांकडे विशेष लक्ष दिलं तर कदाचित त्याचे चित्रपट आणखी प्रभावी वाटू शकतील. उत्तम कास्टिंग असताना देखिल संवादांमुळे अशा चित्रपटांमध्ये कमतरता जाणवू शकते.
संपूर्णपणे या चित्रपटाचं एका वाक्यात विश्लेषण केलं तर हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट देशभक्तीच्या उत्साहाबरोबरच अनेक भावूक क्षण घेऊन येतो. एक भारतीय म्हणून तुमचं रक्त सळसळेल असे प्रसंग, तर देशासाठी लढणाऱ्या जवानासांठी उर अभिमानाने भरुन येईल अशा विविध भावनांचा अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने घेता येऊ शकतो.
---------------------------------------------
चित्रपटाचे नाव - फायटर
दिग्दर्शक - सिद्धार्थ आनंद
कलाकार - हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर
रेटिंग - 3.5 स्टार्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.